Tuesday, 19 December 2017


अथांग तू ,अपार तू
पाहून एकदाच तृप्त कसे व्हावे ?
मी लाख ओंजळ करीन,
पण तू हाती कसे यावे ?
व्यथा हीच माझी, तुला का कळली होती..?
उगाच नव्हती साथ देत - मला तुझीच रेती..!
होऊन लाट उसळलास,अन भिजवलीस रे काया
डोळ्यांच्या या शिंपल्यांत मी,
साठवली तुझी निळीशार माया...
धीरगंभीर गुज तुझे, अजून घुमते कानी
रोज ऐकतोस ना तू - कुण्या वेड्या जिवाची कहाणी..
कोरल्या अक्षरांना माझ्या ,स्पर्शून तुझ्यात स्थान दे ,
रिता रिता हा हृदयकलश,
 त्यास विशालतेचं दान दे...!!!
#यूँही...
                                             -अमिता

Thursday, 9 November 2017



मै ठहरू तो चले ,मै चलू तो भागे वो
हररोज कहानी ये होती है..
फिसले रेत-सा कभी..और जी लिया तो मोती है..
वक्त से ही लडाई और वक्त से ही दोस्ती है
वक्त ने ही कीमतें दे रखी है जहाँ को
यूँ तो..जिंदगी भी यहाँ बडी सस्ती है...


#Time_Is_Precious
#यूँही...
                                                 - अमिता

Sunday, 22 October 2017

वाटणी...



     

   
   मध्यान्ह टळून गेली होती. दुपारचं जेवण उरकून तिनं पसारा आवरला. झाकपाक करून झाली. दूध जरा निवल्यावर दुधावरची साय तिनं विरजणात घातली. वर्षानुवर्षे ही निगुतीची कामं करत आलीय - सत्तरीतली राधाबाई. घरात सुना आल्यावर स्वयंपाक, जेवणखाण जास्त बघायची वेळ शक्यतो आली नाही पण नुसतंच बसून राहणं तिला पटत नाही. दोन वर्षांपूर्वी घराची, शेताची वाटणी तीन मुलांमध्ये झाली. त्यात धाकट्या मुलाकडे- गावातल्या ज्या घरात इतकी वर्षे संसार केला तिथंच राहायचं तिनं निवडलं. सध्या बाळंतपणासाठी माहेरी गेलेल्या सुनेच्या गैरहजेरीत घर, धाकटा लेक आणि नातवासाठी जेवणखाण वगैरे जमेल तसं ती पाहत होती.
     चुलीतली लाकडं मागे ओढून तिनं ती विझवली. परवा दिवाळसणासाठी स्वतःच्या हातांनी तिनं ही चूल पोचारली होती- त्याच जुन्या उत्साहाने. याच चुलीवर दिवाळीच्या, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुला-नातवंडांसाठी काय काय रांधलं होतं आजवर ! लहान होती तेव्हा दोन्ही लेकींची मुलं सुट्ट्यांमध्ये यायची. आजीच्या हातची जाड भाकर, ठेचा, मातीच्या तवल्यांमध्ये(मोठ्या गाडग्यांमध्ये)  केलेली कढी, डाळींची वरणं, हाताने घुसळलेलं डेऱ्यातलं ताक- सारं सारं आवडीनं खायची. चार-आठ दिवसांत घराचं भरलं गोकुळ होऊन जायचं. आता लेकींची पोरंही मोठी झाली. शिक्षणं,नोकऱ्या, त्यांना न मिळणाऱ्या रजा ही सगळी न येण्याची कारणं तिला माहीत होती. ती खरी असली, पटत असली तरी -आता बऱ्याच गोष्टी पूर्वीसारख्या राहिल्या नाहीत म्हणून लेकी अन त्यांची मुलं म्हणजे तिची नातवंडं सारखं-सारखं येण्याचं टाळतात हे ती जाणून होती. कधीतरी लेकी येतात. कधी आपण त्यांच्या घरी जावं तर नातवंडं खूप दिवस रहा म्हणून हट्ट करतात पण मन कायम रमणार नाही तिकडं. भेटणं- बोलणं, राहणं झाल्यावर गाव, हा वाडा, घर, ओसरी, चुकलेली निगुतीची कामं साद घालतात. अन ती परतते. पण तिचं मन म्हणतंच- "अरे, बाकीच्यांचं जाऊ द्या, पण या जुन्या खोडासाठी तरी दोन दिवस या..त्यालाही आधाराची गरज भासते कधीकधी. या पिकल्या पानाला फक्त भेटायला या. कधी गळून पडेल याचा काय नेम ?
   चुलीत काही निखारे अजूनही फुरफुरत होते. निखाऱ्यांकडं पाहताना तिला उगीच वाटून गेलं- घरातली माणसंही अशी निखाऱ्यांसारखी झालीयेत का ? जवळ आली अन चुकून हवेची फुंकर मिळाली तर पेट घ्यायची..म्हणून जवळ येणंही नको अन पेटणंही नको. पण आगीचा उपयोग आपल्या हातात असतो ना..सगळं जाळून राख करणारी आग - अन्न शिजवून आपल्या पोटातली आग विझवूही शकते ना ! पण हे समजलं असतं तर ती ज्यांच्याकडे राहत नाही त्या दोन लेकांनी परवा एकाच गावात, एकाच शेतात राहून लक्ष्मीपूजनाचे वेगवेगळे पाट मांडले असते का ? बरं मांडले तर मांडले..पण लक्ष्मीची किंमत करण्याची अक्कल येण्याआधीपासून जिनं सांभाळलं त्या आईला भेटून आशीर्वाद घ्यावा असं वाटू नये कुणालाही ? परवा नैवेद्यासाठी पुरणपोळ्या करताना मनात कुठेतरी आशा होतीच- कुणी येईल. दिवे लागले, सारं गाव उजळून निघालं तशी आशा अजून वाढली. दिवे वाट पाहून विझून गेले पण पाया पडायला दूर, भेटायलाही कुणी आलं नाही. दसरा गेला तशी दिवाळीही गेली.
     राधाबाईएवढी शांत, संयमी बाई, शब्दाने कुणालाही न दुखावणारी सासू मिळाली म्हणून जाता येता तिच्या सुनांना गावातल्या बायका नशीबवान म्हणत. या घरानं गरिबी-श्रीमंतीचे चढ-उतार पाहिले. शेणानं सारवलेलं घर, भिंती, उखळात कुटलेले, पाट्यावर वाटलेले मसाले, जात्यावर दळलेलं धान्य, हाताने डेऱ्यात घुसळलेलं दही इथपासून ते नव्या फरश्या, मिक्सरपासून ते ताक करण्याच्या मशीनपर्यंत खूप काही बदललं, तिनं स्वीकारलं. कधी कुणाकडून जास्त अपेक्षा ठेवली नाही. जमेल तसं आणि तेवढं कामं करत राहणं एवढंच तिला ठाऊक. पण त्यांनी वाटणीत म्हाताऱ्या आईच्या नावावर जमिनीचा तुकडा करण्यात आपली कर्तव्यपूर्ती मानली. तिनं स्वतःहून बोलायला जावं तर - सरळ उत्तर नाही. जमिनी अन घराबरोबर जणू आईचीही वाटणी केली. पण आईचं प्रेम, बहिणींची माया या गोष्टींची वाटणी होत नसते. आणि या गोष्टींचा हिशोबही मांडता येत नाही ही गोष्ट नोकरी करणाऱ्या लेकाच्याही लक्षात आलीच नाही..किंवा कळूनही कुणाला वळलीच नाही !   
     दुसऱ्या सूनबाईनं - "म्हातारीला सांभाळता ते फुकट नाही..ज्यादा जमीन दिलीय ना वाटून..मग आईची जबाबदारी अन बहिणींची दिवाळी आलीच त्यात! " हे सांगून बोलायला काही शिल्लक ठेवलंच नाही. एकत्र राहून वाद होतात म्हणून वेगळी होणारी लोक दूर राहून तरी गोडीत राहतील असं वाटलं होतं..पण तशी इच्छाच नसेल तर काय..
   आता ती ओसरीत आली. भिंतीवर लावलेल्या आपल्या मालकाच्या फोटोकडे एक नजर टाकली. ती सावळी, करारी मूर्ती फोटोतही समाधानी वाटली तिला. हे असायला पाहिजे होते आज..असं वाटलं - पण क्षणभरच ! पुढच्याच क्षणी प्रश्न पडला -पण त्यांना सहन झालं असतं का हे सगळं ? मागच्या साली, भावांपेक्षा मोठी- पण लेकींमध्ये धाकटी असलेली लेक न राहवून भावाला म्हटलीच- "आम्हाला दिवाळी नको नि साडी-चोळी नको. तुम्हा भावा-भावांचं, जावा-जावांचं काहीही असो पण 'माय' आहे तोपर्यंत तिला अंतर देऊ नका. जिवंत आईची विचारपूस केली नाही आणि उद्या मेल्यानंतर अस्थी काशीला नेल्या - तर काहीच अर्थ नाही !" आईसाठी बापासारखीच स्पष्ट बोलली..पण तिचा हेतू कुठं कळला त्यांना ? वाईटपणा यायचा तो आलाच !  
   आजकाल गावागावात, बऱ्याच घरात हीच गोष्ट. नवीन लग्न झालेल्या पोरीही कधी जावेतून, कधीकधी फक्त सासूच्या घरातूनही निघून वेगळं बिऱ्हाड थाटतात. थाटो थाटायचा तर ! पण सणासुदीच्या निमित्तानं का होईना आई-बापांसाठी एकत्र येऊन दोन गोड शब्द बोलावेत ही अपेक्षा पण जास्त आहे का ? नातू- पणतू असलेली - राधाबाईची धाकटी जाऊ आजही एखाद्या कार्यक्रमासाठी स्वयंपाक करताना तिच्याकडे येते. नियोजन करताना लागणाऱ्या पदार्थांचा अंदाज विचारते . तेव्हा तिला वाटतं- खरंच, साधीसुधी पातळं (लुगडे) नेसणाऱ्या आम्हा अडाणी बायकांना, जेमतेम दहावीपर्यंत शिकवलेल्या मुलींना विचारांची, वागण्याची जी उंची जपता आली तीच उंची- उंची कपडे घालणाऱ्या या लोकांना जपता येईल का ? म्हातारपणाचा हा टप्पा आपल्याही आयुष्यात येईल हे विसरतात का हे लोक ?
   दूर राहणाऱ्या आणि मृत्यू झालेल्या माणसांच्याही सुखद आठवणी असतात आपल्याकडं. त्या आठवून किमान हसता तरी येतं. पण डोळ्यासमोर राहणाऱ्या माणसांची जुनी रूपं आठवून जगणं किती अवघड असतं..आणि सुख देणारं तर नक्कीच नसतं!
    विचारांच्या तंद्रीत असतानाच धाकटा लेक मोबाइल देत म्हणाला - " बोल, ताईचा फोन आहे " तिनं मोबाईल कानाशी लावला.  "आज्जी..ss कशीये तू ?" पलीकडून नात (लेकीची लेक) बोलली.
" मी खुशाल आहे बाई, तुम्ही सारे ?"
"आम्हीही.."
"आठवण नाही येत वाटतं आजीची"
"नाही गं...खूप येते. आम्ही कालच बोलत होतो तुझ्याविषयी. पण माहितीये ना- सुट्ट्या कमी असतात अन इथे कामंही होती दिवाळीची. आलो तर एक-दोन दिवस राहणंही झालं पाहिजे. पण मी आता नक्की येणार आहे..सुट्टी काढून..स्पेशल तुला भेटायलाच ! खरंच !"
"बरं बाई, ये ये "
 बोलणं संपल्यावर मोबाईल नावाच्या त्या खेळण्याकडं तिनं कौतुकानं पाहिलं. येईल तेव्हा येईल पण - आपल्याला येते तशी आपलीही आठवण कुणी काढतं हे ऐकूनच तिला बरं वाटलं.
  देवघरात विझलेल्या दिव्याची वात पुढे सरकवून तिनं तो पुन्हा लावला. एक दिवा देवघरात अन दुसरा तिच्या मनात तेवत होता...

#आई-बाबांचे ,आजी-आजोबांचे डोळे, त्यांची मनं वाचूयात..मग ते आपले असोत, ओळखीचे असोत किंवा नसोत. थोडा वेळ देऊन आपण त्यांना सुख देऊ शकत असू तर त्यांना आनंद तर मिळेलच अन आपल्याला समाधान..जगभरातल्या सर्व आजी-आजोबांना समर्पित!!
                                                                                                                                  - अमिता
           

Wednesday, 20 September 2017



परतून चाललास ना रे..
तरी भलताच तुझा जोश आहे
भिजवायची हौस तुला भारी ,
अन भिजण्याचा मला सोस आहे...
#यूँही...
                                                               -अमिता

सकाळी कंडक्टरकाकांना "पास" म्हणण्याऐवजी "पाऊस" म्हणता म्हणता वाचले !
#PMT_Rain

Sunday, 10 September 2017

तराजू...

                                  

                                  
                              धर्मयो बाधते धर्म न सधर्म कुवर्त्म तत्
                              अविरोधादयो धर्म स धर्म: सत्य विक्रम  |
                    
    जो धर्म दुसऱ्या धर्माचा विरोध करतो तो धर्म नसून कुमार्ग (वाईट मार्ग )आहे. जो आपल्या धर्माचं पालन करताना दुसऱ्यांच्या धर्माचा अनादर करत नाही तोच खरा धर्म होय. हे महान वचन आहे - महर्षी वेदव्यासांचं. धर्माच्या कक्षा कदाचित संकुचित वाटतील पण समजून घेतलं तर कळतं- अध्यात्माने नेहमीच आपली भूमिका व्यापक ठेवली आहे.  स्वामी विवेकानंदांनी आपले  गुरु रामकृष्ण परमहंस यांचीही आपल्या परीने परीक्षा करून, स्वानुभवाने विश्वास बसल्यावरच त्यांचे शिष्यत्व पत्करले होते. कमालीच्या चिकित्सक वृत्तीच्या स्वामीजींनी भारतीय संस्कृतीच्या सर्वच गोष्टी चुकीच्या आहेत अशा गैरसमजात असलेल्या जगाला इथल्या चांगल्या गोष्टींची ओळख नव्याने करून दिली.  एखाद्या गोष्टीला पूर्णपणे चुकीची ठरवताना तिचा आधी नीट अभ्यास करा असं त्यांचं सांगणं असायचं. नुकतीच एका बलात्कार खटल्यात एका धार्मिक समूहाशी संबंधित व्यक्तीला दोषी ठरवून सन्माननीय न्यायालयाने शिक्षा ठोठावली. न्यायालयाच्या निर्भीड निर्णयामुळे पीडित महिलांना उशिराच पण न्याय मिळाला ही चांगली गोष्ट आहे. या निर्णयानंतर देशभरात अनेकजण व्यक्त झाले..पण हे करताना बरेच जण संपूर्ण अध्यात्मालाच गुन्हेगार म्हणून पाहताना, चुकीचे ठरवताना दिसतात. एखाद्या गोष्टीचा निषेध करणं योग्य पण असं करताना सर्वांना एका माळेत ओवण्याचा प्रयत्न  करणं, थोडक्यात एकांगी विचार करून गोष्टींचं generalization करणं हे कितपत योग्य आहे ?? आपल्या भारत देशासारख्या खंडप्राय देशात विविध मतप्रवाहाचे, विचारसरणीचे लोक असणं अगदी स्वाभाविक आहे आणि आपल्याला हव्या त्या उपासना पद्धतीचा अवलंब (समाजातील इतर कुणाच्याही भावना न दुखावता आणि संवैधानिक मूल्यांचं उल्लंघन न करता ) करण्याचा आणि  मान्य नसेल तर ती नाकारण्याचाही अधिकार भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाला बहाल केलाय. म्हणूनच माझ्यासारख्या- देवावर श्रद्धा असणाऱ्या व्यक्तीही- देवाचं अस्तित्वच नाकारणाऱ्या एखाद्या पुरोगामी कार्यकर्त्याच्या हत्येचा निषेध करताना तुम्हाला या देशात नक्की दिसतील..याला कारण आपण केलेला संविधानाचा स्वीकार ! विचार व्यक्त करणे आणि ते लादणे, यात कमालीचा फरक आहे.
        दुसरी गोष्ट म्हणजे एका खटल्याचा संबंध दुसऱ्या खटल्यांशी लावून एखाद्याला घरबसल्या दोषी ठरवण्याचा प्रकार. संवेदनशील आणि न्यायप्रविष्ट गोष्टींवर व्यक्त होताना त्याबद्दल पुरेशी माहिती न घेता ,आरोप झालेली व्यक्ती पूर्णपणे दोषीच आहे असे मानून त्या प्रकारचे मेसेजेस, व्हिडिओज पटापट कसलाही विचार न करता फॉरवर्ड केले जातात. मध्यंतरी काही खटल्यातील आरोपींचे महिलांसोबतचे आक्षेपार्ह स्थितीतले फोटो सोशल मीडियावर ,व्हिडिओ youtube वर व्हायरल झाले. न्यायालयात याविरुद्ध याचिका दाखल झाल्यानंतर ते एडिटेड (नकली) आहेत हे समोर आल्याने मागे घेण्यात आले आणि ते  आणि ते प्रसारित करणाऱ्या NDTV या वाहिनीला त्या प्रकारची नोटीसही मिळाली असं वाचनात आलं. आजकाल तंत्रज्ञानाचा वापर(गैर) करून व्हिडिओ/फोटो एडिट होऊ शकतात हे आपण जाणतोच आणि एवढी महत्वाची माहिती/पुरावे उपलब्ध असताना खटले लांबू शकतील का ? ते कोर्टात सादर झाले नसते का ? किंवा ही माहिती संकलित करणार्याने हा गुन्हा घडूच कसा दिला..फोटो मिळवण्यासाठी? आणि पुढे असं काही झाल्यावर तो दाखवण्यासाठी?
          मला कायद्याचं फारसं कळत नाही पण एक गोष्ट समजते- 'आरोपी ' आणि 'दोषी' यांच्यात फरक आहे. एखाद्या व्यक्तीवर आरोप ठेवला (मग ती कोणत्याही क्षेत्रातली असो ) की तो सिद्ध होईपर्यंत 'ती व्यक्ती दोषी आहे' असं विधान कायद्याच्या दृष्टीनं चुकीचं आहे. हां...आता ही व्यक्ती मला चूक कशी वाटते, तीच दोषी आहे असं संभाव्य दोषींबद्दलचं आपलं वैयक्तिक मत असू शकतं आणि ते आपण मांडूही शकतो अगदी परखडपणे ! पण ते खरं ठरण्यासाठी निकालाची वाट पाहावीच लागेल. नाण्याला दुसरी बाजूही असू शकते..तशी शक्यता नसती तर जगात एवढे खटले चालले असते का? गुन्हा घडताच शिक्षा सुनावली गेली असती. संविधानाने फिर्यादीला फिर्याद करण्याचा अधिकार दिलाय तसाच आरोपीला आपल्या बचावाचा..कारण कोणत्याही स्थितीत पीडित व्यक्तीला न्याय मिळावा आणि न केलेल्या गुन्ह्यासाठी कुणालाही शिक्षा मिळू नये हे न्यायव्यवस्थेचं तत्व आहे. म्हणून मत व्यक्त करताना एक मर्यादा पाळणं, ते जमत नसेल तर किमान माझ्याकडून काही चुकीची माहिती जायला नको हे बघायला हवं.
      २०१२ साली दिल्लीत घडलेल्या सामूहिक बलात्कार आणि खून (निर्भया खटला ) घटनेनंतर संपूर्ण देश हादरला कारण नराधमांनी क्रौर्याची परिसीमा गाठली होती. त्यानंतर सरकारने - अत्यंत चांगल्या हेतूने - बलात्कारपीडित महिलांना जलद न्याय मिळावा यादृष्टीने या गुन्ह्याशी संबंधित कायद्ययात महत्वाचे, योग्य बदल केले. त्याचा एकीकडे बऱ्याच प्रकरणांत फायदा होताना दिसतो.अर्थात सगळीकडेच महिलांसाठी सगळं सुरक्षित आहे असं नाही, पण दुसरीकडे या बदललेल्या कायद्यांचा वापर  ढाल म्हणून न करता पुरुषांच्या विरोधात वापरायचं शस्त्र म्हणून करण्याचे प्रकारही होतात. मी याआधीही हुंडा आणि त्यासाठी होणाऱ्या अत्याचाराविरोधात लिहीत आले आहे आणि आपण हुंडा देणे आणि घेणे याला नाहीच म्हटले पाहिजे असं मांडत आले आहे. हुंडा आणि कौटुंबिक हिंसाचार ( Domestic violence ) या कायद्यांचाही गैरवापर काही (सर्व नाही..) महिला  करतात.- हे विधान एखाद्या पुरुषाने  केलं तर कदाचित त्याला काहीजण ' स्त्रीविरोधी ' लेबल लावतील. स्त्री किंवा पुरुष अशी प्रवृत्ती दोन्हीकडे असू शकते .जरा प्रवाहाविरुद्ध किंवा कटू वाटेल पण हे सत्य आहे.
         Delhi Commission For Women, National Crime Records Bureau यांनी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या ३ वर्षात अशा खोट्या केसेसची (fake cases ) टक्केवारी (५३ %) आहे. फक्त दिल्लीचा विचार करता हा दर ४५ टक्क्यांवरून ७० टक्क्यांवर गेला आहे. बलात्कारासारखा अक्षम्य अपराध करणाऱ्या कुणालाही कठोर शिक्षा व्हायलाच हवी पण त्याचबरोबर - कायदे माझ्या बाजूने आहेत म्हणून कुणा पुरुषाची बदनामी करण्यासाठी मी त्यांचा दुरुपयोग करेन - या वृत्तीलाही शिक्षा हवी. कारण या प्रकारच्या खटल्यांचा निकाल लागेपर्यंत जी बदनामी होते ती कोण भरून देणार ? हे सगळं असह्य होऊन आत्महत्यांपर्यंत पोचल्याच्याही घटना आहेत. एका पुरुषाला ४ वर्षांच्या कैदेनंतर अशा खटल्यातून निर्दोष मुक्त करण्यात आलं तेव्हा त्यानं कोर्टाला-'माझी हरवलेली प्रतिष्ठा परत करा ' अशी विनवणी केली. कारण निर्दोष मुक्त झालेल्या व्यक्तींनाही समाजात बरेचदा दोषीच्याच नजरेनं पाहिलं जातं.
       तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे- माध्यमांची अर्थात मीडियाची भूमिका. बहुतांश लोक प्रिंट मीडिया आणि इलेकट्रॉनिक मीडियामध्ये दाखवली जाणारी प्रत्येक गोष्ट १००% खरी आहे असच मानतात. त्यामुळे माध्यमांनी फक्त मसालेदार बातम्या देण्यासाठी गोष्टी रंगवून सांगण्यापेक्षा पुराव्यांवर आधारित, निष्पक्ष, तटस्थ बातम्या देणं अपेक्षित आहे. अर्थात स्वातंत्र्यपूर्व काळापासून अनेक चळवळींमध्ये माध्यमांचा सहभाग मोलाचा आहे. सचोटीने पत्रकारिता करणारे अनेक जण आमच्या देशात आहेत, त्यांना मनापासून सलाम ! पण आधी उल्लेखलेल्या प्रवृत्तींमुळे माध्यमांच्या विश्वासार्हतेवरही(reliability ) प्रश्नचिन्ह निर्माण झालंय हेही खरं.संवेदनशील खटल्यांच्याबाबतीत असं उथळ आणि एकांगी वृत्तांकन करणं - याला 'Media Trial ' असं म्हणतात हे त्या खटल्याच्या न्यायदानाच्या प्रक्रियेतही मारक ठरू शकतं असं कायदेतज्ञांचं मत आहे. (संदर्भ- ऑगस्ट २००६, अहवाल by- law commission, आयोगाचे अध्यक्ष- न्या. एम. जगन्नाथ राव )
               स्वातंत्र्य आणि स्वैराचार यांत पुसट सीमारेषा आहे. या रेषेचं परिमाण स्त्री आणि पुरुष दोघांसाठीही सारखं असायला हवं. कायदा सर्वांसाठी सारखाच हवा. पैसा, पद, प्रतिष्ठा, लिंग या कोणत्याही आधारावर कुणालाही झुकतं माप मिळू नये आणि कुणावरअन्यायही होऊ नये. आपण माणसांनी विवेकाचा आणि न्यायव्यवस्थेने न्यायाचा तराजू निरंतर सांभाळणं हेच अपेक्षित आहे.

संदर्भ- इंडिया टुडे, नवभारत टाइम्स, Documentry film, presentation by -social activist Deepika bhardwaj
टीप: कायदा, पत्रकारिता यापैकी कशाचीही जाण नसली तरी माणुसकीची नक्कीच आहे. हा लेख कुणाच्याही समर्थनार्थ अथवा निषेधार्थ नाही. तसेच मांडलेल्या प्रत्येक विचाराशी सर्वांनी सहमत असावं असा माझा दुराग्रह नाही. धन्यवाद !
                                                                                                            -अमिता
 

Friday, 25 August 2017

बाप्पा...




इवल्याशाच डोळ्यांनी ,पाहतो सर्वत्र घडलेले
सुपासारख्या कानांनी ऐकतो - मनामनात दडलेले
मोहक रूप, अनंत गुण, बाप्पा..
शब्दांत सांगून होशील का रे ?
नेहमी तूच सुचवतोस मला
आज
लिहिलं तुझ्याचसाठी..
गोड मानून घेशील का रे ?
चौदा विद्या, चौसष्ट कलांचा दाता तू
तुला आम्ही काय द्यावे ?
हृदयाच्या मखरात बसवून
चरणी तुझ्या लीन व्हावे..
सडा शिंपला वरुणाने, लगबग आहे सर्वांची
फुलांचा दिमाख न्यारा अन ऐट आहे दुर्वांची..
बाप्पामय पहाट आता अन बाप्पामय सांज झाली
ढोल घुमतो दशदिशांत...
                     अन काळजाची झांज झाली...!
#यूँही...
                                                          - अमिता
#गणपतीबाप्पा मोरया..! मंगलमूर्ती... 

Saturday, 19 August 2017


किती वेळा सांगितलं..
असं एकाएकी निघून जाणं बरं नाही
इथं सगळे म्हणत होते- त्याचं काही खरं नाही...
इकडे श्रावण सरत होता नि तू बसला होता दडून
तुला शोभतं का जाणं असं..पिकांना वाऱ्यावर सोडून ?
रात्री गुपचूप आलास, अन अखंड बरसतोय
बॅकलॉग काढतोय का भरून..?
श्रावणाच्या शेवटच्या दिवशीतरी परतलास..केलंस बरं,
कधीकधी अपेक्षेपेक्षा सरप्राईज जास्त छान असतं..हेच खरं...
#यूँही... 
                                                                        -अमिता

Monday, 14 August 2017

वतन...



फूल तो कई है जहाँ में
पर फुलवारी है मेरा वतन 
यूँ तो कई रंग है जहाँ में 
पर रंगोली है ये मेरा वतन..

राम को पसंद ईद का शीरखुरमा
और अली को दिवाली के लड्डूओंका इंतजार है 
मनदीप और जोसेफ की यारी के किस्से हजार है..
मील-मील पर बदले यहा बोली   
पर हर बोली में झलकता प्यार है...

प्रेयर भी यहा, कलमा भी यहा 
बुद्ध का ध्यान भी और भजन में खो जाना है  
यही दोहे सुनाता कबीर
और यही बन्सी बजाता कान्हा है...  

जितना हिंदी महासागर मेरा 
उतनीही हिमालय की गोदी है 
भूलके भी न भूलना मगर 
कई वीर खेल गए जान से 
और कई आज भी खेलते हैं
तभी- करोडोंकी 'आजादी ' हैं ...!

#प्रतिज्ञा स्वतंत्रता की गरिमा बनाये रखने के लिए
#प्रतिज्ञा स्वातंत्र्याची प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी 
#Pledge to keep Dignity of Freedom 
वंदे मातरम!
                                                                         -अमिता

Sunday, 6 August 2017

   परवा माझी एक मैत्रीण- 'अवंती' खूप दिवसांनी भेटली. म्हणाली इतक्या वर्षांत माझ्या हेअरकट शिवाय काहीच बदललं नाहीये..म्हणजे आधी होतो तशाच आहोत आपण..आणि मला पटलं ! नेहमी जवळ राहत नसतील कदाचित पण काही लोकांचं आपल्या आयुष्यात असणंच बरेचदा खूप काही असतं. आणि वेळ आलीच तर  एकमेकांसाठी धावून येऊ..हा विश्वास असतोच आपल्याला अन त्यांनाही..आठवली ना तुम्हाला अशी माणसं ?  मैत्री हे खूप सुंदर नातं आहेच ,शिवाय  ती  ज्या- ज्या नात्यांत झिरपते ती नातीही सुंदर होतात.सुखात आनंद द्विगुणित करणारी , दुखऱ्या बाजूंवर हळूवार फुंकर घालणारी ,आपण चुकत असू तर वाट दाखवणारी, कळत-नकळत समृद्ध करणारी..नसेल रोज भेटणं -बोलणं होत पण सुख-दुःखाचे क्षण वाटून घेताना अंतरं आड येत नसतील, मनातल्या गोष्टी,इच्छा-अपेक्षा न बोलताही समजून घेता येत असतील तर समजून घ्यावं..मैत्री सच्ची आणि घट्ट आहे..!
#HappyFriendshipDay!





माँ...छाता नहीं..रेनकोट चाहिए
बचपन में कितनी बार कहा था
पर माँ ने हमेशा छाता-ही थमाया हाथों में ..
अब न माँ से शिकायत है, न रेनकोट से दुश्मनी
पर हाँ..छातेसे प्यार हो गया इतने सालोंकी बरसातों में..
और शायद उसे भी..
जी..हसते हो..क्यो ? आपको यकीन नहीं आया ?
फिर आपही बताइए
एक जमाने में सिर्फ काला था जो
आज रंगीला कैसे हुआ..?
सालभर पडा रहता है किसी कोने में,
अभी अभी तो उसे उजाला दिखाया है..
"चंद दिनों के लिये ही सही
किसी की मदद करो तो -पूरे दिल से "
उसने हमें सिखाया है..
साथ निभाने का वादा - न करके भी उसने तोडा नहीं
बदले में हमने उसे 
भूलकर भी कही छोडा नहीं
धीमी या तेज..चाहे जैसी बारिश हो
उसे हमें बचाना आता है,
सच कहते है यारों..
लाखों में एक -हमारा छाता है...!

#यूँही..
                                                 -अमिता

#Exclusively_For_Umbrella_Users (पण आहे का कुणी..?)
#Raincoat_Users_canAlsoEnjoy..! &Happy_Friendship_Day...!!!
 

Wednesday, 2 August 2017



आज पुन्हा आला तो
म्हणून त्याला भेटायला गेले
काल जग वेडं हॊतं,
आज मीही वेडी झाले
त्यानं कोसळवला धबधबा,
अन कातळ कातळ न्हाले
मीही भिजले मग जराशी,
मन नितळ नितळ झाले..

#यूँही...
                               -अमिता

Monday, 17 July 2017



बऱ्याच दिवसांनी आलायेस तसा राहून जा
साठून साठून राहिलास..आता वाहून जा..
झाडं-वेली,पानं-फुलं,आसमंत गेला भिजून
तरी धरती म्हणते पावसा..तुला ऐकायचंय अजून...!
#यूँही
                                                        -अमिता

Sunday, 9 July 2017

दृष्ट...





सुनी-सुनी पंढरी, सुने चंद्रभागातीर
वाळवंटी बाकी अजून - गुलाल-अबीर
रखुमाई म्हणे चंद्रभागे,
काही केल्या करमेना
काय बरं करत असेल
राऊळी द्वारकेचा राणा ?

दबक्या आवाजात तिने
टाकले गाभारी पाऊल
टाळ वाजवत होता कुणी
त्याला नव्हती चाहूल
गळ्यात तुळशीची माळ
मस्तकी चंदनाचा टिळा
आत्मानंदी दंग होता
एक वारकरी सावळा...

कोण बरं तू ?
इथं चुकून का राहिला ..?
विचारताना तिनं - कंठीचा कौस्तुभमणी पहिला 
तिन्ही लोकांत कौतुक असं ज्याचं रूप
त्या सावळ्या चैतन्याला
भक्तांचं एवढं अप्रूप..?

तिनं विचारलं-
वैष्णवांचा मेळा परतला
आम्हा खेद वाटे भारी
प्रसन्न
कशी मग, सांगा बरं स्वारी..?
तो उत्तरला -
" अगं , युगा-युगांचे हे नाते,
सदोदित आम्ही संग
मन लावून ऐक,..
घडोघडी ऐकू येती, माझ्या तुकोबाचे अभंग..
सोहळा संपला तरी, ना संपते वारी
भक्ती-प्रेमाचा प्रसाद, जगी वाटतो वारकरी
चिरंतन प्रेमसागर कधी का आटतो ?
नित्य नव्या रूपात मी लेकरांना भेटतो
वरुणाला सांगून आता..
आभाळी बुक्का पसरतो,
भेट घेतो लाडक्यांची
मगच ओसरतो...! "

रखुमाईची मायाही
आता कणभर वाढली
गहिवरल्या डोळ्यांनी तिनं
दृष्ट विठोबाची काढली...!

##विठूमाऊली,गुरुमाऊली,सर्व वारकरी,आणि माझ्या आई-वडिलांच्या चरणी समर्पित...
                                                                                                                        -अमिता     
 

Saturday, 17 June 2017

(#पाऊस...) २. बात..(छोटी-सी...)













बिजली ने सोचा..चलो, आज कुछ करते है
इस दीवाने बादल को
आज जरा परखते है
वो बोली- मत बरसो, तुमने देर करदी इसलिए
शायद..सृष्टी तुमसे खफा है..
बादल ने कहा..ना..हम तो बरसेंगे यूँही..क्योंकि,
इंतजार में हमने, देखी उसकी वफा है...
खुश होके इस बात पर,
बिजली जब खिलखिलाई
गूँज उठा आसमान और सृष्टी थरथराई   
इठलाती हवा ने छेडा तो बादल भी फुटे..और..
                                                     बरसात हुई...!
                                                                        -अमिता
#यूँही_बरसात


Wednesday, 7 June 2017

(#पाऊस...) १. बरस बरस...



ही कुंद कुंद सकाळ ,
हा मंद मंद वारा
का लपून बसतोस रे,
करून असा इशारा..?
पुरे झाले आता,
ढगाआडून त्या..धरणीला पहाणे
तिचे प्रेम पाहण्यासाठीच ना..सारे तुझे बहाणे..?
तुझ्याचसाठी झुरते, तिला तू खुलवायचे
शिवारातल्या स्वप्नांना तूच रे फुलवायचे
भेटीची आस तुलाही, मग उशीर का व्हावा..?
बरस बरस आता असा..कि आसमंत नहावा,
अन मरणाआधीच मी ,
स्वर्ग इथे पहावा...!
                                        

                                                                 -अमिता

(पाऊस..दरवर्षी येतो..पण येताना दरवेळी नावीन्य घेऊन येतो. त्याची वेगवेळी रूपं आहेत, वेगवेगळे पैलू..आपण पाहू तसा तो आपल्याला भेटत जातो..म्हणूनच पावसावर एवढं लिखाण आजवर होऊनही हा विषय अगदी फ्रेश..आहे आणि राहील. सुचेल तसं यावर लिहायचा विचार आहे..या आणि इतर लिखाणातही अमुक  गोष्ट आवडली, ही नाही आवडली, खटकली अशा सर्व प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.  ur comments are important for me..so stay tuned! )

Wednesday, 31 May 2017


देखो तो वीरानिया, सोचो तो बहार है
सादगी का भी यारों, अलग-सा श्रिंगार है..
खामोशियाँ भी गूँजती है दिलों में,
अगर गौर से हम सुनते हैं..
उन बेजुबान होठोंपर मुस्कान देखी
तो याद आया- हम भी तो हसना जानते है...
#यूँही
-अमिता
PC- unknown photographer(thanks..got from google)

Saturday, 22 April 2017

ये शाम मस्तानी...



                               

               
    F.C. रोड..(फर्ग्युसन कॉलेज रस्ता)..नेहमीप्रमाणेच गजबजलेला.दिवस मावळतीकडे झुकत चालला होता पण अजूनही उन्हाची काहिली कायम होती. रणरणत्या उन्हातही कमी झालेला कोलाहल कधीकधी जास्त कासावीस करतो. दूर कुठेतरी शांत जागी जावं असं वाटू लागतं.या गर्दीतून जातानाच एक सुरेख धून ऐकू आली.उन्हात तळपलेल्या जीवावर कुणीतरी हळुवार फुंकर घालावी अशी..सूर इतके सुंदर लागले होते कि, शब्द आपसूकच ओठांवर आले-  
                                       ये शाम मस्तानी, मदहोश किये जाए..
                                       मुझे डोर कोई खींचे,तेरी ओर लिए जाए...
            शब्द नव्हतेच..होते फक्त बासरीचे मधुर सूर.आणि माझ्या नकळत मी तिथे जाऊन पोचले. गाण्याची दुसरी ओळ वेगळ्या अर्थाने खरी झाली जणू.साधारण साठीतला एक माणूस डोळे मिटून बासरी वाजवत होता. रस्त्याच्या कडेला चटईवर बसलेला.येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांपैकी कुणी आश्चर्याचा, कुणी सहानुभूतीचा कटाक्ष टाकून पुढे जात होती. कुणी पुढ्यात पैसे ठेवत होतं. दुनियादारी आपल्याला काय काय शिकवते ना..माणसाच्या अवतारावरून, दिसण्या-कपड्यांवरून आणि खिशातल्या पैशांवरून त्याची कदर करायला शिकवते.सुरांनी आकर्षिलं होतंच पण का बरं बसला असेल इथे  हा माणूस? समोर पैसे पडतायेत, हा निश्चल.पण नाकारतही नाहीये..शेवटी कलाकारालाही पोट असतंच ना..एव्हाना विचारांचं जाळंच विणून झालं होतं मनाशी.
          खरं तर माझं काहीही काम नव्हतं तिथे. पण उगाच मोबाईलशी खेळत होते .कान बासरीकडेच. राजेश खन्नांवर चित्रित झालेली किशोरदांची गाणी वाजवत होता तो. एक गाणं झाल्यावर क्षणभराचा विराम घेऊन दुसरं गाणं. हम दोनो, प्यार दिवाना होता है आणि अजूनही एक से बढकर एक गाणी वाजवली.आता मलाही निघायला हवं होतं.कान तृप्त झाले होते पण मन नाही. राहवलं नाहीच. जवळ गेले. एवढ्या सुंदर कलेचं मोल एखाद्या नोटेनं कसं होईल? सच्चा कलाकार पैशांचा नव्हे तर कलेच्या सन्मानाचा भुकेला असतो. लोक कदाचित त्याला वेडा समजतील, त्याच्या कफल्लकतेवर हसतील. पण तो जे कमावतो ना ते पैशात नसलं तरी त्याच मोल खूप असतं आणि हे फक्त तोच जाणतो. काही लोक गरिबी-श्रीमंतीच्या मोजपट्ट्या लावतील, कमाईच्या तराजूत तोलतील..पण तो कधीच या साऱ्याच्या पलीकडे गेलेला असतो. का कुणास ठाऊक ,मला हा कलाकार मनस्वी वाटला.
        मी पैसे ठेवले. त्याने डोळे उघडले. नजरानजर झाली. "काका, खूपच छान वाजवता तुम्ही!" "धन्यवाद बेटा..!" अदबीनं मान झुकवत ते उत्तरले .मावळत्या सूर्याच्या साक्षीनं त्यांच्या चेहऱ्यावर झळकणारं हसू पाहिलं.वाटलं- दोन सूर्य सांगतायेत- मावळतोय म्हणून काय झालं..अजूनही तेच तेज आहे माझ्यात ! "तुम्ही कार्यक्रमांमध्ये वाजवता का ?" "छोटा कलाकार आहे..बोलावतात तिथे जाऊन वाजवतो. सध्या काम कमी आहे. नेहमीच असतं असं नाही. मग इथं येऊन बसतो. तेवढाच माझा रियाजही होतो.  "खरंच फार सुंदर वाजवलंत. "धन्यवाद, खूप खूप धन्यवाद!" वयाने स्वतःपेक्षा खूप लहान आणि संगीताची जाण नसलेली एका अनोळखी मुलगी दाद देते आणि तिचा एवढ्या अदबीनं स्वीकार! कलाकार जेवढा मोठा तेवढा तो नम्र असतो. "अर्ध्या हळकुंडानं पिवळं होऊ नकोस.." असं सांगून जातात अशी माणसं.
        कला हे व्यक्त होण्याचं एक माध्यम आहे. कधीकधी ती माणसाला जगवतेही पण त्याहीपेक्षा त्याच्यातल्या चांगल्या माणसाला घडवते. निसर्गाच्या, परिस्थितीच्या चटक्यांमध्ये गारवा देते आणि इतरांनाही तो देऊन सुखावण्याचं सामर्थ्यही. थोड्या वेळापूर्वी शांत ठिकाणी निघून जाऊ म्हणणारी मी अद्याप तिथून निघू शकले नव्हते, यात सगळं आलं. आता बहुधा शेवटची धून सुरु झाली होती. तीच - ये शाम...रणरणता दिवस जाताना जास्त आल्हाददायक झाला होता आणि शाम हळूहळू मस्तानी होत होती...मी फोटोबिटो काढला नाही, पण मनाच्या कॅमेऱ्यात क्लिक झालाय..कायमचा...
               अशा सर्व ज्ञात-अज्ञात मनस्वी कलाकारांना सलाम...!
(घरी पोचल्यावर कुणीतरी विचारलं- कसा होता दिवस? मी म्हणाले -"दिवस नेहमीसारखाच..पण शाम.. कमाल होती...!!" )
                                                                                                                                                       -अमिता