परिवहन महामंडळाची लाल-पिवळी एस.टी पाहिली ना, की बालपणीची आठवण होते. तेव्हा ही एस.टी मला देवदूतासारखी वाटायची. तिच्यासाठी मनात एक खास जागा, आकर्षण अन कौतुक होतं. कारण शहरापासून कित्येक किमी. दूर असलेल्या माझ्या आजोळी, माझ्या गावी, छोट्या खेड्यापर्यंत मला नेणारी ती एकमेव गोष्ट होती.सुट्टी संपवून आम्ही शहरात येताना बसस्टॉपवर आम्हाला निरोप द्यायला बरीच जण यायची. माझी आणि शेजारी- पाजारी राहणारीही एखादी आजी 'लेकरू पुढच्या वर्षीच येईल आता..' म्हणून तोंडावरून हात फिरवायची.त्या सगळ्यांना बघून मनात कालवाकालव व्हायची.काहीतरी व्हावं आणि बस उशिरा यावी किंवा येऊच नये, आई- बाबांनी आपल्यासोबत कायम इथेच स्थायिक व्हावं, किंवा आपल्याला पंख असते तर दर रविवारी उडत उडत इथे येता आलं असतं.. असे अनेक विचार त्या निरागस मनात गर्दी करायचे. गाडी हलल्यावर आपल्याकडे बघत हात हलवणाऱ्या आकृत्या नजरेआड होताना रडू कोसळायचं.गाडी पुढे पुढे जाताना मागे सरकणाऱ्या प्रत्येक झाडाला, शेताला अन घराला प्रेमाने बघत बाय बाय करणं आणि डोळ्यांचं झरणं कितीतरी वेळ चालू राहायचं.घरी परतल्यावर आम्ही भावंडं लगेच कॅलेंडर काढून गावी जाण्यासाठी पुढची मोठी सुट्टी कधी आहे हे पाहत असू हेही आठवतंय. या गोष्टींचं कारण काय? तर- अटॅचमेंट..घरातली कर्ती स्त्री एक दिवसासाठीही घराबाहेर जाताना घरातील इतरांना किती सूचना देते हे पाहिलंय? झाडांना पाणी घालण्यापासून ते कुठल्या डब्यात काय ठेवलंय इथपर्यंत..तुलनेत पुरुष सहसा असं करताना दिसत नाहीत. हे असं का? याचंही कारण - अटॅचमेंट. तिचं मन जास्त गुंतलेलं असतं घरात, झाडांत अगदी तिच्या भांड्याकुंड्यांमध्येही!
'गुंतणं' हा मानवी मनाचा स्थायी भाव आहे.घरात आणि बाहेरही ,आपल्या भोवतीच्या माणसांत, आपल्या कामात,निसर्गात,परिसरातअन कुठेकुठे गुंतत राहतं मन. मग ही अटॅचमेंट तीव्र स्वरूपाची असेल आणि अचानक या गोष्टींपासून दूर जावं लागलं तर तो बदल मन सहजासहजी स्वीकारत नाही. हे वेगळं होणं (detachment) तात्पुरतं असेल किंवा कायमस्वरूपीचं, कारणंही वेगवेगळी असतील. पण बदल हे अपरिहार्य असतात आणि बरेचदा आवश्यकही. मोठ्या लेखकांनी 'आठवण ही एक वेदना आहे' असं लिहून ठेवलंय. पण detachment होऊनही मन पुन्हा गुंतणं सोडत नाही..हेही तितकंच खरं आहे.सुट्टी संपल्यावर शाळेत जायला कुरकुरणारे आपण पुन्हा गुंतलो होतोच ना- नव्या गणवेशात, नवीन पुस्तकं, वह्या पहिल्यांदा हातात पडल्यावर घेतलेल्या सुगंधात, मित्र-मैत्रिणींमध्ये, शाळेत आणि आपल्या छोट्या विश्वात! आयुष्यात पहिल्यांदा आपल्या माणसांना सोडून घरापासून दूर हॉस्टेलला जाताना अडखळणारी माझी पावलं - शिक्षण संपून पुन्हा आपल्याच घरी परतताना पुन्हा एकदा थबकली होतीच..काहीतरी मागे राहतंय आणि आपण हे miss करणार..ही भावना होतीच. एका ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतरित होणाऱ्या बऱ्याच जणांना असा अनुभव असेल. वडिलांच्या नोकरीमुळे १६ वर्षांच्या वास्तव्यानंतर अहमदनगरहुन पुण्यात स्थलांतरित होणं हा बदल माझ्यासहित माझ्या कुटूंबाला लगेच मानवला नाही. पण नवीन ठिकाणी पुन्हा नवीन माणसं जोडली जातात आणि हळूहळू बदल स्वीकारला जातो.
आता जेव्हा जेव्हा प्रवासात अहमदनगरहून जाण्याचा योग्य येतो तेव्हा तेव्हा तिथल्या सगळ्या आठवणी पुन्हा जाग्या होतात . तिथे पुन्हा जाण्याचं निमित्त आता माझ्याकडे नसलं तरी त्या शहरानं मला भरभरून दिलंय. त्यामुळे तिथून जाताना ती कृतज्ञता, ती आपुलकी (मी मूळची नगरकर नसले तरीही ) आपसूकच वाटते. मनात "Miss u .." ही भावना असतानाही चेहऱ्यावर स्मितहास्य अर्थात smile उमटतं. 'Miss u' हे त्या गोष्टींविषयीची कृतज्ञता आणि त्या गोष्टी आपल्या आठवणीत आहेत हे दर्शवतं तर 'smile' हे आपण बदलाला दिलेली स्वीकृती दर्शवतं.बदल न स्वीकारता भूतकाळात जगणं योग्य नाहीच पण म्हणून तुमच्या मनात असलेली त्या गोष्टींची आठवण दडवून ठेवणंही योग्य नाही. कारण भावना माणसाला संवेदनशील बनवतात आणि माणुसकीकडे घेऊन जातात. त्यामुळे असं वाटण्यात गैर काही नाही.थोडक्यात- आयुष्याच्या पुस्तकात एक-एक नवीन पान लिहीत राहायचं तर आहेच पण म्हणून मागची पानं चाळायला आणि त्यात सुंदर आठवणींची मोरपिसं जपून ठेवायला मनाई थोडीच आहे?एखाद्या कठीण प्रसंगी ही मागची पानं तुम्हाला बळ देतील आणि ही मोरपिसं सुखावून जातील.
आपल्या सहवासात येणाऱ्या आणि कालांतराने आपण ज्यांना मिस करतो अशा गोष्टी, जागा, व्यक्ती या सर्वांनी आपल्या अन त्यांच्याही नकळत आपल्याला खूप काही दिलेलं असतं. तुम्हीही कधी अशा बदलांमधून गेला असाल (राहण्याच्या, कामाच्या ठिकाणातला बदल किंवा वैयक्तिक पातळीवर कुठलाही बदल ) आणि हा 'Miss u' फॅक्टर तुमच्याकडे असेल तर नाराज होऊ नका. उलट हा 'Miss u' फॅक्टर जेवढा जास्त असेल तेवढं तुम्ही आजवर मिळवलंय.आणि तुमच्याबद्दलही इतरांना असं वाटत असेल तर विश्वास ठेवा..तुम्ही खूप कमावलंय! त्या क्षणांचं हे देणं तुम्हाला लाभलंय, ज्यांनी तुमची ओंजळ भरलीय, ज्यांनी तुम्हाला आधीपेक्षा जास्त समृद्ध केलंय. आणि सध्याही तुम्ही बदलातून जात असाल तर भविष्यात ही समृद्धी अजून वाढणार आहे. कारण परिस्थिती, आव्हानं सोपी असतील किंवा अवघड; आपण आज भरभरून जगलेला प्रत्येक क्षण उद्या या 'मिस यु' फॅक्टरवाल्या क्षणांमध्ये जमा होणार आहे.
खूप थोडे क्षण जे कधीही आठवणींत जमा होऊ नयेत असं वाटतं ते आपण पुन्हा पुन्हा जगत राहतो. पण त्यावर मर्यादा आहे.एका बाबतीत आपण खूप भाग्यवान आहोत कि आपण तंत्रज्ञानाच्या युगात वावरतो. क्षणांना थांबवू शकत नसलो तरी किमान काही क्षणांना,आठवणींना थोड्या वेळासाठी का होईना आपण पुनरुज्जीवित करू शकतो. यालाच 'मेमरी रिक्रिएशन' म्हणता येईल. आज हे सहज शक्य आहे. कारण- म्हटलं तर आपण एकमेकांपासून दूर आहोत आणि म्हटलं तर अगदी हाकेच्या अंतरावर..परवा माझ्या कॉलेजमध्ये आम्हा माजी विद्यार्थ्यांचा मेळावा(get together) पार पडला. तिथेही जाणवलं- प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात व्यस्त आहे पण पुन्हा सर्वांना भेटून छान वाटलं. तिथे मला भेटलेले सर्वजण काय करत होते ? - 'मेमरी रिक्रिएशन'! आठवणींनाही सेलिब्रेट करता येतं, त्यांचाही सोहळा होऊ शकतो, हो ना ?
बदल सहजासहजी स्वीकारायला तयार नसणाऱ्या माझ्या मनाने स्वतःच्याच प्रश्नांना दिलेली ही उत्तरं मी तुमच्यासोबत शेअर करतेय. या गोष्टींकडे अशा दृष्टिकोनातून पाहिलं तर आठवणी या वेदना राहणार नाहीत , त्यांची अत्तरकुपी होईल. मनाच्या कपाटात साठवलेली अत्तरकुपी. जेव्हाही उघडावी- मनभर आठवणींचा सुगंध दरवळावा, तुमच्या चेहऱ्यावर दिसावा, तुम्हाला आणि तुमच्या सहवासात येणाऱ्या सर्वांना आनंदी करून जावा. चांगल्या, सकारात्मक आठवणींची ही अत्तरकुपी आपल्या संग्रही असायलाच हवी .किंबहुना ती आहेच फक्त तिची जाणीव मनाला एकदा व्हावी.
नवीन वर्षात अर्थात २०१७ मध्ये पुन्हा भेटू आणि भेटत राहूच आपण. तेव्हा नवीन वर्षात पदार्पण करण्यापूर्वी एकदा आठवून पहाच आणि अशा सगळ्या क्षणांना एकदा मनापासून म्हणाच- "Miss u...(With Smile...) !!!"
Happy New Year to all....!