Wednesday, 16 December 2020



आले अवेळी भरून 
निळ्या आभाळाचे डोळे 
घट्ट पकडते माती 
लेकरांची पाळेमुळे

काळजाच्या कपारीत 
पाणी मायेचे वाहते 
ऋतू येतात जातात 
ओल उरात राहते 

काळ आला मोठा बाका 
रस्ता क्षणात वळतो 
आला पोटामधी गोळा 
तो का कुणाला कळतो ?

कुणी असती कनवाळू 
कुणी स्वतःमध्ये दंग
सरडा लाजून मरेल
असा बदलू नये रंग 

स्वार्थाचा आड खोल 
परि सदा तो कोरडा 
कसा भरेल त्याच्या काठी 
तुझा न माझा घडा 

प्रेम घागर इवलीशी 
लई मोठी तिची ख्याती 
काठोकाठ भरंल पुन्हा 
जशी करावी ती रिती

चोरपावलांनी जातो कुठं 
उठून पाहे माय रखमा
बाप जगाचा विठूराया
पुसे लेकरांच्या जखमा…
                             -©अमिता  
Note:
कपार- खडकांची रचना/गुहा 
बाका - अवघड 
कनवाळू - मायाळू 
आड - खोल विहीर 

Sunday, 30 August 2020

दवा...



सवालों को सिरहाने लेके
सो रही है जिंदगी
कोई सुबह अब..जवाब लेके आए
न जाने कितने टुकडों में 
खो गई है जिंदगी
कोई लमहा अब..तस्वीर बनाके जाए

हस्ती वही..जमीं भी वही 
पर कैसी ये हवा है..
सीखे नहीं थे..सीख गये है,
'धीरज भी दवा है..!'
#यूँही...
                           -©अमिता 
Note:
सिरहाने- उशाशी/towards head
लमहा- क्षण/moment 
हस्ती- व्यक्तित्व/ personality
जमीं - जमीन

Tuesday, 23 June 2020

ऐरणीच्या देवा तुला...

                             

                              "ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे 
                               आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे"
        मला आवडणाऱ्या अनेक गाण्यांपैकी 'साधी माणसं' या चित्रपटातलं हे गाणं आहे. जयश्री गडकर आणि सूर्यकांत यांच्यावर चित्रित झालेलं,लता मंगेशकरांनी गायलेलं आणि लिहिलं आहे - जगदीश खेबुडकर यांनी. हज्जार 'आय लव यू' फिके पडतील अशा दोन ओळी या गाण्यात आहेत.
           ''लेवू लेनं गरीबीचं, चनं खाऊ लोकंडाचं
             जिणं व्हावं आबरुचं, धनी मातुर, माजा देवा, वाघावानी असू दे''
कित्येकदा फक्त " मी तुझ्या सोबत आहे, काळजी करू नकोस" असं नुसतं सांगणंही पुरेसं असतं. भात्यावर काम करताना खूप धीराचं बोलून जाते ही नायिका.
           माझी एक मैत्रीण आहे- ऑफिसमधली सहकारी. ती जेव्हा नव्याने कामावर रुजू झाली होती तेव्हाची, साधारण तीन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.तिचा हा पहिलाच जॉब. ती इथे पुण्यात आणि कुटुंब- गावी. तिची आई एका दुर्धर आजाराशी लढत होती.रोजच्या कामात काही अडचण आली, एखाद्या गोष्टीचं टेन्शन आलं की तिला रडू यायचं. ते रडणं फक्त कामातल्या अडचणींमुळे नाही तर सगळी परिस्थिती आठवून असायचं. आजूबाजूच्या अनेकांना वाटायचं- रडण्यासारखं काये त्यात ? ज्या मुलींसोबत फ्लॅट शेअर करायची त्यांनी सुद्धा 'इरिटेटिंग' असल्याचं लेबल लावून टाकलं होतं. तिचं म्हणणं ऐकून घेणाऱ्या आम्हा दोन-चार लोकांना "तुम्हाला बोअर होत नाही का?" असंही काहींनी विचारलं होतं.तेव्हा प्रकर्षाने जाणवलं होतं..बरेचदा आपण माणसं खूप बोलतो, बऱ्याच विषयांवर. पण आपण ऐकतो का ?एखाद्याच्या मनात चाललेलं वादळ आपण बघू शकतो का ? हसऱ्या, खेळणाऱ्या बाळांना घेण्याची, खेळवण्याची हौस सगळ्यांनाच असते. पण लक्ष देण्याची (attention ची) खरी गरज रडणाऱ्या, न खेळणाऱ्या बाळांना असते. त्यातही मोठी माणसं रडताना दिसत नाहीत.. पण जवळची माणसं इच्छा असेल तर त्यांना ऐकू शकतात. मला माहीत होतं -माझ्या मैत्रिणीच्या प्रत्येक समस्येवर कायमस्वरूपीचा उपाय माझ्याकडे नाही, मी सगळे प्रश्न सोडवूही शकत नाही. तेव्हा मी एकच गोष्ट केली..तिला काय म्हणायचं होतं ते ऐकलं. बरेचदा अडचणीत असलेला माणूस व्यक्त होतो तेव्हा त्याला समोरच्या माणसाने आपल्यापेक्षाही वाईट परिस्थितीचा सामना केलाय हे नव्याने कळतं. तात्पुरती का होईना मदत मिळते. हळूहळू तिने स्वतःच प्रयत्नाने भितीवर मात केली. 
       मी २०१४ साली इंजिनिअरिंग पूर्ण केलं. नंतर नोकरीसाठी उपयोगी ठरतील असे कोर्स वगैरे. माझी प्लेसमेंट कॉलेजमधून झाली नव्हती. बऱ्याच कंपन्यांसाठी मुलाखतीचे २- ३ राउंड क्लिअर करूनही निवड कुठे झाली नव्हती.कुठेतरी कमी पडत होते.कोर्स पूर्ण केला त्या संस्थेतूनही बऱ्याच ठिकाणी जॉब च्या संधीसाठी अर्ज, मुलाखती हे सगळं नित्याचं झालं होतं. बरेचदा १-२ जागांसाठी शेकडो लोक शॉर्टलिस्ट झालेले बघितले, एवढं करूनही काही वेळेस अचानक जागा (vacancies) रद्द केल्याचं कळायचं. पूर्वी ज्यांची फक्त नावंच ऐकली होती अशा  पुण्यातल्या अनेक भागांत या निमित्ताने पायपीट केली. तिथे माझ्यासारखे अनेकजण भेटायचे.सगळे सोपस्कार पार पाडून पहिली नोकरी किमान काही लाखांच्या पॅकेजची असेल हे सगळ्या अभियंत्यांना वाटत असलं तरी खूप जणांना सुरुवातीला आय.टी. आय, डिप्लोमा हा पात्रतानिकष (eligibility criteria) असलेले ,तुटपुंज्या पगाराचे जॉबही पत्करावे लागतात हे इथलं सत्य आहे. बहुधा दहावी, बारावीत, आणि पदवी अभ्यासक्रमात कधीही अपयश न पाहिलेल्या  माझ्यासाठी हे आयुष्यातलं सर्वात पहिलं मोठं अपयश होतं. पप्पांची रिटायरमेंट जवळ आली होती. घरून दबाव असा नव्हता पण कर्तव्याची जाणीव लाज वाटायला प्रवृत्त करायची.प्रत्येकाच्या आयुष्यात असा काळ असतोच पण त्याचा मोठा कालावधी आणि सततच्या नकारात्मक घटनांमुळे एक क्षण असा आला की मला वाटलं - या क्षेत्रात माझ्यासाठी काहीच नाही का ? पुढेही मला संधी मिळाली नाही तर काय करायचं? आजवर मिळवलेलं ज्ञान आणि कौशल्य याच्या बळावर मी माझ्या गरजा भागवू शकते का ? शेवटच्या प्रश्नाने माझा पिच्छा सोडला नाही आणि मी एक प्रकारे स्वतःलाच आजमावून बघायचं ठरवलं. मी काहीतरी करू शकते हा आत्मविश्वास..जो मला सोडून जात होता त्याला परत मिळवण्याची ती धडपड असावी. 
            माझ्या घरापासून काही अंतरावर असलेल्या एका कोचिंग क्लासमध्ये शिक्षकासाठी एक तात्पुरत्या स्वरूपाची जागा (vacancy) आहे असं कळलं.दुसऱ्याच दिवशी मी क्लासच्या संचालिका मॅडमना भेटले.माझ्या दहावी बारावीच्या मार्कशीट्सवर असलेले नव्वदच्या घरातले आकडे, आणि फर्स्टक्लास इंजिनिअरिंगची पदवी पाहून  तू या जॉबसाठी का आलीयेस? हा प्रश्न त्यांनी मला केला. मी वस्तुस्थिती सांगितली."माझे प्रयत्न चालू आहेत पण तोवर रिकामं बसून येणारी अस्वस्थता नकोय,आणि मला वाटतं मी हे काम करू शकते." हा माझा युक्तिवाद त्यांनी ऐकला आणि दुसऱ्या दिवशी नववीच्या पाठ्यपुस्तकातल्या २ मुद्द्यांवर सेमी इंग्रजी आणि मराठीसाठी प्रत्येकी एक डेमो लेक्चर (प्रात्यक्षिक पाठ) द्यायला ये असं सांगितलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी तयारी करून क्लासमध्ये गेले. २ संचालिकांसमोर डेमो दिला. त्यांना योग्य वाटला आणि उद्यापासून तू येऊ शकतेस असं त्यांनी सांगितलं. पण हे सांगताना मला अजून एक प्रश्न विचारला. त्या म्हणाल्या "आम्ही या वर्षीपासून अकरावी आणि बारावीच्या वर्गांसाठीही क्लास सुरु करण्याचा विचार करतोय कारण तशी विचारणा पालक आणि विद्यार्थ्यांकडूनही होते. तू इथल्या वेळा पाळून तुझ्या interviews  ला जाऊ शकतेस, एक ना एक दिवस तुला जॉब मिळेल.फक्त तू इथून जाशील तेव्हा आमची अकरावी-बारावीची बॅच अगदी नियमित स्वरूपाची, स्थिर झाली असेल एवढं जर आम्ही तुझ्यासोबत साध्य करू शकलो तर आमचाही फायदा होईल. तू अकरावी बारावी ला Maths (गणित) शिकवशील ?" मी होकार दिला.
      दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० ला दहावीच्या वर्गात गेले. आधीच काडीपहलवान, त्यामुळे नवीन ऍडमिशन ?(शिकायला आलीयेस ?) असा प्रश्न मला काही मुलींनी विचारला.काही दिवसांतच ५-१० विद्यार्थ्यांसोबत अकरावी-बारावी चे वर्गही सुरु झाले.हळूहळू संख्या वाढत होती.काम रोज सकाळी आणि संध्याकाळी प्रत्येकी ३-४ तास, म्हणजे २ शिफ्ट्स, २ बॅच, सारखा अभ्यासक्रम, दिवसा जो काही रिकामा वेळ मिळायचा त्यात नोट्स काढणे, शिकवलेलं समजेल इतपत आधी स्वतःअभ्यास करणे असा माझा दिनक्रम होता. मी काहीतरी शिकवतेय अशी कल्पना मी कधीतरी केली होती. एखादा भाषा विषय शिकवतेय, एखादी छान कविता, धडा अशी कल्पना १०० वेळा केली असेल.पण..गणितासारखा विषय शिकवेल अशी नाही.हळूहळू सगळं अंगवळणी पडलं. त्यांच्यातलीच एक वाटत असल्याने असेल कदाचित पण विद्यार्थी-विद्यार्थिनी सगळेच खूप फ्रेंडली वागायचे. त्यांच्या शंका विचारायचे. मला कुणी कधीही वर्गात त्रास दिल्याचं मला आठवत नाही. शाळेत असताना वक्तृत्व स्पर्धांची सवय असल्याने विद्यार्थ्यांसमोर उभं राहून बोलताना फजिती वगैरे झाली नाही.पण एवढंच पुरेसं नसतं. आपण शिकवलेला एखादा मुद्दा समोरच्याला समजलाय एवढी एकच गोष्ट शिक्षकांना समाधान देते.क्लास टेस्ट्स मधून जे काही निकाल यायचे त्यातून संचालिकाही समाधानी होत्या. माझ्या नकळत अनेकदा त्या वर्गात काय चाललंय, सगळं रुळावर आहे का हे बघायच्या.माझ्या सर्व शिक्षकांना मनोमन नमस्कार केला होता मी तेव्हा.
         जवळपास चार महिने मी हे काम करत राहिले. त्राग्याने नाही, तर मन लावून केलं, एन्जॉय केलं.निराश होणं, भीती वाटणं हा काही गुन्हा नाहीये. तसं वाटणं हे ओक्के आहे. आपण माणसं आहोत तर या सगळ्या भावना आल्याच. फक्त सतत त्यातच अडकून राहण्यापेक्षा आपण त्यावर मात करू शकतो.वाचून कदाचित हसू येईल पण मला जे काही वाटतं ते सांगायला कुणी नसेल तर मी देवालाच ती गोष्ट सांगते. आमच्या सोसायटीत प्रवेश करताच दिसतं ते गणपतीबाप्पाचं मंदिर.त्यामुळे इथून बाहेर पडताना मंदिरासमोर थबकणं हे सहज घडतं.मी कित्येक वेळा वरदविनायकाकडे -  जे होतंय त्याला सामोरं जाण्यासाठी शक्ती दे असं म्हणायचे, आजही म्हणते. तुमच्या आस्था, श्रद्धा तुमची जीवनशक्ती वाढवतात हे अगदी खरं. एखादी प्रार्थना, प्रेयर, कलमा तुम्हाला आनंद देत असेल तर रोजच्या दिनक्रमात त्याचा समावेश असू द्यावा. अर्थात सर्वांनी आस्तिकतेकडे वळायला हवं हे मला सांगायचं नाहीये. आस्तिक/ नास्तिक असणं ही प्रत्येकाची वैयक्तिक निवड आहे आणि त्याचा आदर आहे. पण आकाश, धरती,सूर्यप्रकाश, पाणी, झाडं, एकंदरीत निसर्ग हा डोळ्यांनी दिसतो आणि त्याची पूजा केली नाही तरी माणूस त्याच्या भव्यतेपुढे नतमस्तक होतो. सूर्यासमोर सकाळी डोळे बंद करून उभे राहिलो तर डोळ्यासमोर अनेक रंग दिसतात  हे निरीक्षण केलंय? सुरुवातीला सोनेरी, मग गडद पिवळा, गुलाबी, केशरी, आणि  डोळे अजून गच्च मिटले तर गडद लाल असा त्यांचा क्रम असतो. नंतर डोळे उघडाल तेव्हा एवढी एक लहान कृतीसुद्धा तुम्हाला दिवसाची सुरुवात चांगली करून देते याची अनुभूती घ्याल. बाकी योग,संगीत, छंद, व्यक्त होणं याचं महत्व आपण जाणतोच.
        पहिल्या पगाराचा सहा हजारांचा चेक आईकडे दिला होता तेव्हा ती मला म्हणाली होती, एवढ्यात   निराश का होतेस ? नाही केली ही नोकरी तरी चालेल. तेव्हा मला हे करण्यामुळे किती सकारात्मक वाटतंय हे मी तिला सांगितलं,तिलाही बदल जाणवला असावा. नंतर पगार वाढवला गेला.चार महिन्यांनंतर जेव्हा मी क्लास सोडला तेव्हा अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या ५०-६० च्या घरांत होती. शेवटच्या दिवशी संचालिका मॅडमनी एका वाक्याने मला निरोप दिला- "कदाचित तुला गरज पडणार नाही पण तरी ही जागा तुझ्यासाठी लाईफटाइम खुली (open) राहील. कधीही यावंसं वाटलं तर तुझं स्वागत आहे." . माझ्या नंतरच्या प्रवासातही या वाक्याने मला खूप खूप बळ दिलंय. त्यासाठी मी त्यांची कायम ऋणी राहीन. आपण अगदीच  नालायक नाही, तर- ठरवलं तर संधीचं सोनं करू शकतो हा विश्वास मला या अनुभवाने दिला. मी खूप काही शिकले, आधीपेक्षा जास्त मजबूत बनले. नंतर मला अपेक्षित असलेली माझ्या क्षेत्रातली  नोकरी मिळाली.
           मी आयुष्यात खूप  मोठा टप्पा गाठलाय असं नाही, मीही सामान्य, अतिसामान्य आहे. हा अनुभव सांगितला तो खासकरून माझ्या तरुण मित्र-मैत्रिणींसाठी.. ज्यांच्यापैकी काहींनी बऱ्याच ठिकाणी कामाचे प्रयत्न केले होते आणि त्यानंतर आता सुरु असलेली सगळी अनिश्चितता त्यांना चिंतेत टाकतेय. मित्रांनो, आत्ता आणि कधीही एक गोष्ट लक्षात ठेवा की स्वाभिमानाने आणि प्रामाणिकपणाने स्वीकारलेलं कोणतंही काम करताना लाज वाटू देऊ नये. आपल्यातली बरीच कौशल्य आपण कधीकधी आजमावून पाहिलेलीच नसतात. कठीण काळी, त्यांचा वापर होऊ शकतो. अपयशाच्या अंधारातून जरा दूर पहाल तर कदाचित आधी न पाहिलेल्या संधी दिसतील. परिस्थितीवश का होईना, तात्पुरत्या स्वरूपासाठी का होईना पण असं एखादं वेगळं काम केल्याने तुम्हाला सकारात्मक वाटणार असेल तर नक्की करा. काही गोष्टींपासून काही काळाकरता दूर जायचं असेल तर जा, पण आयुष्यापासून नाही. आणि हो, सर्वात महत्वाचं- यश मिळाल्यावर आपल्या कठीण काळात आपल्या पाठीशी उभ्या असलेल्या व्यक्तींना विसरू नका. शक्य असेल तर तुम्हीही त्यांच्यासारखंच व्हा ..जेणेकरून या जगात वाईटाबरोबरच  चांगल्या प्रवृत्तीची माणसंही आहेत ही भावना एखाद्या हरू पाहणाऱ्या व्यक्तीला जगवेल, अगदी तसंच.. जसं तुम्हालाही जगवलं होतं कधीतरी...
            ज्या सुंदर गाण्याने लिहायला सुरुवात केली होती त्याचा शेवटही खेबुडकर सरांनी खूप सुंदर केलाय. ओळी आहेत -
                     "सूक थोडं, दुक्क भारी, दुनिया ही भली-बुरी
                       घाव बसंल घावावरी, सोसायाला, झुंजायाला, अंगि बळं येउ दे !"
दिसणाऱ्या, न दिसणाऱ्या, बारीक डोळ्यांनी पण वाकड्या नजरेने पाहणाऱ्या अनेक छुप्या गोष्टींशी आपली लढाई चालू ठेवायची आहे. तेव्हा - Be Kind & Stay Strong.
(हे गाणं सर्वानी आधी ऐकलं असेलच, नसेल ऐकलं, ऐकून खूप दिवस झाले असतील यापैकी काहीही असेल तरी पुन्हा एकदा जरूर ऐका,बघा.)

                                                                                            - अमिता.

Note - लेनं - लेणं - दागिना 
           चनं- चणे 
           आबरु- अब्रू, इज्जत  
           सूक- सुख, दुक्क- दुःख 
            
       

Tuesday, 12 May 2020


रिश्तें दुनियादारी सीखते हैं,
तो हाथों से छुटते हैं 
कुछ लुटाते रहते हैं जिंदगीभर..
तो कुछ..बस लूटते हैं

क्या खोया, क्या पाया
इसका ज्यादा हिसाब ना कर,
पढ़ते पढ़ते मैली..
जिंदगी की किताब ना कर..

दुख में त्यागो विषाद 
और सुख में -अभिमान !
मुस्कुराकर कर्म करना,
कह गये कृपानिधान...
#यूँही...
#LessonsOfLife                           -©अमिता  

Friday, 3 April 2020

स्वसंवाद_१

                     

           
            नमस्ते..ओळखलंत मला...? मी कोण ? सध्या आपल्या देशात आणि जगभरात उद्भवलेल्या विचित्र परिस्थितीत तुमच्यासाठी सर्वात सुरक्षित असलेली जागा म्हणजे मी..अर्थात तुमचं स्वतःचं घर ! हो, तुमचं तेच घर - शहरातलं किंवा गावातलं, छोटं किंवा मोठं, होस्टेलची खोली, तुमचा बंगला वा फ्लॅट, किंवा लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर तुम्ही सध्या जिथे आहात ते घर. हे कोरोनाचं संकट चीनमधून इथे येऊन पोचेल असं मला आधी वाटलं नव्हतं पण तुमच्या बोलण्यातून हळूहळू त्याची तीव्रता समजली.
           एरवी तुम्ही सोबत नसताना मला दिवसभर जाणवायची -भिंतीवर अडकवलेल्या घड्याळाची टिकटिक. माझी सोबतीण. तुमच्यापैकी बरेच जण सुट्टीच्या दिवशीही outing , सहली,किंवा इतर प्लॅन्स मध्येच असायचा. गृहिणी सोडल्या तर कुणाचं माझ्याकडे फारसं लक्ष नसायचं. पण आता वेळ मिळाल्यावर कुणीतरी माझ्या भिंतीवरचं जाळं काढलं तेव्हा मला  कधीतरी ऐकलेल्या 'निदा फाजली' यांच्या २ ओळी आठवल्या.
                      "पत्थरों में भी जुबाँ होती है, दिल होता है 
                      अपने घर की दर-ओ-दीवार सजाकर देखो ..."
       गेल्या ८ -९ दिवसांपासून माझ्यात राहणारी वेगवेगळ्या प्रकारची माणसं मला पुन्हा नव्याने अनुभवायला मिळताहेत. ज्यांना 'वर्क फ्रॉम होम ' आहे ते कामांमुळे बऱ्यापैकी व्यस्त आहेत पण त्यांचा-माझा सहवास आधीपेक्षा वाढलाय. ज्यांचं काम ठप्प आहे ते वेळ कसा घालवायचा? हे शोधताना माझ्याकडे पूर्वीपेक्षा जास्त लक्ष देऊ लागले आहेत. याआधी क्वचितच स्वयंपाकघरात पाऊल टाकणाऱ्या बऱ्याच जणांनी, अगदी सेलिब्रिटीनीही किचनकडे मोर्चा वळवला. माझ्या फरशीवरचे ठिपके मोजण्याचे विनोद संपल्यावर फरशी पुसायलाही लागते याची जाणीवही बऱ्याच जणांना झाली. काही ठिकाणी गृहिणींचं काम वाढलंय पण फक्त वेगवेगळ्या ऑर्डर्स देण्यापेक्षा स्वतःही काही करणारे लोकही मी पाहतोय. नात्यांमधला संवाद अनुभवतोय.
              एक दिवस आपल्या बाल्कनी आणि खिडक्यांजवळ उभे राहून तुम्ही या संकटाशी प्रत्यक्षपणे (ऑन-फिल्ड) लढणाऱ्या  डॉक्टर्स, नर्स, स्वच्छता कर्मचारी, पोलीस आणि अत्यावश्यक सुविधा पोचवणाऱ्या सर्वांचे आभार मानलेत तेही मी पाहिलं. एकीकडे हातावर पोट असणारी अनेक माणसं माझ्याकडे येण्यासाठी पायी प्रवास करताहेत हे ऐकून मन हेलावलं.. काम बंद..पैसे संपल्यावर काय ? या चिंतेतून त्यांनी हा निर्णय घेतलाय तरी या तुमच्याच या सर्व बांधवांना ते आहेत तिथेच सुरक्षित राहू शकतील असा निवारा,जेवण,आवश्यक सेवा, त्यांना मिळाव्यात म्हणून सर्व यंत्रणा काम करतेय. पण दुसरीकडे तुमच्याच सुरक्षेसाठी हे सगळं असताना क्षुल्लक कारणं सांगून घराबाहेर पडणारी काही  माणसं.. या यंत्रणांवर भार टाकतायेत..हे काही पटलं नाही. अत्यावश्यक गोष्टी वगळता बाहेर पडायचा विचार आला तर एकदा या सर्वांना आठवा. कोरोना रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर्स, त्यांची देखभाल करणाऱ्या परिचारिका (नर्स) माझ्याकडे (घराबाहेर) आल्यावर घरातून त्यांच्यासमोर एक प्लास्टिक अथवा धातूचं भांडं ठेवलं जातं. त्यात पेन, पट्टा, मोबाईल, घड्याळ  इत्यादी त्यांनी वापरलेल्या वस्तू  टाकल्या जातात. त्यावर जंतुनाशक फवारलं जातं. बराच वेळ वस्तू तशाच ठेवल्या जातात. मग त्यांच्या शरीरावरही जंतुनाशक फवारलं जातं, त्यानंतर ते सरळ स्नानगृहात जातात आणि त्यानंतरच आपल्या कुटुंबियांशी संपर्कात येतात. अंघोळीआधी साबण आणि गरम पाण्यात भिजवून कपडे धुतले जातात आणि हे सगळं... रोज करावं लागतं. सर्वांच्या सुरक्षेसाठी जीवाचा धोका पत्करून आपापली कर्तव्ये ही माणसं पार पाडत असतील तर तुम्ही एक सुजाण नागरिक म्हणून असलेलं आपलं कर्तव्य नक्कीच पाळू शकता. तुम्ही सर्वांनी ठरवलंय तसंचं रहा अजून काही दिवस माझ्याजवळच. सरकार, डॉक्टर्स यांचे सल्ले पाळा. अत्यावश्यक गरजा सोडता घराबाहेर पडला नाहीत तर यंत्रणांवर ताण पडणार नाही आणि तुमची ही संयमी लढाई तुम्हाला नक्की विजयी करेल.
        मनोरंजनाची साधनं आहेतच, खूपच कंटाळलात तर बोला माझ्याशी, इतरांशी. ऐका, वाचा. घरबसल्या या संकटावर मात करण्यासाठी देशभर जी मदत करू शकता ती करा. "अंतरं राखूनही अंतर पडत नाही" याचा प्रत्यय तुम्हाला येईल. लॉकडाऊन संपल्यानंतरही हे कठीण दिवस तुम्हाला तुमच्या संयम आणि सामर्थ्याची जाणीव करून देत राहतील. तुमचे छंद, राहून गेलेलं एखादं काम, एखादं कौशल्य शिकणं यासाठी हा वेळ वापरू शकता. खरं सांगू..? तुम्हाला या संकटात पाहताना मलाही फक्त तुमच्या सहवासामुळे चांगलं वाटतंय असं नाही..शेवटी माझं अस्तित्व तुमच्यामुळेच आहे. या चार भिंतींना तुम्ही माणसंच तर घरपण देता. जिथे तुमची कहाणी असते..तुमच्या भावना असतात. तुमच्या आनंदाचे, दुःखाचे, उमेदीचे, निराशेचे, यशाचे..सगळेच क्षण तुमच्यासोबत माझ्यापर्यंत येतात आणि आठवणी माझ्याकडे राहतात. घरात राहून या संकटावर मात करून पुन्हा एकदा हे सगळे क्षण परत मला द्याल अशी आशा करतो. या संकटाच्या वेळीही तुम्ही सर्व भारतीय सोबत आहात आणि मी तुमच्यासोबत ! अजून थोडे दिवस माझ्याजवळ रहा, स्वच्छता राखा, काळजी घ्या,स्वस्थ रहा.
                                                                                              - तुमचंच,
                                                                                                  घर.
#स्वसंवाद
#IndiaFightsCorona
                     
                                                                                                                                                                                                                   -©अमिता.
                                                                                                                                      PC- google

Saturday, 22 February 2020

नूतन...

                               


                                     इन आँखों ने काजल से,
                                     इन होठों ने बादल से कहा था 
                                     ये मुस्कान हमेशा जिंदा रहेगी..
                                     क्योंकि..
                             फूल..कभी वक्त की कमी का अफसोस नहीं करते...!
      लहानपणी दूरदर्शन (DD नॅशनल) च्या फिल्मोत्सवमध्ये 'सौदागर' हा चित्रपट पहिला होता.  कथेतल्या भाव-भावनांची गुंतागुंत पुरेपूर समजण्याचं ते वय नव्हतं. पण अगदी आपल्या घरात आपल्या आईचा वावर असतो तसाच सहज वावर पडद्यावर असणारा हा चेहरा कोण ? हा प्रश्न तेव्हा पडला होता. नंतर कधीतरी  'सावन का महिना, पवन करे सोर ' या गोड गाण्यातून ती पुन्हा दिसली..बोलके डोळे,गव्हाळ रंग,लांब केसांची निसटती वेणी, "अरे बाबा शोर नहीं..सोर, सोर! " असं सुनील दत्तनी म्हणताच जीभ बाहेर काढून अचूक गाणं गाणारी ती..या चेहऱ्याचं नाव नंतर कळलं - "नूतन !" आणि पाहता पाहता हा चेहरा, ते भाव ओळखीचे होत गेले आणि मग आवडते झाले.
         सौदागर मधल्या 'तेरा मेरा साथ रहे' या गाण्यात आणि एकूणच या चित्रपटात नायकाची (अमिताभ बच्चन) एक समर्पित पत्नी इतकी सुंदर साकारलीय नूतनजींनी. रवींद्र जैन यांचं मधुर संगीत, आनंद बक्षींचे बोल आणि लतादीदींच्या स्वरांना तिची देहबोली, भाव (expressions) यांनी यथार्थ न्याय देऊन गाणं खूप जिवंत आणि सुंदर केलंय. lips sync इतकं परफेक्ट की बघणाऱ्याला स्वतः नूतन गात असल्याचा भास होतो. त्या काळातले बहुतेक कलाकार या गोष्टीकडे लक्ष देत असत. दिग्दर्शक व कवी - कुमारसेन समर्थ आणि आई - अभिनेत्री शोभना समर्थ या मराठी दाम्पत्याची कन्या असलेल्या नूतनला एका चित्रपटातून आईने या क्षेत्रात पदार्पण करायची संधी दिली असली तरी तिला खरी ओळख दिली नंतरच्या काळात म्हणजे १९५५ नंतरच्या अनेक भूमिकांमधून..सीमा, बंदिनी, सुजाता, पेयिंग गेस्ट, मिलन,सरस्वतीचंद्र इत्यादी चित्रपटांनंतर तिनं कधी मागे वळून पाहिलंच नाही. राज कपूर, देव आनंद, धर्मेंद्र या आघाडीच्या कलाकारांबरोबर काम करतानाही तिच्या भूमिका या महत्वाच्या,भाव-भावनांचे खूप पदर दाखवणाऱ्या, सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या, रोमँटिक,विनोदी अशा सर्व प्रकारच्या होत्या. आपल्या सहज सुंदर, नैसर्गिक अभिनयातून हे भाव उलगडून दाखवण्याचं कौशल्य तिच्याकडे होतं. बरोबरीला साधेपणातलं सौंदर्य (beauty in simplicity) ही प्रतिमा तिनं जपली आणि प्रेक्षकांना आणि समीक्षकांनाही ती भावली. काळानुरुप चरित्र भूमिकांकडेही ती वळली. दिलीप कुमार  यांच्यासोबत आलेला 'कर्मा' हा १९८० च्या दशकातला तिचा असाच चित्रपट. 
       अवॉर्ड सोहळ्यांभोवती वादाचं वलय नसतानाच्या दशकांमध्ये फिल्मफेअर चे ६ अवॉर्ड्स नावावर असणारी ही अभिनेत्री प्रत्यक्ष जीवनातही विचारी, काहीशी अंतर्मुख(introvert), साधेपणा जपणारी होती.मी तिचे सर्वच चित्रपट पाहिलेले नाहीत पण प्रत्यक्ष न भेटूनही तिच्या गहिऱ्या डोळ्यांत कधी कारुण्याची वा ममतेची किनार दिसते तर कधी एखादी कहाणी त्यात दडलीय का ? असं वाटून जातं. नेव्हीत लेफ्टनंट कमांडर असलेले तिचे पती 'रजनीश बहल' यांची एक जुनी मुलाखत माझ्या वाचनात आली.(प्रसिद्ध अभिनेता मोहनीश बहल हे नूतन आणि रजनीश बहल यांचे पुत्र) मोठी अभिनेत्री असण्याचा अभिनिवेश न दाखवता आपल्या घरात (सासरी) सर्वांसोबत जुळवून घेण्याच्या तिच्या स्वभावाचं कौतुक त्यांना होतं. तिच्या फिल्मी करिअरला बहल कुटुंबाकडून तेवढाच पाठिंबा होता. ते म्हणतात ,पार्ट्या, फंक्शन इत्यादी ठिकाणी " मी हे शूज इतक्या हजारांत घेतले, इंपोर्टेड आहेत " याच प्रकारच्या गप्पा करणाऱ्या बायकांपेक्षा ती वेगळी होती, तिला genuine माणसं आवडायची. ती तेवढीच विनोदी आणि मुद्द्याचं बोलणारीही होती. 
         अभिनयाबरोबरच मला तिची ही बाजूही आवडली. मोठ्या माणसांचं जमिनीवर (down to earth)असणं हे खरंच खूप सुखद आणि पुढच्या पिढीसाठी प्रेरक असतं. २१ फेब्रुवारी १९९१ या दिवशी वयाच्या ५४ व्या वर्षी तिनं जगाचा निरोप घेतला. आयुष्याच्या शेवटच्या काही वर्षांत तिनं कृष्णाची काही भजनं स्वतः लिहिली आणि गायलीही होती. लेखन, गायन, नृत्य, दिग्दर्शन क्षमता, अध्यात्म या सगळ्या गोष्टींमध्ये नवीन शिकण्याची, करण्याची सवय तिला होती.आपलं काम, आपली माणसं, आणि आपल्या भावना यांच्याशी प्रामाणिकपणे ती जगली असं मला वाटतं. 
         रजनीशजींच्या त्या मुलाखतीतली एक गोष्ट हृदयाला स्पर्शून गेली. नूतन जग सोडून गेल्यानंतरच्या वर्षात रजनीशजींच्या आई (ज्यांचं वय त्यावेळी होतं - ८७ वर्षे), एकदा त्यांना फोन करून म्हणाल्या "मुझे नूतन बहुत याद आ रही है..तभी मैं तुझे फोन कर रही हूँ ". सतत आपल्याजवळ न राहिलेल्या, आपल्या प्रथितयश अभिनेत्री असलेल्या दिवंगत सुनेच्या आठवणीने आपल्या मुलाशी बोलून मन हलकं करणारी सासू..हे घडण्यासाठी मनांमध्ये भावनेचा ओलावा असावा लागतो..जो त्यांनी अनुभवला असावा. 
                         खुशबू वही..जो बिखरके भी दिलों में जतन हो
                         कौन कहता है पुराने जमाने की ?    
                         तुम आज भी..' नूतन ' हो... 
       नूतनजींचा भावस्पर्शी अभिनय रसिक प्रेक्षकांच्या मनात कायम राहील.त्यांना नमन आणि भावपूर्ण श्रद्धांजली!
# in the remembrance of legendary  actress नूतनजी. (4 June 1936- 21 Feb 1991)
Simple+beautiful+natural expressions= class❤
                                                                               -©अमिता अशोक पाटील.
                                                                    Picture Editing- Ganesh Patil

Sunday, 19 January 2020

कॅरी ऑन...!

   

        
           "हॉल टिकीट ऍण्ड आय.डी. प्रूफ..!!" .शाळेच्या प्रवेशद्वाराशी घोषणा झाली. स्थळ- कॅम्प मधली एक कॉन्व्हेंट शाळा. " हो, तेच करतो आता आयुष्यभर " गर्दीतून कुणीतरी त्राग्याने म्हणाला. काही वर्षांनी निघालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या अर्थात TET च्या केंद्रावरचं हे दृश्य. धकाधकीच्या आठवड्यानंतर शनिवार-रविवार (weekend)  नोकरदारांसाठी आरामाचा असतो. दुसरीकडे बरेचदा विविध परीक्षाकेंद्रांवर पुण्यात (आणि इतर शहरांतही) अशी लगबग असते. 
          परीक्षार्थींमध्ये काही पदवीधर आणि काही अर्थातच सध्या तात्पुरत्या(टेम्पररी) नियुक्तीवर काम करणारी शिक्षक मंडळी होती. त्यात महिलांची संख्या जास्त होती.  खूपजणींसोबत त्यांची छोटी बाळंही आली होती. बेल झाली. परीक्षार्थींना मुख्य प्रवेशद्वारातून आत सोडल्यावर लागलीच ते (गेट) बंद केलं गेलं. आत्तापर्यंत दिसणारी आई कुठेय हे न कळल्यानं काही मुलं सैरभैर झाली, काही झोपलेली होती. ज्यांना बोलता येतं अशांनी आपापल्या बाबांना आई कुठेय ? कधी येणार ? वगैरे प्रश्नांची सरबत्ती सुरु केली. एक चिमुकली तर मुसमुसून रडत होती. "मामा येतोय बेटा घ्यायला, आई लगेच येणारे आणि.." तिचे बाबा तिची समजूत काढत होते. 
          आणि यानंतर सुरु झाली ती परीक्षेला गेलेल्या अनेकींच्या नवऱ्यांची आणि आई बाबांची (बाळांच्या बाबांची किंवा आजी/आजोबांची) कसरत! परीक्षा केंद्रात बसण्यासाठी किमान एक पडवी किंवा शालेय कामकाजात व्यत्यय येणार नाही अशा पद्धतीने प्रवेशद्वारालगतच का होईना पण ३-४ बेंचेसची जागाही उपलब्ध करून द्यायची  परवानगी आणि इच्छा नाही हे खूप जणांना खटकलं, काहींनी त्यावर रोषही व्यक्त केला. पहाटेपासून घरातून बाहेर पडलेली आणि तेही सासवड, भोर, भोसरी आणि इतर उपनगर व पुणे जिल्ह्यातून विविध ठिकाणाहून आलेली मंडळी यात असल्याने परत जाऊन येणं हे न परवडणारं आणि वेळेच्या दृष्टीनेही शक्य नव्हतं, तेव्हा असं वाटणं स्वाभाविकच होतं. 
           त्यातूनही एकाने पर्याय काढला. एका मोठ्या कापड दुकानाच्या इमारतीसमोरच्या मोकळ्या जागेत आडोसा होता आणि एक चिंचेचं झाडही. त्यांनी पटकन सोबत आणलेली सतरंजी अंथरली. बाळाला खेळायला एक बॉल दिला. सतत पायाला भिंगरी लावून फिरणाऱ्या मोठ्या मुलीकडे लक्ष ठेवत येणारे फोन कॉल्स घेणं, कुणी विचारपूस केली तर हसत उत्तरं देणं हेही सुरु होतं. एका बाळाच्या बाबांनी घरून येताना खेळण्यातले(प्लास्टिकचे) बरेच प्राणी खिशात घालून आणले होते.  एकेक करून ते बाळाच्या हाती दिले की ते हसता हसता थोड्या वेळासाठी आईला विसरत होतं. सकाळी एक आणि दुपारच्या सत्रात एक असे दोन पेपर असणाऱ्यांसाठी ही सगळी कसरतही दुप्पट होती. त्यात कालचा रविवार 'पोलिओ रविवार' असल्याने जवळचा पोलिओ बूथ शोधून या मुलांना पोलिओ डोस देऊन आणण्याचं कामही केलं गेलं. नुकताच 'पंगा' या सिनेमाचा ट्रेलर पहिला. त्यात मुलाची जबाबदारी काही काळ स्वतः सांभाळत, मी करू शकेन मॅनेज असा विश्वास देत नायिकेला पाठिंबा देणारा नायक..असे नायक अवतीभोवतीही असतात हे पटलं. 
          दिवस संपता संपता या बाळांनी आपला खाऊ, खेळणी आपापसांत शेअर केली होती आणि त्यांना सांभाळणाऱ्या पप्पांनी, आजी/आजोबांनी गप्पा! शिक्षण क्षेत्रात कमी-अधिक प्रमाणात झालेले गैर व्यवहार, उपलब्ध जागा आणि उमेदवार यांच्या आकड्यातली तफावत, काही खाजगी संस्थांच्या शाळेत काही ठिकाणी नोकरीसाठी मागितली व दिली जाणारी लाखोंची रक्कम, आणि हे पर्याय नसतील तर तुटपुंज्या पगारात घर चालवत योग्य संधीची वाट पाहणं किंवा नोकरीचे दुसरे पर्याय स्वीकारणं अशी आजवरची एकूण परिस्थिती. हे सगळे प्रश्न या क्षेत्रातल्या मंडळींना माहित आहेतच. म्हणूनच या पार्श्वभूमीचा विचार करता काही काळानंतर मिळालेली आजची (परीक्षेची) ही संधी न सोडता आजमावून पाहिलीच पाहिजे म्हणून एक दिवस ऍड्जस्ट करूया ही भावना सगळ्या चेहऱ्यांवर होती. 
         प्रत्येक क्षेत्राची, प्रत्येक व्यक्तीची, आपापल्या आयुष्यातली वेगवेगळी आव्हानं (challenges) आहेत. कदाचित..कोणतीच परीक्षा शेवटची नसते पण एखादी परीक्षा आयुष्यातला टर्निंग पॉईंट म्हणजे कलाटणी देणारी गोष्ट होऊ शकते. या वेगवेगळ्या परीक्षांमधल्या यशापयशाची कारणंही व्यक्तिपरत्वे भिन्न आहेत पण आपण ठरवलेला लहान-मोठा टप्पा गाठेपर्यंत स्वतःच स्वतःला सांगावं लागतं -  "Carry on...(प्रयत्न सुरु ठेव..)!''
             शेवटची बेल झाली. मुख्य प्रवेशद्वार (मेन गेट) उघडलं गेलं. आपापल्या आईचा चेहरा शोधणाऱ्या अनेक नजरा..तो चेहरा दिसताच दोन्ही हात खुले करून.. दुडूदुडू धावत इतका वेळ ज्यांची प्रतीक्षा केली त्या खांद्यांवर विसावल्या. प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक हाताला यशही अगदी असंच मिळो...सो..कॅरी ऑन...!
                                                                            -©अमिता अशोक पाटील. 
                                                                                 (P.C.- नम्रता पाटील)