दोन आठवड्यांपूर्वी गावाहून पुण्यात आले. वर्क फ्रॉम होमचा विस्तार होऊन वर्क फ्रॉम गाव असा झाला होता माझ्यासाठी काही काळ. तब्बल सहा महिन्यांनी घराचा दरवाजा उघडला. जिन्याच्या पायऱ्यांवर पालापाचोळा, धूळ. नेहमी रांगोळी असलेल्या फ्लॅटच्या दारात त्या रिकामेपणामुळे आलेली शांतता..आणि जणू आमच्या वाटेकडे डोळा लावून बसलेलं दरवाज्याला लावलेलं कुलूप. ते उघडताच दरवाजाही कुरकुरलाच.."व्वा..इतक्या दिवसांनी ?" असं पुटपुटत तर नाहीये ना? असं उगाच वाटून गेलं.
कशी असतो ना आपण माणसं..राहतो त्या वास्तूत, तिथल्या वस्तू , भिंती यांच्यातही मन गुंतवून ठेवतो. आपलं माणूस घरी सोडून आपण बाहेर कुठं जाताना तर थोडं गहिवरायला होतंच. पण मला तर सर्वांसोबत खूप दिवसांसाठी बाहेर कुठे जायचं असेल, तेव्हा घरी कुणी राहणार नाहीये हे माहित असूनही रिकाम्या घराला कुलूप लावताना क्षणभर जरा कालवाकालव होते. तुम्हीही हे अनुभवलं असेल. दरवाजा उघडताच धुळीने माखलेली फरशी, जळमटं अंगावर घेऊन नाराज असाव्यात अशा भिंती यांनी नाखुशीनेच स्वागत केलं. आईची पावलं सर्वात आधी गेली टेरेसकडे.. तिनं लावलेल्या झाडांकडे. रिकाम्या कुंड्या, पाण्याअभावी जळून गेलेली रोपं, उजाडलेली बाग आणि सगळीकडे धूळच धूळ. बघून कसंतरीच वाटलं. घराला घरपण येतं ते माणसांच्या अस्तित्वामुळं, त्यांच्या तिथल्या वावरामुळं. माणसांविना राहिलेलं घर..खरंच तिथे चांगली ऊर्जा (पॉझिटिव्ह व्हाइब्स) नसते हे क्षणाक्षणाला जाणवत होतं. मग काय..दोघींनीही हातात झाडू घेतला. सर्वात आधी घर आणि मोकळी जागा झाडून काढली. कितीतरी दिवसांनी हात फिरत होता घरावर, भिंतींवर..पाणी आणि माणसं दोघांशीही भेट नव्हती ती झाली,. धुवून, फरशी पुसून सगळं चकाचक केलं. सगळं आवरेपर्यंत दुपार संपून गेली होती, मग निवांत जेवण केलं.सकाळी रुसलेलं घर आता मोकळा श्वास घेऊन प्रसन्न झाल्यासारखं वाटू लागलं होतं. हे बघून
"पत्थरों में भी ज़बाँ होती है, दिल होते हैं
अपने घर के दरो-दीवार सजाकर देखो.." या निदा फाजलींच्या सुंदर ओळी आठवल्या अन खऱ्या वाटल्या.
या आठवड्यात वर्क फ्रॉम होम संपवून प्रत्यक्ष ऑफिसात जायला सुरुवात केली. त्याच वाटा, तेच रस्ते, तीच पीएमटी..पण जवळपास दोन वर्षानंतर हे सगळं परत एकदा नव्याने अनुभवत होते (Revisit) .मार्च २०२० मध्ये वर्क फ्रॉम होम सुरु झालं तेव्हा हे फार दिवस टिकेल याची कल्पना केली नव्हती. माझ्या डेस्कवर बाप्पाची एक खूप छान मूर्ती होती. पुन्हा लवकर येऊच म्हणून मी ती घरी घेऊन आले नव्हते. चांगलं आठवतंय..सगळं ऑफिस रिकामं होतं असताना त्या मूर्तीला हातात घेऊन मी रिकाम्या घराला बघते तसंच ऑफिसमध्येही बघत होते, न जाणो काय होईल, परत कधी येऊ असं मनात येऊन एक अनामिक भीती वाटली होती तेव्हा..क्षणभरच. हे सगळं आता परत आठवलं. एवढ्या काळात काही बदल झाले आहेत. कुणासाठी प्रोजेक्ट चेंज, कुणासाठी टीम चेंज तर कुणासाठी कंपनीही बदलली आहे. ऑफिसमध्ये नेहमी माझ्यासोबत असणाऱ्या एका मैत्रिणीची प्रकर्षाने आठवण आली, जी आता दुसऱ्या कंपनीत आहे. माझ्यासाठी एका टीम मधून दुसरीकडे असा बदल झाला होता. गेलं वर्षभर ज्या नव्या टीममध्ये काम करतेय त्या सर्वांशी रोज कामानिमित्त व्हर्च्युअलीच बोलणं होत होतं. त्या सर्वांना प्रत्यक्ष भेटले, वेगळं आणि चांगलं वाटलं. आपलं रोज संभाषण होतं ती माणसं शेजारी असली तरी ओळखू येतं नव्हती, "अच्छा.. तू अमिता..तू अमुक.." असं भेटणं-बोलणं चालू होतं. आधी एकमेकांना ओळखणाऱ्या माणसांकडून "ए ,तू बारीक झालीयेस" , "तू जाड झालायेस ", "लुक चेंज हा..!" असे संवाद कानावर पडत होते.
कधीकधी आयुष्य अशा वळणावर आणून सोडतं की सगळीकडे लहान-मोठे बदल एकाच वेळी होताहेत हे जाणवतं. उत्साह आणि काळजी दोन्हीही एकत्र होतात.आयुष्याच्या पुस्तकाचं पुढचं पान सुरु होणार की काय..आणि त्यावर काय आहे हे माहीत नाही अशी भावना असते ती. दुपारी डेस्क आणि इतर साफ-सफाई करणारा स्टाफ आला. त्यातल्या एक मावशी फार ओळखीच्या झाल्या होत्या. आमच्या वाढदिवसाच्या मिठाया, चॉकलेट्स, त्यांचे-आमचे अनुभव असं काय-काय शेअर करायचो आम्ही. माझ्यासारखीच त्यांच्याही कामातली एखादी मैत्रीण आता त्यांच्यासोबत नव्हती बहुधा. कोरोनाच्या काळात अनेक माणसं कायमसाठी निघून गेली. त्या सगळ्या वातावरणातून आपण सर्वजण गेल्यावर आता - आपण ओळखतो अशी माणसं दिसली, भेटली की आपसूकच बरं वाटतं. feels good ..हा भाव उमटतो. तसंच काहीसं वाटून आम्ही दोघीही एकमेकींकडे बघून हसलो. "मॅडम, तुम्ही पाचव्या फ्लोअरवर होत्या ना..आता इथे वरच्या फ्लोअरवर ?" त्यांनी जवळ येऊन विचारलं .दोघींनी एकमेकींची ख्याली-खुशाली विचारणं झालं.पुन्हा एकदा बरं वाटलं.दिवस धावपळीचा गेला तरी अवतीभोवती माणसांचं असणं, पुन्हा तेच रुटीन नव्याने अनुभवणं यामुळे बॅक टू नॉर्मलला आल्यासारखं वाटलं. ऑफिसच्या आणि आयुष्याच्याही एकूण सिस्टिमचं रिस्टार्ट बटन जणू प्रेस झालंय.
आता हळूहळू कुंड्यांमधल्या रोपांना पाणी आणि माणसांचा स्पर्श मिळू लागलाय. छोटी-मोठी रोपं फुलू पाहत आहेत. सध्या मोकळ्या असलेल्या बागेत एखाद-दुसरं लिलीचं फूल हसताना दिसतंय. खूप भयाण शांततेनंतर, पानगळीनंतर पुन्हा एकदा रुजवात होतेय हे बघणं आता या घरात पॉझिटिव्ह व्हाइब/ऊर्जा देतंय. गोष्टी घडतात-बिघडतात. आयुष्य थांबलंय (स्टक झालंय) की काय असं वाटत असताना या मातीकडे पाहिलं की सृष्टीत चालणारं सृजन आठवतं. मातीचं भिजणं, अंकुराचं रुजणं आणि पृथ्वीचं सजणं हे चक्र अव्याहतपणे चालू आहे , मग आपण त्याची नोंद घेवो की न घेवो. मोठ्या कॅनव्हासवर दिसणारं हेच चित्र आपल्या आयुष्याशी साधर्म्य साधतं, रिलेट होतं तेव्हा या गोष्टी जास्त जाणवतात.
आकाशाच्या मनात ढगांची पुन्हा घालमेल होईल..कुण्या एका क्षणी ती संपेल. कुठून गार वारा येईल..आणि थेंब बरसतील.. अंधारलेल्या आकाशात कधीतरी इंद्रधनुचे रंग उमटतील. बरा-वाईट काळ अनुभवत असतानाही आपण माणसं जीवन जगण्याची इच्छा टिकवून असतो. आणि सृजन (निर्मिती) करणाऱ्या या गोष्टी रुजू पाहणाऱ्या स्वप्नांना बळ देतात..आणि आपली जगण्याची इच्छा जिवंत ठेवतात. नाही का ?
-©अमिता
P.C- (yellow lily)Namrata Patil

No comments:
Post a Comment