अवचित येते सर पावसाची
धरणी हरखून जाई
खरपूस त्या मृदगंधाने
मन धुंद धुंद होई
हवाहवासा सुखद गारवा
हृदयात खोलवर जाई
अनोखे विश्व समोर दिसे
मी न माझी राही
कुठे जाई ती उन्हाची काहिली
क्षणात सारी किमया घडते
'आज मस्त भजी करू'
वाक्य कुठूनसे कानी पडते
बघता बघता आकाशी
इंद्रधनुष्य हे सजते
त्या सप्तरंगांत जणू
मी चिंब चिंब भिजते
मन तृप्त तर होत नाही
तृप्तीची आस मात्र फुलते
आठवणींच्या संथ झुल्यावर
मन पुन्हा पुन्हा हे झुलते
मग माझ्या नकळत मी पुटपुटते -
"नको रे लवकर जाऊस.."
साठवते ओंजळीत अन हृदयातही
हा - 'पहिला पाऊस'...
-अमिता
