"काय कंडक्टर,गाडीत बसायला जागा नाही अन तिकिटाचं काय विचारताय? जागा नाही मग मी तिकीट काढणार
नाही !" टिळकांच्या पुण्यात - ' मी शेंगा खाल्ल्या नाही, मी छडी घेणार नाही'
अशाच अविर्भावात ती बोलली . साहजिकच बसमधल्या इतर प्रवाशांच्या नजरा तिच्याकडे वळल्या . साधारण चाळिशीतली, ठेंगणी, कृश देहाची
बाई . "काय ss कं ssडक्टर ss ??" ती बोलतच होती. तिच्या आजूबाजूला असलेल्या
बायकांनी नाकाला पदर लावले. तोंडाला स्कार्फ बांधलेल्या मुलींच्या कपाळावर आठया उमटल्या.
एक घाणेरडा, तीव्र दर्प सुटला होता , डोकं दुखवणारा.. माझा विश्वास बसेना . ती दारू
प्यायली होती आणि नशेत बडबडत होती. पुरुषांचाही विश्वास बसत नसावा. खरंच का ? बाप रे
! अशा संशयी नजरेने ते पाहत होते.
सार्वजनिक वाहनांतून प्रवास करताना एखादा नशेत
धुंद माणूस पाहायला मिळणं यात काही विशेष नाही. उलट त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. पण
कपाळावर टिकली , गळ्यात मंगळसूत्र या वेषातली बाई दारूच्या नशेत बरळते हा चर्चेचा,
आश्चर्याचा विषय होता. एरवी आपण हिंदी , आणि आता तर मराठी सिनेमांमधून अभिनेत्रींना वोडका, बियर आणि तत्सम
मादक पदार्थांचं सेवन करताना पाहतो . पण त्यात काही गैर आहे असं आपल्याला वाटतं का ? तिचं
नशेत झोकांड्या खाणं, बरळणं असे सीन्स एन्जॉय करून विसरतो आपण .. पण खऱ्याखुऱ्या आयुष्यात - एखादी
बाई १५ रुपयांची टाकली असं सांगते तेव्हा मात्र
हादरतो आपण.. नशा, बेधुंदी इथेही आहे अन तिथेही . देशी-विदेशी कोणतीही आरोग्याला घातकच.
पण ' हिरोइन 'च्या पिण्याला एक प्रतिष्ठा (प्रेस्टीज) असते, तिच्या सो-कॉल्ड हाय प्रोफाइल स्टेटसचा स्पर्श
असतो . हे सगळं अशा पद्धतीनं आपल्याला पडद्यावर
दाखवलं जात कि आपल्यालाही त्यात गैर वाटत नाही. नशेत बेधुंद अभिनेत्रीसाठी आपल्याकडे
स्माईल आणि प्रत्यक्षात असं वागणाऱ्या बाईसाठी तिरस्कार ..? मी मनाशी विचार
करत होते.
तिला चक्कर येत असावी. डोळे ताणून ती इकडे-तिकडे
पाहत होती. एका तरुणीला तिच्या जागेवरून बळजबरीने उठवण्याचा प्रयत्न करू लागली . इतरांनी
तिला थांबवलं. थोड्या वेळानं दुसरीकडे बसायला जागा मिळाल्यावर ती जर शांत झाली. तिच्या
शेजारी बसलेल्या तिच्याच वयाच्या एक काकू म्हणाल्या -" काहीही प्यावं का ? अन
तेही इतकं ? त्रास होतो दुसऱ्यांना.." त्यावर ती मन झुलवत हसली.
आपल्या
देशात आजकाल महिलांमध्येही व्यसनांचं प्रमाण वाढलंय, व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये महिलांसाठी
स्वतंत्र विभाग आहेत, यात शहरातल्या उच्चभ्रू महिला- मुलींचा आकडा मोठा आहे- हे ऐकलं
होतं. पण प्रत्यक्षात अशी स्त्री पहिल्यांदाच पाहत होते- तीही सामान्य वर्गातली. आजवर
पहिली ती - बाटलीशी लढणारी बाई. दारू पिऊन घरी येणाऱ्या नवऱ्याचा मार खाणारी, पण आपल्या
मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून खंबीरपणे उभी राहणारी, दारुड्या नवऱ्यावर
न विसंबता घराची धुरा स्वतःच्या हातात घेणारी स्त्री. तिच्या दुःखात, तिनं भोगलेल्या
यातनांतसुद्धा आशेचा एक किनारा दिसतो, तिच्या डोळ्यातली स्वप्न दिसतात. तिच्या खंबीरपणाला
सलाम आणि तिच्या स्वप्नपूर्तीची सदिच्छा या गोष्टी आपसूकच मनात येतात. पण बाटलीशी दोस्ती
करणारं बाईचं हे रूप खरंच पाहवलं गेलं नाही. स्त्री असो व पुरुष व्यसनाधीनतेमुळे नुकसान
दोघांचाही होतं . पण ज्या घरची स्त्री दारूच्या आहारी गेली असेल तिच्या घराला कोण सावरणार
? पुरुषांप्रमाणे बाईनंही दारू जवळ केली तर काय होईल ? हा प्रश्न तमाम पुरुषांना अंतर्मुख
करणारा आहे. बसमधले पुरुष बहुधा याच विचारात होते.
दारू
किंवा इतर व्यसनांचं समर्थन करताना लोक म्हणतात - 'आम्ही प्रमाणात घेतो'. पण आरोग्याला
हानी पोचतेच.शिवाय या पदार्थांची चटक लागते आणि यांचा थेट परिणाम माणसाच्या विचारशक्तीवर
होत असल्याने हेच प्रमाण तो कधी ओलांडतो हे त्याचं त्यालाही कळत नाही. प्रश्नांची अपेक्षित
उत्तरं मिळाली नाहीत म्हणून प्रश्नच विसरण्यासाठी व्यसनांचा आधार घेतला जातो अन माणूस
या विळख्यात अडकतो. सारासार विचार करण्याची क्षमता संपल्यावर यातून सावरणं अजून अवघड
होऊन जातं. असं केल्यानं प्रश्नांची उत्तरं तर मिळत नाहीच उलट इतर अनेक प्रश्न निर्माण
होतात -त्या व्यक्तीच्या अन त्याच्या कुटुंबाच्या आयुष्यातही. एकेकाळी प्रसिद्धीच्या
शिखरावर असलेली अभिनेत्री मीना कुमारी हिनं झोपेचं औषध म्हणून सुरु केलेली ब्रँन्डी
निराशेच्या काळात जास्त जवळ केली ज्यात तिचा मृत्यू झाला. आपल्या शेवटच्या दिवसांत ही सुंदर अभिनेत्री पूर्णपणे अल्कोहोलिक
होती. व्यसनाच्या गर्तेतून बाहेर येणं सर्वांनाच जमत नाही याचं हे बोलकं उदाहरण. पण
- मला या वाटेला जायचंच नाही हे मनाशी पक्कं केलं तर माणूस प्रश्नांची उत्तरं इतर मार्गांनी
शोधतो. बेधुंद व्हायचंच असेल, मन रमवायचंच असेल तर जगात अनेक चांगल्या गोष्टीही आहेत.
मुळात
या प्रश्नाभोवती समाजकारण,अर्थकारण आणि अर्थातच राजकारणही दडलेलं आहे. एकीकडे दारूबंदीसाठी
सातत्याने जनजागृती करून दारूबंदी प्रत्यक्षात आणणारे डॉ. अभय बंग, डॉ.राणी बंग, पारोमिता
गोस्वामी यांच्यासारखे कार्यकर्ते. डॉ. बंग यांच्या प्रयत्नांतून गडचिरोली जिल्ह्यात
स्थानिक लोकांच्या मागणीमुळे दारूबंदी लागू झाली आहे. हेच काम चंद्रपूरमध्ये करणाऱ्या
पारोमिता गोस्वामी. आणि दुसरीकडे ' वाईन म्हणजे दारू नव्हे' अशा वाक्यांनी चांगल्या
कामांना सुरुंग लावणारे, त्यायोगे स्वतःला साखरसम्राट आणि एखाद्या मद्यविक्रेत्याला
मद्यसम्राट बनवण्याच्या प्रयत्नात असलेले धूर्त राजकारणी. तर तिसरीकडे ' चार बोतल वोडका,
काम मेरा रोजका ' , ' लल्ला लल्ला लोरी, दारू की कटोरी ' , ' आज फिर पीने की तमन्ना
है ' असल्या पार्टी सॉंग्सच्या रुपात चित्रपटसृष्टीच्या
गीतवैभवात भर (!!) टाकणारे काही लोक. समाजाचं वास्तववादी चित्रण, कथेची गरज या गोष्टी
आपण समजू शकतो. पण गरज नसताना केवळ अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आपण आजच्या
तरुणाईला आणि संपूर्ण समाजाला काय देतोय ? याचं भान या सो-कॉल्ड गीतकारांनी ठेवायला
हवं. कारण सिनेमा हे जनमानसापर्यंत पोचणारं प्रभावी माध्यम आहे.
तरुणाई
आपल्याला हवं असलेलं थ्रिल आणि आनंद या गोष्टींत शोधू लागली आहे. व्यसनांचे परिणाम
माहीत असूनही त्यात आनंद शोधणाऱ्यांनी आपली आनंदाची परिभाषा एकदा तपासून पाहावी. आयुष्य
म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास..ज्यात स्वतःचीच आगमन- निर्गमन वेळ
(Arrival -Departure Time) ठरवू शकत नसलो तरी प्रवास कसा करायचा हे आपण ठरवू शकतो. आता समोर निसरडी वाट आली म्हणून
घसरायचं की वेळीच सावरायचं हे मात्र ज्याच्या त्याच्या हाती आहे.
