Saturday, 31 December 2022

      


         लहानपणापासून माझी एक फॅन्टसी होती..(वेडं स्वप्न ! ) की..आयुष्यात कधीतरी- शक्यतो आयुष्याच्या संध्याकाळी- माझं एक छोटंसं दुकान असावं- ग्रीटिंग कार्ड्स अर्थात शुभेच्छापत्रांचं..जिथे वेगवेगळ्या प्रसंगी देता येतील अशी- सुंदर मजकूर असलेली शुभेच्छापत्रे असतील. जमल्यास ग्राहकांच्या मागणीनुसार कस्टमाइज्ड(customized) मजकूर लिहून मिळेल अशीही सोय असावी. दुकानात छान..मंद इंस्ट्रुमेंटल संगीत वाजत असावं. आणि खूप आल्हाददायक प्रसन्न वातावरण असावं जिथे येणाऱ्यांना आणि मलाही त्यातून समाधान मिळावं. मी पाहिलेल्या ग्रीटिंग कार्ड्सच्या मोजक्या दुकानांमध्ये मला हे वातावरण जेव्हा जेव्हा अनुभवायला मिळालं त्यामुळे माझी ही फॅन्टसी तशीच आहे.

हे आठवायचं कारण म्हणजे- डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात माझ्या एका मैत्रिणीचं लग्न होतं. तिची- माझी भेट फेसबुकवरूनच झाली. ती माझ्यापेक्षा बोलकी असल्याने आणि कदाचित आमचा काही ऋणानुबंध असल्याने अद्याप प्रत्यक्ष भेट झाली नसली तरी अंतराने का होईना संवाद कायम होत राहिला. लग्न होतं ठाण्याला आणि शुक्रवारी (वर्किंग डे ला). प्रयत्न करूनही ऐन वेळी प्लॅन रद्द करावा लागला. लग्नाला उपस्थित राहणं शक्य नव्हतं पण इतक्या प्रेमळ आग्रहाचा मानही ठेवायचा होता. काय करावं..हा विचार करता करता सुचलं की आपण जाऊ शकत नसलो तरी भेटवस्तू आणि शुभेच्छा तर जाऊ शकतात. भेटवस्तू काय घ्यायची , तिची निवड, पॅकिंग आणि कुरिअर करणे हे सगळं करण्यासाठी फक्त २ दिवस होते. जेव्हा हे सुचलं तेव्हा मी ऑफिसमध्ये होते त्यामुळे तो दिवस तर गेला. दुसऱ्या दिवशी घरूनच काम करणार होते, तेव्हा लहरी मनात आलेल्या या सगळ्या इच्छा प्रत्यक्षात आणण्यासाठी फक्त १ दिवस होता. त्यातही मैत्रिणीच्या घराचा सविस्तर पत्ता (पोस्टल ऍड्रेस ज्यावर पार्सल पोचेल ) माझ्याकडे नव्हता. बरं...आता तिला विचारावं तर सरप्राईझ सरप्राईझ राहणार नव्हतं. मग काय ? ठरवलं - गिफ्ट पोचवायचं थेट विवाहस्थळीच- लग्नाच्या हॉलवर. म्हणजे आता उद्याच, माझ्या अपेक्षित वेळेत पुण्याहून ठाण्यात पार्सल पोचवणारी कुरिअर सर्व्हिस शोधणे हे महत्वाचं होतं. माझ्या अपेक्षा पाहता या बाबतीत मी जरा साशंक होते. तरी सगळं नियोजन मनात करून ठेवलं.
दुसऱ्या दिवशी काही कॉल्सनंतर कुरिअर सर्व्हिस तर फायनल झाली. लंचब्रेकच्या एक तासात घराबाहेर पडले. गिफ्टसोबत ग्रीटिंग कार्ड द्यायचंच हे मनात होतं , त्याशिवाय गिफ्ट पूर्ण वाटत नव्हतं. खास प्रसंगी जपून ठेवाव्यात अशा भावना व्यक्त करण्यासाठी मदतीला धावून येतात शुभेच्छापत्रं.."Cards are the expressions that often go unspoken" हे अशाच एका कार्डवर वाचलेलं वाक्य खूप खरं आहे. आनंद, शेअरिंग, कृतज्ञता अशा अनेक अव्यक्त भावना असतात त्यात. कार्ड देणारा आणि घेणारा दोघांना खऱ्या अर्थानं भावनिक पातळीवर जोडणारी..इमोशनल टच असणारी सुंदर गोष्ट आहे ती.
माझ्या माहितीतल्या आवडत्या कार्ड्सच्या दुकानासमोर गेले..पाहते तर काय ? 'श्लोक कलेक्शन्स..' "दुकान विकणे आहे.." ही पाटी दिसली आणि पटकन जाऊन उत्तम कार्ड कमी वेळात घ्यायचं हा माझा मनसुबा उधळला. पण त्याहीपेक्षा..वाईट वाटलं ते दुकान बंद झाल्याचं वाचून. आतापर्यंत मी अनेक आपल्या माणसांना खास प्रसंगी त्यांच्याविषयी स्वतः काही लिहून दिलेली कार्ड्स माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली.जी बहुतेक वेळी इथूनच खरेदी केली होती. मी कार्ड निवडताना त्यातला मजकूर आणि काही लिहिण्यासाठी थोडी तरी कोरी जागा/ कोरं पान पाहते.लिखाण-वाचन यात फारसा रस नसलेल्या लोकांनाही आपल्याविषयी काहीतरी खास..मनापासून लिहिलेलं वाचून जो आनंद होतो तो मी पाहिलाय. केक, चॉकलेट्स, इतर अनेक गोष्टी कुठल्याही सोहळ्यात महत्वाच्या आहेत पण ते क्षण कैद करण्याची क्षमता या कार्ड्स मध्ये आणि मनापासून दिलेल्या शुभेच्छांमध्ये असते. आणि ही मैत्रीण स्वतः उत्तम लिहिणारी, प्रोफेशनल कन्टेन्ट रायटर असल्याने तिला अशा गिफ्टचं, शब्दांचं मोल असणार आणि ती खूश होईल असा माझा विचार होता आणि त्यासाठीच हा अट्टाहास होता.
काहीशी खट्टू होऊनच मी गिफ्ट आर्टिकल पाहण्यासाठी दुसऱ्या दुकानाकडे वळले. एक साजेशी भेटवस्तू खरेदी केली. ती पॅक करण्याआधी "ग्रीटिंग कार्ड्स दाखवा ना.." असं मी म्हणताच दुकानदार काका-काकूंनी माझ्याकडे आश्चर्याने पाहिलं- "कार्ड्स ? लग्नाच्या शुभेच्छांचे तर नाहीतच पण एकूण ग्रीटिंग कार्ड्सलाच पूर्वीइतकी मागणी नाहीये, त्यामुळे आमच्याकडे नाहीयेत. " त्यांनी स्पष्टीकरण दिलं. " wedding wishes चं जाऊ देत, साध्या best wishesचं असेल ना ? एकदा प्लीज बघता का ?" मी विचारलं. "असतं तर आम्ही दिलं नसतं का ? फक्त कपल्ससाठीचे स्पेशल मेसेजचे आहेत. " "बरं, थोडंसं थांबा..मी अजून कुठे मिळतंय का बघते आणि ते आल्यावरच माझं गिफ्ट पॅक करून द्या" मी सांगितलं. "शक्यतो नाही मिळणार आसपास कुठे..पण तुला प्रयत्न करायचा तर कर, फक्त दुपारी २ वाजेच्या आत ये, त्यानंतर तुला रॅपिंग करून नाही मिळणार." "हो, आलेच" म्हणत मी आसपासच्या कुठल्या दुकानांत मिळतंय का हे बघायला तिथून बाहेर पडले.
वेळ कमी असल्याने फार शोधाशोध करणं शक्य नव्हतं. २-३ ठिकाणी विचारपूस केल्यावर शेवटचा प्रयत्न म्हणून एका दुकानात विचारलं.भूत बघितल्यासारखा चेहरा करत- "लग्नाचे नाहीयेत..वेडिंग ऍनिव्हर्सरीचे असतील" काहीसं तुसडेपणानेच दुकानदार उत्तरला. दुकानात बसणाऱ्या त्याच्या वडिलांना "यांना दाखवा जे आहेत ते कार्ड्स" म्हणत तो इतर ग्राहकांकडे लक्ष देण्यासाठी गेला. कार्ड्स ला मागणी नसल्याने कितीतरी दिवस हे कार्ड्स दुकानात तसेच पडून होते. साहजिकच नुकसान करून देणाऱ्या मालाची विक्री करण्यात त्याला स्वारस्य नव्हतं. त्या काकांनी काही कार्ड्स दाखवले. खूप दिवसांनी ते बाहेर पडले होते असं प्लास्टिकची धूळ सांगत होती. लग्नाच्या दिवशी देता येईल असं कार्ड नसलं तरी मला हवं असलेलं कोरं पान आणि चांगला मजकूर असलेल्या एका वेडिंग ऍनिव्हर्सरीच्या कार्डवर माझी नजर गेली, मला ते आवडलं. मग म्हटलं आपली क्रिएटिव्हिटी वापरावी..सहजीवनाच्या शुभेच्छा देताना त्यात लग्नाचे अनेक वाढदिवस साजरे करा..ही सदिच्छा असतेच ना..(so, wedding anniversary card is applicable for wedding date also 🙂 ). मग फार विचार न करता लगेच ते कार्ड, २ पेन घेतले. माझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून त्या काकांनी मला सांगितलं- "बेटा आता फार देत नाहीत लोक कार्ड्स वगैरे. डायरेक्ट मेसेज करतात. आम्ही नवीन माल तर आणलाच नाहीये." जागतिक बाजारपेठेत आजही कार्ड्सना मागणी आहे पण तरी लोकल बाजारपेठेत फरक झालाय तो जाणवला.
घरून येतानाच रायटिंग पॅड, पट्टी असा लवाजमा घेऊनच आले होते. कार्डवर मजकूर लिहून गिफ्टसोबत कार्डही पॅक करायला २ वाजेच्या आत जायचंही होतं ना. मग काय..त्या दुकानाच्या समोर असलेल्या रिकाम्या जागेत १० मिनिटे निवांत बसून कार्ड शुभेच्छांनी तयार केलं. लग्नाचे मुहूर्त होतेच..मी हे सगळं करत असताना एका लग्नाची वरात समोरून जात होती. कोऱ्या पानावर सहजीवनाच्या शुभेच्छांची छोटी कविता लिहिली. पण तरी समोरच्या पानावरची "special wishes on your Anniversary" ही ओळ अजूनही खटकत होती. " Best Wishes on your Wedding day for Every upcoming Anniversary!" 😊असा संदेश मी कार्डच्या समोरच्या पानावर लिहिला. ठरवल्याप्रमाणे गिफ्ट कार्डसकट पॅक करून कुरिअर केलं. ते वेळेत पोचलं.
काही दिवसांनी मैत्रिणीने ते खूप आवडल्याचं सांगितलं, तेव्हा तो एक तास सार्थकी लागला असं वाटलं. ऍनिव्हर्सरीच्या कार्डवर, भावी लग्न-वाढदिवसांसाठी शुभेच्छा देणं ही तडजोड म्हणून केलेली आयडिया होती.. ठरवून हटके काहीतरी करण्यासाठी केलेली क्रिएटिव्हिटी नाही..हे कदाचित माझ्या मैत्रिणीलाही आजच कळेल. 🙂 असो.
लिखित स्वरूपात स्वतःच्या मनात असलेल्या शुभेच्छा देणं हे हल्ली आऊटडेटेड वाटत असेल काहींना. पण..मला (मला वाटतं अनेकांना) ही गोष्ट कधीच आऊटडेटेड वाटणार नाही.हा..माझी फॅन्टसी कदाचित फॅन्टसीच राहील. 🙂 कार्डवर काय, व्हाट्सअपवर काय आणि इतर कोणत्याही माध्यमातूनही मनापासून शुभेच्छा देणं हे महत्वाचं, पण कार्ड कायम जपलं जातं हे त्याचं वेगळेपण आहे.
कॅलेंडर बदलतं, कालचक्र ठरल्या क्रमाने फिरत राहतं. पण काही चांगल्या गोष्टी कधीच कालबाह्य होऊ नये असं वाटत राहतं..नाही का ? सरत्या वर्षाला निरोप देताना चांगल्या गोष्टी पुढे नेत राहूयात. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा !

#Happy_New_Year_InAdvance

-©अमिता

Wednesday, 21 December 2022

           


           गाडी सिग्नलला थांबली..बाहेर बोचरी थंडी..थकलेले डोळे गार हवेने अजूनच पेंगुळले होते. एवढ्यात जाग आली - त्यांच्या गलक्याने. ते की त्या हे स्पष्ट नसलेले सर्वजण. घोळक्यात एकत्र बसमधे शिरले. सर्वांनी साड्या नेसल्या होत्या. कुणी काठपदराची, कुणी मॉडर्न प्रिंटेड. कुणी  केसांत गजरे माळले होते तर कुणी साधी वेणी घातली होती. कुणी छोटासा पदर घेतला होता तर कुणी दोन्ही खांद्यावरून. बहुधा त्यांचे दोन गट बर्‍याच दिवसांनी एकमेकांना भेटले होते. कुणी बसच्या समोरच्या सीट्सवर, कुणी दरवाज्यात अशा एकूण ७-८ मूर्ती. त्यातली एकजण छोटासा पदर सावरत अगदी हलके हलके चालत एका आसनावर बसली. तिला पाहून इतर जणी हसल्या. त्यांच्या भाषेत अखंड बडबड चालू होती. एकीने परिपूर्ण भारतीय स्त्रीसारखा पण भडक नव्हे..शालीन वाटावा असा सगळा शृंगार केला होता..कानात डूलणारे झूमके, केसांचा अंबाडा, हातात बांगड्या आणि व्यवस्थित नेसलेली साडी. ती सर्वात शेवटच्या सीटवर जाऊन बसली. तितक्यात समोरच्या घोळक्यातली एकजण आनंदाने जवळपास ओरडतच तिच्यापर्यंत जाऊन पोचली..सोबत अजून दोन-तीन जणी.

        त्यांची भाषा कळत नव्हती पण भावना कळत होत्या. खूप दिवसांनी गाठ पडल्याचा आनंद..कसा/कशी आहेस?  हे दोन्हीकडून विचारले जाणारे प्रश्न आणि सांगितलेली ख्यालीखुशाली, एकमेकींना चिडवणं  ..सारं सारं पोचलं. स्त्रीत्व..पौरुषत्व..याच्या पल्याड माणूस म्हणून जी आपुलकी..जो जिव्हाळा वाटतो ना तो खूप खूप खरा वाटला. खरं सांगू...विनाकारण गाठी धरून बसणारी, समोरच्याच्या भावनांची कदर नसणारी माणसं  बघून मनाला झालेल्या वेदनांवर नकळत अलवार अनोळखी फुंकर यावी असं काहीसं झालं. स्त्रीत्व-पुरुषत्वाच्या भिंती अहंकाराच्या गिलाव्याने अजूनच भक्कम करतो ना आपण माणसं ! मग कधीकधी असा सहज संवाद अडकतो त्या भिंतींमध्ये. आणि क्षण उगाच..कठीण होतात.

          काही थांबे (स्टॉप) गेले. नंतर त्या दोघी- तिघी बाकीच्यांना निरोप देत खाली उतरल्या. हातातले मोबाईल उंचावून भेटू..बोलू असं सांगत होत्या. अवघ्या पंधरा- वीस मिनिटांत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं त्यांच्या हावभावांनी नव्हे..फक्त त्या सुंदर संवादाने. गाडी पुढे जात होती तेव्हाही नजरेच्या टप्प्यात आहोत तोवर एकमेकांना लहान मुलांप्रमाणे हात हलवत बाय करणारे ते चेहरे आणि ते भाव खूप निरागस होते. म्हणूनच खूप दिवसांनी मी जेन्युईन..खरं असं काहीतरी पाहून जेन्युइनली हसले. अवतीभोवती रोज बदलत जाणाऱ्या रंगांत हरवायला होतं अशा जगात..आज दिसलेला हा जिव्हाळ्याचा रंग मी कधीही  विसरणार नाही.

-©अमिता

#PMT_Diaries

(PMT - पुणे म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट)

           

       

Saturday, 19 November 2022

सांकव...



माझा जीव घरट्यात
तुला आकाशाचं वेडं
तू गप्प..मी गप्प..
कसं सुटावं रे कोडं?

तुझे पंख मजबूत 
स्वप्न अधीर अधीर 
तुझा वेग सागराचा 
मी हळवा नदीतीर...

तुझ्या करारी डोळ्यांना 
सदा जिंकण्याचा ध्यास 
हार-जीत मज सारखी 
पुरे फक्त एक विश्वास...

भेट पहिलीवहिली
पान-फुलांना स्मरते
हसू विरले हवेत 
सय मनात उरते...

एक झाड..एक फांदी
एक आहे गोतावळा 
तुझा घास..माझा घास 
का वेगळा वेगळा...

सोसून ही पानगळ 
जीव जरी करपतो
खोल अंतरी ओलावा..
कसा..कुठून झिरपतो 

संवादाचा सांकव म्हणे 
मिटवी मोठमोठाले अंतर 
सांजवेळेच्या प्रश्नांना 
कधी मिळेल उत्तर...
                           -©अमिता  

Note:
सय - आठवण
सांकव - पूल (दोन टोकांना जोडणारी गोष्ट)

Video Credit : Namrata Patil

आमच्या मातोश्रींनी लावलेल्या बागेत एकत्र कणीस खाणारी ही जोडी पाहिली..का कुणास ठाऊक..एकमेकांची साथ न सोडणारी पण तरी दोन टोकांना बसलेली ही दोघं/दोघी (माहित नाही! 😊)  मनात राहिली. या कल्पनेतून सुचलेली छोटीशी गोष्ट.

Sunday, 4 September 2022

    


    एखादी व्यक्ती अंतर्मुख (introvert)  असते म्हणजे ती भित्री असते का ? इतरांच्यात मिसळण्यासाठी बोलक्या (extrovert) व्यक्तींपेक्षा थोडा जास्त वेळ घेणारी, काहीशी reserved  वाटणारी माणसं कालांतराने मैत्री झाल्यावर खूप बोलतात हे तुम्ही अनुभवलं असेल. हवा-पाणी, हॉटेलिंग, शॉपिंग यावर काही मिनिटंही न बोलू शकणारी माणसं कदाचित आयुष्यावर, तुमच्या भाव-भावनांवर तासनतास बोलू शकतात. ते चांगले श्रोते असतात, समोरच्याला व्यवस्थित ऐकून घेतात. बरेचदा अशा  माणसांकडे अनेक जण आपलं मन विश्वासाने मोकळं करतात..एखादया सुरक्षित स्थळी ठेव ठेवावी आणि जरा निश्चिन्त व्हावं ना अगदी तसं..! दरवेळी, प्रत्येक विषयावर/घटनेवर उत्स्फुर्तपणे बोलणं जमत नसेल पण अशी माणसं कधीतरी एखाद्या विषयावर एखाद्या व्यासपीठावर सभाधीटपणे बोलू शकतात. मग आजूबाजूच्या माणसांना वाटतं..अर्रे..? याला/हिला बोलताही येतं ? 

        कुणाला असं आश्चर्यचकित करण्याचा हेतू नसतो पण काय होतं.. बहुतेक वेळी अंतर्मुख माणसं इतरांपेक्षा जरा जास्त विचार करतात. संवेदनशील/sensitive असतात.श्रवणक्षमता  (listening skill ) बरी असते . कदाचित आपलं मत मांडण्यापूर्वी ते नीट विचार करतात. एखादा माणूस खूप बोलका आहे म्हणून जसा तो वाईट होत नाही तशीच अंतर्मुख माणसंही आपल्या नैसर्गिक स्वभावानुसार वागत असतात..व्यक्त होत असतात. पण कधीकधी त्यांना चुकीचं समजलं जातं.. कुणी त्यांना शिष्ट समजतं तर कुणी त्यांच्या सावध (cautious)  वागण्याला भित्रेपणाचं लेबल लावतं. पण आजवर ही माणसं स्वतःच स्वतःला सांभाळत आलेली असतात. जग किंवा त्यांना जज करणारी माणसं दर वेळी त्यांच्या मदतीला धावून येत नाहीत . शेवटी या जगात प्रत्येकाला काही गोष्टी स्वतःसाठी स्वतःच कराव्या लागतात हा नियम सर्वांप्रमाणे त्यांनाही लागू होतो.उलट मदत मागण्याचीही भीड बाळगून असल्याने अनेक कामं स्वावलंबनाने करण्याची त्यांना सवय असते. introvert वा थोडी लाजाळू असलेली माणसंही प्रसंगी आपलं प्रामाणिक मत स्पष्टपणे, ठामपणे मांडू शकतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे - याचा त्यांच्या कार्यक्षमतेशी तर मुळीच संबंध नसतो. अगदी नियमित संवादकौशल्याची (कम्युनिकेशन स्किलची)  कामंही ती व्यवस्थित करू शकतात. बोलकी माणसं कधीकधी कमालीची फटकळ  वाटू शकतात.  त्यांचा हेतू कुणाला दुखावण्याचा नसला तरी पटकन बोलण्याने असं होऊ शकतं. पण त्यांच्या मनात काही चुकीचं नसतं हे जितक्या सहजतेने स्वीकारलं जातं ना तसं..अंतर्मुख माणसांच्या सुरुवातीला थोडं reserved असण्याला समजून घेतलं जात नाही. आयुष्यात गतिशीलता जितकी महत्वाची आहे तितकाच 'ठहराव' ही. स्थिरचित्त, calm-composed किंवा क्वचित प्रसंगी  cautious/shy असणं म्हणजे  मंद, मूर्ख असणं नव्हे.. त्यांच्या संयमाला, विनम्रतेला / modesty ला भित्रेपणाचं लेबल लावता कामा नये. 

         सचिन-राहुल आणि विराट या तीन खेळाडूंना विचारात घेतलं तर सचिन आणि राहुल द्रविड म्हणताच समोर येते संयमी खेळी..कुठे व्यक्त होतानाही कमी शब्दात, सौम्यपणे व्यक्त होणं. आपल्या कामावरच्या टीकेवर, कार्यक्षमतेवरच्या प्रश्नांवरही त्यांनी उत्तरं दिली ती आपल्या कामातूनच .विराटकडे मात्र aggression आहे जे एखाद्या नेतृत्वाकडे शोभून दिसतं. अशी अनेक उदाहरणं आहेत. त्यांच्या स्वभावाचे( temperament) हे पैलू मैदानावरच्या त्यांच्या देहबोलीतही सहज दिसतात. आणि तीच त्यांची ओळख आणि स्वतंत्र शैली/युनिक स्टाईल  आहे . या शैलीवरून ते बरे-वाईट खेळाडू ठरत नाहीत. प्रत्येकजण आपापल्या जागी उत्कृष्ट आहे हे त्यांनी केलेले विक्रम(रेकॉर्डस् ) सांगतातच. देवाने/निसर्गाने आपल्यापैकी प्रत्येकाला वेगवेगळी कौशल्य आणि वेगवेळ्या पद्धतीने व्यक्त होण्याची कला दिली आहे त्यानुसार आपण व्यक्त होतो..बरेचदा परस्परविरुद्ध गुण असलेली  माणसं एकमेकांना समजून घेतलं तर  परस्पर-पूरक ठरतात ज्याचा फायदाच होतो. आणि त्यामुळे आपल्या जीवनात आणि एकंदरीत या जगात नावीन्य आहे.समजून घेतली तर इतकी सहज आहे ही गोष्ट!

       शेवटी काय..माणूस समजून घेणं ही मॅगीसारखी इन्स्टंट वाटणारी गोष्ट नाही. 'फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन'  सारख्या  पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या घासून गुळगुळीत केलेल्या गृहीतकांनाही चुकीचं ठरवण्याची क्षमता माणसाच्या भावनांमध्ये आहे. माणसं आपल्यापेक्षा वेगळी असू शकतात, माणूस म्हणून चांगली मूल्य आणि माणुसकी जपणं याशिवाय इतर सगळे निकष (क्रायटेरिया) गौण ठरतात. ती आहेत तशी स्वीकारता येणं ही सुद्धा एक कला आहे. ती अवगत झाली की बहुधा जगणं सोपं होतं..नाही का ?

चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेला बाप्पा माझ्यासहित आपल्या सर्वांची ही कला उत्तम करो ही बाप्पाचरणी प्रार्थना 🙏😊

#DilSe...

-©अमिता 


     

       

Saturday, 9 July 2022

स्मरणिका- (संजीवकुमारजी...)

    




    Actor of all seasons  अशी ख्याती असलेले माझे खूप आवडते अभिनेते म्हणजे- ' संजीव कुमार '(मूळ नाव-हरिभाई जरीवाला). फक्त हिरोच्या भूमिकेतच अडकून न पडता त्याबरोबरच विनोदी,चरित्रभूमिका आणि खास करून आपल्या खऱ्या वयापेक्षा खूप जास्त वय असलेल्या भूमिकाही अत्यंत ताकदीने उभ्या करण्यात त्यांचा हातखंडा होता. ऐन तरुणपणात आपल्यापेक्षा फक्त ४-५ वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्यांच्या वडिलांच्या भूमिका साकारण्यातही त्यांनी संकोच केला नाही. काही ठिकाणी भूमिकेची लांबी (length) कमी असेल पण त्यांच्या नैसर्गिक अभिनयात खोली (depth) मात्र नेहमी तीच होती आणि म्हणूनच समीक्षक आणि प्रेक्षकांना तो (अभिनय )नेहमी भावला. त्यांच्या मृत्यूनंतर (१९८५) सात-आठ  वर्षांनी म्हणजे ९० च्या दशकात जन्माला आलेली आमची पिढीही या कलाकाराला आठवते ही त्यांच्या अभिनयाची जादू आहे. त्यांच्या मुलाखती, आवाज शोधायचा प्रयत्न केला . मुद्रित(print) माध्यमात काही मुलाखती आहेत पण रेडिओ किंवा दूरदर्शनवर असं त्यांच्या आवाजातलं काही ऐकायला मिळालं नाही. याचं एक कारण - त्यांचं वयाच्या ४७व्या वर्षी  झालेलं निधन हेही असावं. आजचा दिवस हा संजीवकुमार साहेबांचा जन्मदिवस!

         खरं तर फक्त त्यांचा अभिनय पाहण्यासाठी मी अनेक सिनेमे शोधून शोधून पहिले.(पाहत राहीन!) आणि हे करत असतानाच ७० च्या दशकातल्या एका अत्यंत सुंदर कलाकृतीची ओळख झाली त्याबद्दलच इथे लिहितेय. चित्रपटाचं नाव आहे - 'अनुभव'  (१९७१).

------------------------------------------------------------------------------------------------------------------

          अमर सेन(संजीव कुमार) आणि मिता सेन (तनुजा)हे एक जोडपं.अमर एका चांगल्या दैनिकाचा एडिटर (संपादक). देखणा,खूप हुशार, नेहमी कामात मग्न असलेला ,उदार (generous) आणि समाजातही चांगली प्रतिष्ठा असलेला असा. त्याचं त्याच्या बायकोवर प्रेम आहे पण तिला देण्यासाठी त्याच्याकडे कमी वेळ आहे.इतका की..अजून त्यांनी फॅमिली सुरु करण्याचा विचारही केलेला नाहीये. गाडी, बंगला, दिमतीला ५-६ नोकर-चाकर हे सगळं असूनही मिताला हल्ली एक रितेपणा वाटतोय.यांत्रिक झालेल्या आयुष्याचा कंटाळा येऊ लागलाय.लग्नाच्या सहाव्या वाढदिवसाच्या पार्टीनंतर तिला वाटतं- की मला एक कुटुंब हवंय.नुसतं एखाद्या हॉटेलसारखं सुसज्ज असं घर नाही, तर.. माणसांना एकमेकांची आणि घराची ओढ वाटावी असं -  'घर' मला हवंय.ती ठरवून घराची सूत्र स्वतःकडे घेते. सर्व नोकरांना दोन महिन्याचे पगार करून दुसरं काम बघा असं सांगून निरोप देते. पण एक खूप जुना आणि स्वामिनिष्ठ नोकर जो अमरच्या लहानपणापासून इथं काम करतोय तो (ए. के. हंगल)  हट्टाने घरात राहतो.  मिताही त्याला परवानगी देते. घरी आल्यावर अमर विचारतो हे सगळं कशासाठी? मिता एक खूप हृदयस्पर्शी प्रश्न विचारते -"अमर, उद्या जर मी या जगात नसले तर तुला काही फरक पडेल? की माझ्यावाचून तुझं काहीच अडणार नाही ?कदाचित नाही अडणार काही " अमर न बोलता तिला जवळ घेतो.अमरचा चेहऱ्यावर क्षणात काळजी, क्षणात प्रेम आणि त्याच क्षणात स्वतःला प्रश्न विचारणारे भाव इतक्या सुरेख पद्धतीने आणलेत संजीव कुमारांनी की बास !! त्या दिवसापासून मिता स्वयंपाक आणि  घर स्वतः बघते. अमरसाठी छोटी छोटी काम करताना ती एन्जॉय करते आणि अमरही !

        आणि त्याच वेळी त्यांच्या आयुष्यात येतो तिसरा माणूस- जो मिताच्या पूर्वायुष्याचा भाग आहे. जवळचा मित्र किंवा कदाचित मैत्रीच्या पलीकडे असलेला कुणीतरी पण आता पूर्णपणे तिच्या भूतकाळात जमा झालेला. ज्याचं नाव आहे 'शशी' जो अमरच्याच ऑफिसात रुजू होतो .त्याची पेपरमध्ये लेख लिहिण्याची शैली आणि टॅलेंट हे अमरला आवडते.मिता आणि शशीच्या पूर्वायुष्यातील मैत्रीबद्दल अनभिज्ञ असलेला अमर त्याला एका मित्रासारखंच वागवतो. एक दिवस मिता पावसात एक खूप सुंदर गाणं अमरसाठी गाते..आणि आपल्या बायकोला इतकं छान गाता येतं हेही आपल्याला इतके दिवस माहित नव्हतं? आपण मिस केलं खूप..आणि कौतुकमिश्रित भाव अमरचे आहेत.गाण्याचे बोल आहेत  "मुझे जान ना कहो मेरी जान.." गुलज़ार साहेबांचे जादुई शब्द, कनू रॉय यांचं प्रसंगाला साजेसं सौम्य, मधुर संगीत आणि गीता दत्त यांचा अद्वितीय (unique),गोड, कमालीचा सुरेल आवाज आणि कलाकारांचा प्रत्येक ओळीला न्याय देणारा अप्रतिम  भावस्पर्शी अभिनय.. (गाण्यात खास करून तनुजाजींचा.. कारण गीता दत्त यांच्या आवाजाला निभावणं हे कौशल्याचं काम आहे !)   एकदा ऐकल्यावर पुन्हा पुन्हा ओठांवर येणारं हे गाणं या चित्रपटाला चार चांद लावणारी गोष्ट आहे.७० चं दशक असल्याने नंतरच्या काळात सहजपणे दिली जाणारी दृश्ये (intimate scenes)नसूनही रोमँटिक..जितकं श्रवणीय तितकंच बघायलाही सुंदर आहे.

       एका किरकोळ आजारपणाचं निमित्त होऊन अमर काही दिवसांची रजा घेऊन घरी राहतो. मिता ज्या पद्धतीने घर सांभाळते, त्याचीही काळजी घेते.. नेहमीच्या व्यस्त वेळापत्रकात कधी नोटीस न केलेलं

तिचं हेही रूप त्याला खूप आवडतं..पूर्वीपेक्षा तो जास्त गुंतत जातो तिच्यात. तीही खुश असते. आता सगळं कसं छान चाललंय असं आपल्याला वाटत असतानाच शशी आणि मिता एकमेकांना पूर्वीपासून जवळून ओळखतात ही गोष्ट अमरला माहित होते आणि मग सुरु होतो संशय. अमरच्या मनात असलेले प्रश्न खूप असूनही कसे विचारावेत हे त्याला कळत नाही. नवऱ्याशी खूप प्रामाणिक असलेली मिता पुढाकार घेऊन संवाद साधते. या टप्प्यावर  अमर- मिता आणि अमर- शशी यांच्या संवादांची  ५-१० मिनिटांचीच छोटी छोटी दृश्य आहेत..ज्यात सगळी किल्मिषं दूर होतात..पाण्यात खडा टाकल्यानं गढूळ झालेलं पाणी जरा वेळाने पुन्हा स्थिर होतं अगदी तसंच..यात कुठेही अतिरंजितपणा, मेलोड्रामा नाही हेच या चित्रपटाचं वेगळेपण आहे. अमर आणि शशी यांचं प्रोफेशनल आणि मैत्रीचं नातं,  मिता-अमर यांचं नातं दोन्हीही अबाधित राहत खूप सुखद नोटवर कथा संपते.न बोलताही त्याच्या किंवा तिच्या मनातली गोष्ट समजते तेव्हा पती-पत्नीचं नातं जास्त प्रगल्भ झालेलं असतं आणि ते तसं असायला हवं. या जोडीचं पुढचं वैवाहिक आयुष्य खूप सुंदर असणार आहे कारण हा अनुभव त्यांचं नातं पूर्वीपेक्षा खूप समृद्ध आणि मजबूत करून गेलाय याची जाणीव प्रेक्षकांना होते.

          यातले संवादही छान आहेत. उत्तम आणि परिणामकारक संवाद, पात्रांचे बदलत जाणारे भाव यामुळे बऱ्याच फ्रेम्समध्ये आपणही त्यांच्यासोबत असतो..काही गोष्टी subtle(सूक्ष्म) आहेत जिथे संवादांपेक्षा हे भावच आपल्या मनात ठराविक चित्र उभं करतात आणि त्याची पडताळणी जसजशी कथा उलगडत जाते तशी होतं जाते. नोकराच्या भूमिकेत असलेल्या ए. के. हंगल साहेबांनीही या दोघांमध्ये सगळं आलबेल आहे की नाही हे पाहण्यासाठी लक्ष ठेवणं, त्यांच्यात काही ठीक  नाही असं वाटून नाराज होणं, ते आनंदी  असतील तर स्वतःही खुश होऊन चोरून हसणं खूप लीलया पार पाडलंय.शशीच्या भूमिकेत असलेल्या दिनेश ठाकूर यांचं कामही परफेक्ट. अत्यंत तरल, सहजपणे खूप काही सांगून जाणारी अशी ही सुंदर कलाकृती आहे. अभिनेत्री तनुजा यांनी एका मुलाखतीत या चित्रपटाचं शूटिंग आम्ही  जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा माझ्या फ्लॅटमध्ये पूर्ण केलं होतं असा उल्लेख केला होता. youtube वर चित्रपट उपलब्ध आहे. सिनेमा ब्लॅक अँड व्हाईट असला तरी खूप कलरफुल  अनुभव देणारा आहे यात शंका नाही.

                             

चित्रपट(हिंदी)  - अनुभव (1971)

लेखक व दिग्दर्शक - बासू भट्टाचार्य

कलाकार - संजीव कुमार, तनुजा

                दिनेश ठाकूर

                ए.के. हंगल  

#Remembering immensely talented, versatile, legendary actor "संजीवकुमार" (हरिहर जरीवाला) on his birth anniversary..(9July1938 - 6Nov 1985)

#AnActorOfAllSeasons❤️💎                                              

                                                                                                        -©अमिता

Sunday, 26 June 2022

         


                  टप टप टप...इतका वेळ तिच्या डोळ्यांत साठलेले अश्रू शेवटी ओघळलेच. ती..म्हटलं तर माझी कुणीच नाही..म्हटलं तर माझी सहप्रवासी..एकाच पीएमटीत प्रवास करत होतो आम्ही. संध्याकाळी ऑफिस, उद्योग-धंदा, काम, संपवून  घरी जायची ओढ प्रत्येकाला असते. बसायला जागा आहे, नाही आहे  याचाही विचार होत नाही या ओढीमुळे. मीही उभीच (standing)  होते एका खांबाला धरून. अन ती दूर पण माझ्या अगदी नजरेसमोर बसच्या पुढच्या भागात, ड्रायव्हरच्या सीटजवळ असलेल्या जागेत बसली होती. 

                  तरुण..विवाहित असावी. आजूबाजूची माणसं आपापल्या तंद्रीत. दिवसभरचा शीणभाग, थकलेले चेहरे. कुणाला वेळ आहे इकडे तिकडे बघायला ?इतक्या गर्दीत अश्रू ढाळत असली तरी हातातल्या रुमालाशिवाय कुणाच्या लक्षातही येत नव्हती ती. आधी खूप विचारात होती..चिंतेत. मग डोळ्याच्या कडा ओलावल्या आणि एका क्षणी बांध फुटला. बसच्या आवाजात, रस्त्यावरच्या कोलाहलात आवाज ऐकू येत नव्हता. वाटलं..कसलं टेन्शन आहे ? नवरा, घरातलं कुणी, बाहेर कुणी काही बोललं असेल का ? जवळ जाऊन पाणी द्यावं का ? पण नको...कधीकधी ना..रडणाऱ्या माणसाची समजूत कशी घालावी कळत नाही..त्यातही आपण एकदम त्रयस्थ..त्याच्याशी काहीही संबंध नसलेले असलो तर अजूनच. त्या वेळी रडणाऱ्या व्यक्तीला अपेक्षा असते कुणा आपल्या माणसाने सांत्वन करण्याची..ऐकून घेण्याची. त्या अश्रूंचं मोल तिच्या आपल्या माणसालाच असावं. आपल्याला कितीही  वाटलं तरी तिच्या वेदनेवर फुंकर घालणारी  तिला अपेक्षित असणारी कुणी व्यक्तीच तिथे हवी असते. माझ्या नकळत मी रडणाऱ्या तिला पाहत राहिले...का कुणास ठाऊक तिला रडू द्यावं , रडून मोकळं होऊ द्यावं असं वाटलं.

             आजूबाजूला काय घडतंय, कोण काय करतंय याची पर्वा न करता मनात आलं की  रडता येणं हेही सर्वांना प्रत्येक वेळी जमेलच असं नाही. अशा वेळी आपल्यालाही आपली एखादी दुखरी बाजू आठवते..कसलं शल्य आठवतं..टोचणारी, लागलेली एखादी गोष्ट आठवते. एखादं अपयश, एखादा पचवलेला नकार, आपली भावना चांगली असली तरी जगाने आपल्याला चुकीच्या पद्धतीने जोखलं..जज केलं आणि आपण काही करू शकलो नाही..एक ना दोन अनेक. कुणाच्या अश्रूंमध्ये आपण आपले न वाहिलेले अश्रू अनुभवून घेतो मग. हे असं काही मला वाटलं त्यानंतर वपुंचा एक विचार वाचायला मिळाला -" प्रत्येक वेळेला रडणाऱ्याचं सांत्वन करता येतंच असं नाही. त्याची जाणीव रडणाऱ्याला नसते. केव्हाही आपले डोळे कोरडे करायला आपली आवडती व्यक्ती जवळ यावी असं तिला वाटतं. पण काही वेळेला रडण्यापेक्षा सांत्वन करणाऱ्या माणसावरच जास्त ताण पडलेला असतो ."  केवढं तंतोतंत ! लेखक म्हणून वपु आवडण्याचं हे एक कारण. असो.

               दोघीही बसमधून उतरलो एकाच थांब्यावर..बाहेर अंधार झाला होता..मी मूक सोबती होते फक्त.तिच्या डोळ्यातलं पाणी अजूनही चमकत होतं. तिनं डोळे पुसले. बरं वाटलं.. स्वतः डोळे पुसून उभं राहणं हेच महत्वाचं आहे. आम्ही आपापल्या वाटांकडे वळलो. आपल्या माणसानं जपलेला आपला अश्रू भविष्यात आपल्याला  मोती भासू  शकतो. देव करो ..तिच्या आपल्या माणसानं तिला समजून घ्यावं. आणि उद्याच्या दिवसात हसण्यासाठी तिला एकतरी सुंदर कारण मिळावं.

-©अमिता 

#PMTDiaries...

           

Sunday, 19 June 2022

रुजवात...

           


         दोन आठवड्यांपूर्वी गावाहून पुण्यात आले. वर्क फ्रॉम होमचा विस्तार होऊन वर्क फ्रॉम गाव असा झाला होता माझ्यासाठी काही काळ. तब्बल सहा महिन्यांनी घराचा दरवाजा उघडला. जिन्याच्या पायऱ्यांवर पालापाचोळा, धूळ. नेहमी रांगोळी असलेल्या फ्लॅटच्या दारात त्या रिकामेपणामुळे आलेली शांतता..आणि जणू आमच्या वाटेकडे डोळा लावून बसलेलं दरवाज्याला लावलेलं कुलूप. ते उघडताच दरवाजाही कुरकुरलाच.."व्वा..इतक्या दिवसांनी ?" असं पुटपुटत तर नाहीये ना? असं उगाच वाटून गेलं.

          कशी असतो ना आपण माणसं..राहतो त्या  वास्तूत, तिथल्या वस्तू , भिंती यांच्यातही मन गुंतवून ठेवतो. आपलं माणूस घरी सोडून आपण बाहेर कुठं जाताना तर थोडं गहिवरायला होतंच. पण मला तर  सर्वांसोबत खूप दिवसांसाठी बाहेर  कुठे जायचं असेल, तेव्हा घरी कुणी राहणार नाहीये हे माहित असूनही  रिकाम्या घराला कुलूप लावताना क्षणभर जरा कालवाकालव होते. तुम्हीही हे अनुभवलं असेल. दरवाजा उघडताच धुळीने माखलेली फरशी, जळमटं अंगावर घेऊन नाराज असाव्यात अशा भिंती यांनी नाखुशीनेच स्वागत केलं. आईची पावलं सर्वात आधी गेली टेरेसकडे.. तिनं लावलेल्या झाडांकडे. रिकाम्या कुंड्या, पाण्याअभावी जळून गेलेली रोपं, उजाडलेली बाग आणि सगळीकडे धूळच धूळ. बघून कसंतरीच वाटलं. घराला घरपण येतं ते माणसांच्या अस्तित्वामुळं, त्यांच्या तिथल्या वावरामुळं. माणसांविना राहिलेलं घर..खरंच तिथे चांगली ऊर्जा  (पॉझिटिव्ह व्हाइब्स) नसते हे क्षणाक्षणाला जाणवत होतं. मग काय..दोघींनीही हातात झाडू घेतला. सर्वात आधी घर आणि मोकळी  जागा झाडून काढली. कितीतरी दिवसांनी हात फिरत होता घरावर, भिंतींवर..पाणी आणि माणसं दोघांशीही भेट नव्हती ती झाली,. धुवून, फरशी पुसून सगळं चकाचक केलं. सगळं आवरेपर्यंत दुपार संपून गेली होती, मग निवांत जेवण केलं.सकाळी रुसलेलं घर आता मोकळा श्वास घेऊन प्रसन्न झाल्यासारखं वाटू लागलं होतं.  हे बघून 

        "पत्थरों में भी ज़बाँ होती है, दिल होते हैं

        अपने घर के दरो-दीवार सजाकर देखो.."  या  निदा फाजलींच्या सुंदर ओळी आठवल्या अन खऱ्या वाटल्या.

            या आठवड्यात वर्क फ्रॉम होम संपवून प्रत्यक्ष ऑफिसात जायला सुरुवात केली. त्याच वाटा, तेच रस्ते, तीच पीएमटी..पण जवळपास दोन वर्षानंतर हे सगळं परत एकदा नव्याने अनुभवत होते (Revisit) .मार्च २०२० मध्ये वर्क फ्रॉम होम सुरु झालं तेव्हा हे फार दिवस टिकेल याची कल्पना केली नव्हती. माझ्या डेस्कवर बाप्पाची एक खूप छान मूर्ती होती. पुन्हा लवकर येऊच म्हणून मी ती घरी घेऊन आले नव्हते. चांगलं आठवतंय..सगळं ऑफिस रिकामं होतं असताना त्या मूर्तीला हातात घेऊन मी रिकाम्या घराला बघते तसंच ऑफिसमध्येही बघत होते, न जाणो काय होईल, परत कधी येऊ असं मनात येऊन एक अनामिक भीती वाटली होती तेव्हा..क्षणभरच. हे सगळं आता परत आठवलं. एवढ्या काळात काही बदल झाले आहेत. कुणासाठी प्रोजेक्ट चेंज, कुणासाठी टीम चेंज तर कुणासाठी कंपनीही बदलली आहे. ऑफिसमध्ये नेहमी माझ्यासोबत असणाऱ्या एका मैत्रिणीची प्रकर्षाने आठवण आली, जी आता दुसऱ्या कंपनीत आहे. माझ्यासाठी एका टीम मधून दुसरीकडे असा बदल झाला होता. गेलं वर्षभर ज्या नव्या टीममध्ये काम करतेय त्या सर्वांशी रोज कामानिमित्त व्हर्च्युअलीच बोलणं होत होतं. त्या सर्वांना प्रत्यक्ष भेटले, वेगळं आणि  चांगलं वाटलं. आपलं रोज संभाषण होतं ती माणसं शेजारी असली तरी ओळखू येतं नव्हती, "अच्छा.. तू अमिता..तू अमुक.." असं भेटणं-बोलणं चालू होतं. आधी एकमेकांना ओळखणाऱ्या माणसांकडून  "ए ,तू बारीक झालीयेस" , "तू जाड झालायेस ", "लुक चेंज हा..!" असे संवाद कानावर पडत होते. 

          कधीकधी आयुष्य अशा वळणावर आणून सोडतं की सगळीकडे लहान-मोठे बदल एकाच वेळी होताहेत हे जाणवतं. उत्साह आणि  काळजी दोन्हीही एकत्र होतात.आयुष्याच्या पुस्तकाचं पुढचं पान सुरु होणार की काय..आणि त्यावर काय आहे हे माहीत नाही अशी भावना असते ती. दुपारी डेस्क आणि इतर साफ-सफाई करणारा स्टाफ आला. त्यातल्या एक मावशी फार ओळखीच्या झाल्या होत्या. आमच्या वाढदिवसाच्या मिठाया, चॉकलेट्स, त्यांचे-आमचे अनुभव असं काय-काय शेअर करायचो आम्ही. माझ्यासारखीच त्यांच्याही कामातली एखादी मैत्रीण आता त्यांच्यासोबत नव्हती बहुधा. कोरोनाच्या काळात अनेक माणसं कायमसाठी निघून गेली. त्या सगळ्या वातावरणातून आपण सर्वजण गेल्यावर आता - आपण ओळखतो अशी माणसं दिसली, भेटली की आपसूकच बरं वाटतं. feels good ..हा भाव उमटतो. तसंच काहीसं वाटून आम्ही दोघीही एकमेकींकडे बघून हसलो. "मॅडम, तुम्ही पाचव्या फ्लोअरवर होत्या ना..आता इथे वरच्या फ्लोअरवर ?" त्यांनी जवळ येऊन विचारलं .दोघींनी एकमेकींची ख्याली-खुशाली विचारणं झालं.पुन्हा एकदा बरं वाटलं.दिवस धावपळीचा गेला तरी अवतीभोवती माणसांचं असणं, पुन्हा तेच रुटीन नव्याने अनुभवणं यामुळे बॅक टू नॉर्मलला आल्यासारखं वाटलं. ऑफिसच्या आणि आयुष्याच्याही एकूण सिस्टिमचं रिस्टार्ट बटन जणू प्रेस झालंय.

           आता हळूहळू कुंड्यांमधल्या रोपांना पाणी आणि माणसांचा स्पर्श मिळू लागलाय. छोटी-मोठी रोपं फुलू पाहत आहेत. सध्या मोकळ्या असलेल्या बागेत एखाद-दुसरं लिलीचं फूल हसताना दिसतंय. खूप भयाण शांततेनंतर, पानगळीनंतर पुन्हा एकदा रुजवात होतेय हे बघणं आता या घरात पॉझिटिव्ह व्हाइब/ऊर्जा देतंय. गोष्टी घडतात-बिघडतात. आयुष्य थांबलंय (स्टक झालंय) की काय असं वाटत असताना या मातीकडे पाहिलं की सृष्टीत चालणारं सृजन आठवतं. मातीचं भिजणं, अंकुराचं रुजणं आणि पृथ्वीचं सजणं हे चक्र अव्याहतपणे चालू आहे , मग आपण त्याची नोंद घेवो की न घेवो. मोठ्या कॅनव्हासवर दिसणारं हेच चित्र आपल्या आयुष्याशी साधर्म्य साधतं, रिलेट होतं तेव्हा या गोष्टी जास्त जाणवतात.

            आकाशाच्या मनात ढगांची पुन्हा घालमेल होईल..कुण्या एका क्षणी ती संपेल. कुठून गार वारा येईल..आणि थेंब बरसतील.. अंधारलेल्या आकाशात कधीतरी इंद्रधनुचे रंग उमटतील. बरा-वाईट काळ अनुभवत असतानाही आपण माणसं जीवन जगण्याची इच्छा टिकवून असतो. आणि सृजन (निर्मिती) करणाऱ्या या गोष्टी रुजू पाहणाऱ्या स्वप्नांना बळ देतात..आणि आपली जगण्याची इच्छा जिवंत ठेवतात. नाही का ?

                                                                                                                                                                                              -©अमिता 

                                                                         P.C- (yellow lily)Namrata Patil

  

Monday, 7 March 2022

   


       कोणे एके काळी आई पार्वतीने भगवान शंकराशी आपला विवाह व्हावा म्हणून तप केलं होतं म्हणे. कारण तिचा हा हट्ट तिच्या वडिलांना मान्य नव्हता . भगवान विष्णूसारखी स्थळं येत असताना देव असला तरी तुलनेत दिसणारी संपत्ती कमी आहे म्हणून त्याला नाकारणारा तिचा पिता. कलियुगात असं तप करता येतं का ? हट्ट, प्रतीक्षा, विनवण्या ,नाराजी हे सहन करणं हेच तप असावं या काळात पण प्रत्येकीलाच त्यात यश मिळेल असं नाही.

     खरं तर मुलगी कमावती असो किंवा न कमावणारी , तिच्यापेक्षा जास्त कमावणारा, सो कॉल्ड स्टेबल (स्थिरावलेला) म्हणता येईल असाच मुलगा मिळणं म्हणजे खूप मोठ्ठी आणि अत्यावश्यक गोष्ट आहे हाच समज आपल्याकडे आजही आहे. त्यात फार गैर असं नसेल पण कुण्या मुलीने स्वतः पैश्यांपेक्षा माणसाची माणुसकी, विचार या गोष्टींचा विचार करून एखाद्या मुलाला पसंती देणं आपल्याकडे मूर्खपणाचं लक्षण समजलं जातं. अर्थात यात शिकण्याच्या अल्लड वयात शिक्षण सोडून कसलाही विचार न करता पळून जाणाऱ्या, आणि नंतर पश्चात्ताप करणाऱ्या लोकांचा मोठा वाटा आहे. त्यांनी त्यांचा निर्णय त्यांच्यापुरता घेतला असला तरी एखाद्या प्रगल्भ मुलीने असा स्वतःपेक्षा जरा बीस-उन्नीस कमी मुलाला पसंती दर्शवली की स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा करणाऱ्या, ऐकणाऱ्या आदरणीय वरिष्ठ पिढीचा त्रास वाढतो. अशा लोकांची उदाहरणं मग पावलोपावली दिली जातात. खरं तर त्याची काही गरज नसते. इतकं हे मुलगा सर्व पातळींवर  श्रेष्ठ  'सुपेरीअर' (superior) असावा हे भूत आपल्याकडे आहे. पण याउलट याच हट्टाने एखाद्या मुलीचं लग्न जमत नसेल तर कर ना अडजस्टमेन्ट म्हणून तिच्या मागे लागणारीही हीच मंडळी असतात. थोडक्यात काय, तुझं मन, तुझी इच्छा, तुझी तयारी यापेक्षा ही गणितं महत्वाची ठरवली जातात. गंमत म्हणजे जास्त शिकलेल्या मुलींना या अडचणी जास्त येतात. फक्त पॅकेज, पगार , संपत्ती याशी लग्न करण्याची त्यांची इच्छा मुळीच नसते. अर्थात त्यांचं  हित त्यांना कळत असल्याने अगदीच विजोड निवड त्यांचीही नसते पण पगाराची फूटपट्टी घेऊन निवड करणं त्यांना मान्य नसतं, कर्तृत्वाने, प्रयत्नाने प्रगती होते, संधी मिळतात हे व्यवहारज्ञान त्यांना अनुभवाने मिळालेलं असतं. आणि तशी साथ देण्याची त्यांची तयारीही असते. स्वावलंबनाने कमवत असल्याने असेल कदाचित पण कदाचित माझ्या कुटुंबाला माझी गरज पडली तर मीही समर्थ आहे हा विश्वास त्यांना असतो. वर ती थोडंफार जास्त कमवणारी असेल (किमान आज ) तरी आज ना उद्या यात खंड पडेल, कुटुंबाच्या दृष्टीने कदाचित ती काही काळ कामापासून दूर राहू शकते हेही तिच्या डोक्यात असतं आणि तिला मान्यही असतं.

     पण असा थोडाफार वेगळा विचार करणाऱ्या मुली त्यांच्या पालकांना, कुटुंबाला, तिच्या आयुष्याशी काहीही घेणं-देणं नसलेल्या आजू-बाजूच्या चार लोकांना अविचारी वाटतात. मग तिच्या इच्छांना तिच्या घरातलीच पूरूष मंडळी ज्यांना ती आपली सपोर्ट सिस्टीम समजत असते ती मंडळी सुरुंग लावतात. कधी दुर्लक्ष करतात , कधी आवाज गप्प करतात, कधी खोट्या प्रतिष्ठेची कारणं देतात. कधी तिच्या आयुष्यातल्या स्त्रियाही तिला याबाबतीत समजून घेत नाहीत. तरी ती एकटी लढत राहते.यापाठीमागची त्यांची काळजीही समजते पण काळजी करता करता अहंकारापायी  सुवर्णमध्य काढायचं सोडून अनावश्यक गोष्टी होतात हे वाईट.

     कधीकधी काय होतं, तिच्या प्रतिक्षेचा पाचोळा होतो . कारण वेळ ही अशी गोष्ट आहे की २४ तास सर्वांना मिळत असले तरी ते सर्वांसाठी सारखे नसतात. वेळ जुळवण्याचा धडपडीत कधीतरी ती हरते. ज्या क्षणांची वाट पाहण्यात खूप वेळ लागला ते क्षण, ती संधी फक्त झलक दाखवून निघून जाते. ती आटापिटा करत राहते पण जिंकण्याची खात्री आता तिनेही सोडलेली असते. घरातली कामं, ऑफिसची कामं, जबाबदाऱ्या,  आवडी , छंद सगळ्या बाबतीत कौतुक ऐकत असली तरी तरी आपल्या इच्छेचं मोल कुणाला नाही ही जाणीव तिच्या जाणिवांना मारून टाकते. आजवर आई-वडील, कुटुंब, गुरुजन तिची आपली माणसं यांचा मान राखून त्यानं कधी खाली बघावं लागू नये म्हणून तिनं केलेल्या तडजोडी, तिनं पाळलेली मर्यादा सारं सारं तिला व्यर्थ वाटू लागतं. पण म्हणतात ना प्रामाणिकपणा हे एक व्यसन आहे ज्याला हिंदीत 'लत' म्हणतात. ज्यांना ती असते ती सुटणं कठीणच. तिला वाटतं टोकाचं व्यवहारीच असलेलं बरं, दुनियादारी शिकून घ्यायला हवी पण छे! तिला माहित असतं टोकाची दुनियादारी या जन्मात तरी जमणार नाही.

    कुठेतरी वाचलेल्या ओळी तिला आठवतात- 'आयुष्याच्या कपड्याला सुरकुत्या (आढ्या) पडल्या असतील तरी उत्साहाची इस्त्री फिरवली कि त्या जाऊ शकतात. ती स्वतःशीच बडबडते "सुरकुत्यांची, आढ्यांची  कुणाला भिती आहे ? फक्त दुसऱ्या कुणी तो कपडा कुस्करु नये, फाडू नये इतकंच."या सगळ्या विचारानं थोडी हताश, थोडी निराश, थोडी थकलेली ती उद्याच्या कामाचा यादी मनात करत  असते. कधी एखाद्या निरागस चिमुकल्यावर माया करते. मनात विचारांचं वादळ चालू असताना वर शांत दिसत असते. मोबाईल, सोशल मीडिया, इनबॉक्सात महिलादिनाचे मेसेज, शुभेच्छा ओसंडून वाहत असतात. ती मोबाईल उचलते, तिच्यासकट तिच्यातली वेदनाही हसते आणि ती शुभेच्छांवर उत्तरते - "थँक यू!" आणि सृष्टीला जन्माला घालणाऱ्या , न पाहिलेल्या तरी आपल्या वाटणाऱ्या शक्तीला स्मरून सज्ज होते पुढच्या प्रवासासाठी..चालत राहण्यासाठी ...

                                                                                                                                              -© अमिता

अनेक अपवादात्मक उदाहरणं आहेतच ही चांगली बाब आहे . हा नाण्याची दुसरी बाजू दाखवण्याचा प्रयत्न..मित्रांनो, भावांनो, विशेष करून आई-बाबा, काका -मामा म्हणवणाऱ्या जेष्ठ वंदनीय पिढीतल्या लोकांनो किमान शिकलेल्या मुलींनी विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयांना किमान विचारात घेण्याचं औदार्य माणूस म्हणून आपण दाखवलं पाहिजे ही कित्येक मुलींची इच्छा असेल हे नक्की.

#अजूनही_रात्रंदिन_आम्हा_युद्धाचा_प्रसंग  

#Happy_Women's_Day