"ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे
आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे"
मला आवडणाऱ्या अनेक गाण्यांपैकी 'साधी माणसं' या चित्रपटातलं हे गाणं आहे. जयश्री गडकर आणि सूर्यकांत यांच्यावर चित्रित झालेलं,लता मंगेशकरांनी गायलेलं आणि लिहिलं आहे - जगदीश खेबुडकर यांनी. हज्जार 'आय लव यू' फिके पडतील अशा दोन ओळी या गाण्यात आहेत.
''लेवू लेनं गरीबीचं, चनं खाऊ लोकंडाचं
जिणं व्हावं आबरुचं, धनी मातुर, माजा देवा, वाघावानी असू दे''
कित्येकदा फक्त " मी तुझ्या सोबत आहे, काळजी करू नकोस" असं नुसतं सांगणंही पुरेसं असतं. भात्यावर काम करताना खूप धीराचं बोलून जाते ही नायिका.
माझी एक मैत्रीण आहे- ऑफिसमधली सहकारी. ती जेव्हा नव्याने कामावर रुजू झाली होती तेव्हाची, साधारण तीन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.तिचा हा पहिलाच जॉब. ती इथे पुण्यात आणि कुटुंब- गावी. तिची आई एका दुर्धर आजाराशी लढत होती.रोजच्या कामात काही अडचण आली, एखाद्या गोष्टीचं टेन्शन आलं की तिला रडू यायचं. ते रडणं फक्त कामातल्या अडचणींमुळे नाही तर सगळी परिस्थिती आठवून असायचं. आजूबाजूच्या अनेकांना वाटायचं- रडण्यासारखं काये त्यात ? ज्या मुलींसोबत फ्लॅट शेअर करायची त्यांनी सुद्धा 'इरिटेटिंग' असल्याचं लेबल लावून टाकलं होतं. तिचं म्हणणं ऐकून घेणाऱ्या आम्हा दोन-चार लोकांना "तुम्हाला बोअर होत नाही का?" असंही काहींनी विचारलं होतं.तेव्हा प्रकर्षाने जाणवलं होतं..बरेचदा आपण माणसं खूप बोलतो, बऱ्याच विषयांवर. पण आपण ऐकतो का ?एखाद्याच्या मनात चाललेलं वादळ आपण बघू शकतो का ? हसऱ्या, खेळणाऱ्या बाळांना घेण्याची, खेळवण्याची हौस सगळ्यांनाच असते. पण लक्ष देण्याची (attention ची) खरी गरज रडणाऱ्या, न खेळणाऱ्या बाळांना असते. त्यातही मोठी माणसं रडताना दिसत नाहीत.. पण जवळची माणसं इच्छा असेल तर त्यांना ऐकू शकतात. मला माहीत होतं -माझ्या मैत्रिणीच्या प्रत्येक समस्येवर कायमस्वरूपीचा उपाय माझ्याकडे नाही, मी सगळे प्रश्न सोडवूही शकत नाही. तेव्हा मी एकच गोष्ट केली..तिला काय म्हणायचं होतं ते ऐकलं. बरेचदा अडचणीत असलेला माणूस व्यक्त होतो तेव्हा त्याला समोरच्या माणसाने आपल्यापेक्षाही वाईट परिस्थितीचा सामना केलाय हे नव्याने कळतं. तात्पुरती का होईना मदत मिळते. हळूहळू तिने स्वतःच प्रयत्नाने भितीवर मात केली.
मी २०१४ साली इंजिनिअरिंग पूर्ण केलं. नंतर नोकरीसाठी उपयोगी ठरतील असे कोर्स वगैरे. माझी प्लेसमेंट कॉलेजमधून झाली नव्हती. बऱ्याच कंपन्यांसाठी मुलाखतीचे २- ३ राउंड क्लिअर करूनही निवड कुठे झाली नव्हती.कुठेतरी कमी पडत होते.कोर्स पूर्ण केला त्या संस्थेतूनही बऱ्याच ठिकाणी जॉब च्या संधीसाठी अर्ज, मुलाखती हे सगळं नित्याचं झालं होतं. बरेचदा १-२ जागांसाठी शेकडो लोक शॉर्टलिस्ट झालेले बघितले, एवढं करूनही काही वेळेस अचानक जागा (vacancies) रद्द केल्याचं कळायचं. पूर्वी ज्यांची फक्त नावंच ऐकली होती अशा पुण्यातल्या अनेक भागांत या निमित्ताने पायपीट केली. तिथे माझ्यासारखे अनेकजण भेटायचे.सगळे सोपस्कार पार पाडून पहिली नोकरी किमान काही लाखांच्या पॅकेजची असेल हे सगळ्या अभियंत्यांना वाटत असलं तरी खूप जणांना सुरुवातीला आय.टी. आय, डिप्लोमा हा पात्रतानिकष (eligibility criteria) असलेले ,तुटपुंज्या पगाराचे जॉबही पत्करावे लागतात हे इथलं सत्य आहे. बहुधा दहावी, बारावीत, आणि पदवी अभ्यासक्रमात कधीही अपयश न पाहिलेल्या माझ्यासाठी हे आयुष्यातलं सर्वात पहिलं मोठं अपयश होतं. पप्पांची रिटायरमेंट जवळ आली होती. घरून दबाव असा नव्हता पण कर्तव्याची जाणीव लाज वाटायला प्रवृत्त करायची.प्रत्येकाच्या आयुष्यात असा काळ असतोच पण त्याचा मोठा कालावधी आणि सततच्या नकारात्मक घटनांमुळे एक क्षण असा आला की मला वाटलं - या क्षेत्रात माझ्यासाठी काहीच नाही का ? पुढेही मला संधी मिळाली नाही तर काय करायचं? आजवर मिळवलेलं ज्ञान आणि कौशल्य याच्या बळावर मी माझ्या गरजा भागवू शकते का ? शेवटच्या प्रश्नाने माझा पिच्छा सोडला नाही आणि मी एक प्रकारे स्वतःलाच आजमावून बघायचं ठरवलं. मी काहीतरी करू शकते हा आत्मविश्वास..जो मला सोडून जात होता त्याला परत मिळवण्याची ती धडपड असावी.
माझ्या घरापासून काही अंतरावर असलेल्या एका कोचिंग क्लासमध्ये शिक्षकासाठी एक तात्पुरत्या स्वरूपाची जागा (vacancy) आहे असं कळलं.दुसऱ्याच दिवशी मी क्लासच्या संचालिका मॅडमना भेटले.माझ्या दहावी बारावीच्या मार्कशीट्सवर असलेले नव्वदच्या घरातले आकडे, आणि फर्स्टक्लास इंजिनिअरिंगची पदवी पाहून तू या जॉबसाठी का आलीयेस? हा प्रश्न त्यांनी मला केला. मी वस्तुस्थिती सांगितली."माझे प्रयत्न चालू आहेत पण तोवर रिकामं बसून येणारी अस्वस्थता नकोय,आणि मला वाटतं मी हे काम करू शकते." हा माझा युक्तिवाद त्यांनी ऐकला आणि दुसऱ्या दिवशी नववीच्या पाठ्यपुस्तकातल्या २ मुद्द्यांवर सेमी इंग्रजी आणि मराठीसाठी प्रत्येकी एक डेमो लेक्चर (प्रात्यक्षिक पाठ) द्यायला ये असं सांगितलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी तयारी करून क्लासमध्ये गेले. २ संचालिकांसमोर डेमो दिला. त्यांना योग्य वाटला आणि उद्यापासून तू येऊ शकतेस असं त्यांनी सांगितलं. पण हे सांगताना मला अजून एक प्रश्न विचारला. त्या म्हणाल्या "आम्ही या वर्षीपासून अकरावी आणि बारावीच्या वर्गांसाठीही क्लास सुरु करण्याचा विचार करतोय कारण तशी विचारणा पालक आणि विद्यार्थ्यांकडूनही होते. तू इथल्या वेळा पाळून तुझ्या interviews ला जाऊ शकतेस, एक ना एक दिवस तुला जॉब मिळेल.फक्त तू इथून जाशील तेव्हा आमची अकरावी-बारावीची बॅच अगदी नियमित स्वरूपाची, स्थिर झाली असेल एवढं जर आम्ही तुझ्यासोबत साध्य करू शकलो तर आमचाही फायदा होईल. तू अकरावी बारावी ला Maths (गणित) शिकवशील ?" मी होकार दिला.
दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० ला दहावीच्या वर्गात गेले. आधीच काडीपहलवान, त्यामुळे नवीन ऍडमिशन ?(शिकायला आलीयेस ?) असा प्रश्न मला काही मुलींनी विचारला.काही दिवसांतच ५-१० विद्यार्थ्यांसोबत अकरावी-बारावी चे वर्गही सुरु झाले.हळूहळू संख्या वाढत होती.काम रोज सकाळी आणि संध्याकाळी प्रत्येकी ३-४ तास, म्हणजे २ शिफ्ट्स, २ बॅच, सारखा अभ्यासक्रम, दिवसा जो काही रिकामा वेळ मिळायचा त्यात नोट्स काढणे, शिकवलेलं समजेल इतपत आधी स्वतःअभ्यास करणे असा माझा दिनक्रम होता. मी काहीतरी शिकवतेय अशी कल्पना मी कधीतरी केली होती. एखादा भाषा विषय शिकवतेय, एखादी छान कविता, धडा अशी कल्पना १०० वेळा केली असेल.पण..गणितासारखा विषय शिकवेल अशी नाही.हळूहळू सगळं अंगवळणी पडलं. त्यांच्यातलीच एक वाटत असल्याने असेल कदाचित पण विद्यार्थी-विद्यार्थिनी सगळेच खूप फ्रेंडली वागायचे. त्यांच्या शंका विचारायचे. मला कुणी कधीही वर्गात त्रास दिल्याचं मला आठवत नाही. शाळेत असताना वक्तृत्व स्पर्धांची सवय असल्याने विद्यार्थ्यांसमोर उभं राहून बोलताना फजिती वगैरे झाली नाही.पण एवढंच पुरेसं नसतं. आपण शिकवलेला एखादा मुद्दा समोरच्याला समजलाय एवढी एकच गोष्ट शिक्षकांना समाधान देते.क्लास टेस्ट्स मधून जे काही निकाल यायचे त्यातून संचालिकाही समाधानी होत्या. माझ्या नकळत अनेकदा त्या वर्गात काय चाललंय, सगळं रुळावर आहे का हे बघायच्या.माझ्या सर्व शिक्षकांना मनोमन नमस्कार केला होता मी तेव्हा.
जवळपास चार महिने मी हे काम करत राहिले. त्राग्याने नाही, तर मन लावून केलं, एन्जॉय केलं.निराश होणं, भीती वाटणं हा काही गुन्हा नाहीये. तसं वाटणं हे ओक्के आहे. आपण माणसं आहोत तर या सगळ्या भावना आल्याच. फक्त सतत त्यातच अडकून राहण्यापेक्षा आपण त्यावर मात करू शकतो.वाचून कदाचित हसू येईल पण मला जे काही वाटतं ते सांगायला कुणी नसेल तर मी देवालाच ती गोष्ट सांगते. आमच्या सोसायटीत प्रवेश करताच दिसतं ते गणपतीबाप्पाचं मंदिर.त्यामुळे इथून बाहेर पडताना मंदिरासमोर थबकणं हे सहज घडतं.मी कित्येक वेळा वरदविनायकाकडे - जे होतंय त्याला सामोरं जाण्यासाठी शक्ती दे असं म्हणायचे, आजही म्हणते. तुमच्या आस्था, श्रद्धा तुमची जीवनशक्ती वाढवतात हे अगदी खरं. एखादी प्रार्थना, प्रेयर, कलमा तुम्हाला आनंद देत असेल तर रोजच्या दिनक्रमात त्याचा समावेश असू द्यावा. अर्थात सर्वांनी आस्तिकतेकडे वळायला हवं हे मला सांगायचं नाहीये. आस्तिक/ नास्तिक असणं ही प्रत्येकाची वैयक्तिक निवड आहे आणि त्याचा आदर आहे. पण आकाश, धरती,सूर्यप्रकाश, पाणी, झाडं, एकंदरीत निसर्ग हा डोळ्यांनी दिसतो आणि त्याची पूजा केली नाही तरी माणूस त्याच्या भव्यतेपुढे नतमस्तक होतो. सूर्यासमोर सकाळी डोळे बंद करून उभे राहिलो तर डोळ्यासमोर अनेक रंग दिसतात हे निरीक्षण केलंय? सुरुवातीला सोनेरी, मग गडद पिवळा, गुलाबी, केशरी, आणि डोळे अजून गच्च मिटले तर गडद लाल असा त्यांचा क्रम असतो. नंतर डोळे उघडाल तेव्हा एवढी एक लहान कृतीसुद्धा तुम्हाला दिवसाची सुरुवात चांगली करून देते याची अनुभूती घ्याल. बाकी योग,संगीत, छंद, व्यक्त होणं याचं महत्व आपण जाणतोच.
पहिल्या पगाराचा सहा हजारांचा चेक आईकडे दिला होता तेव्हा ती मला म्हणाली होती, एवढ्यात निराश का होतेस ? नाही केली ही नोकरी तरी चालेल. तेव्हा मला हे करण्यामुळे किती सकारात्मक वाटतंय हे मी तिला सांगितलं,तिलाही बदल जाणवला असावा. नंतर पगार वाढवला गेला.चार महिन्यांनंतर जेव्हा मी क्लास सोडला तेव्हा अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या ५०-६० च्या घरांत होती. शेवटच्या दिवशी संचालिका मॅडमनी एका वाक्याने मला निरोप दिला- "कदाचित तुला गरज पडणार नाही पण तरी ही जागा तुझ्यासाठी लाईफटाइम खुली (open) राहील. कधीही यावंसं वाटलं तर तुझं स्वागत आहे." . माझ्या नंतरच्या प्रवासातही या वाक्याने मला खूप खूप बळ दिलंय. त्यासाठी मी त्यांची कायम ऋणी राहीन. आपण अगदीच नालायक नाही, तर- ठरवलं तर संधीचं सोनं करू शकतो हा विश्वास मला या अनुभवाने दिला. मी खूप काही शिकले, आधीपेक्षा जास्त मजबूत बनले. नंतर मला अपेक्षित असलेली माझ्या क्षेत्रातली नोकरी मिळाली.
मी आयुष्यात खूप मोठा टप्पा गाठलाय असं नाही, मीही सामान्य, अतिसामान्य आहे. हा अनुभव सांगितला तो खासकरून माझ्या तरुण मित्र-मैत्रिणींसाठी.. ज्यांच्यापैकी काहींनी बऱ्याच ठिकाणी कामाचे प्रयत्न केले होते आणि त्यानंतर आता सुरु असलेली सगळी अनिश्चितता त्यांना चिंतेत टाकतेय. मित्रांनो, आत्ता आणि कधीही एक गोष्ट लक्षात ठेवा की स्वाभिमानाने आणि प्रामाणिकपणाने स्वीकारलेलं कोणतंही काम करताना लाज वाटू देऊ नये. आपल्यातली बरीच कौशल्य आपण कधीकधी आजमावून पाहिलेलीच नसतात. कठीण काळी, त्यांचा वापर होऊ शकतो. अपयशाच्या अंधारातून जरा दूर पहाल तर कदाचित आधी न पाहिलेल्या संधी दिसतील. परिस्थितीवश का होईना, तात्पुरत्या स्वरूपासाठी का होईना पण असं एखादं वेगळं काम केल्याने तुम्हाला सकारात्मक वाटणार असेल तर नक्की करा. काही गोष्टींपासून काही काळाकरता दूर जायचं असेल तर जा, पण आयुष्यापासून नाही. आणि हो, सर्वात महत्वाचं- यश मिळाल्यावर आपल्या कठीण काळात आपल्या पाठीशी उभ्या असलेल्या व्यक्तींना विसरू नका. शक्य असेल तर तुम्हीही त्यांच्यासारखंच व्हा ..जेणेकरून या जगात वाईटाबरोबरच चांगल्या प्रवृत्तीची माणसंही आहेत ही भावना एखाद्या हरू पाहणाऱ्या व्यक्तीला जगवेल, अगदी तसंच.. जसं तुम्हालाही जगवलं होतं कधीतरी...
ज्या सुंदर गाण्याने लिहायला सुरुवात केली होती त्याचा शेवटही खेबुडकर सरांनी खूप सुंदर केलाय. ओळी आहेत -
"सूक थोडं, दुक्क भारी, दुनिया ही भली-बुरी
घाव बसंल घावावरी, सोसायाला, झुंजायाला, अंगि बळं येउ दे !"
दिसणाऱ्या, न दिसणाऱ्या, बारीक डोळ्यांनी पण वाकड्या नजरेने पाहणाऱ्या अनेक छुप्या गोष्टींशी आपली लढाई चालू ठेवायची आहे. तेव्हा - Be Kind & Stay Strong.
(हे गाणं सर्वानी आधी ऐकलं असेलच, नसेल ऐकलं, ऐकून खूप दिवस झाले असतील यापैकी काहीही असेल तरी पुन्हा एकदा जरूर ऐका,बघा.)
- अमिता.
Note - लेनं - लेणं - दागिना
चनं- चणे
आबरु- अब्रू, इज्जत
सूक- सुख, दुक्क- दुःख
