टप टप टप...इतका वेळ तिच्या डोळ्यांत साठलेले अश्रू शेवटी ओघळलेच. ती..म्हटलं तर माझी कुणीच नाही..म्हटलं तर माझी सहप्रवासी..एकाच पीएमटीत प्रवास करत होतो आम्ही. संध्याकाळी ऑफिस, उद्योग-धंदा, काम, संपवून घरी जायची ओढ प्रत्येकाला असते. बसायला जागा आहे, नाही आहे याचाही विचार होत नाही या ओढीमुळे. मीही उभीच (standing) होते एका खांबाला धरून. अन ती दूर पण माझ्या अगदी नजरेसमोर बसच्या पुढच्या भागात, ड्रायव्हरच्या सीटजवळ असलेल्या जागेत बसली होती.
तरुण..विवाहित असावी. आजूबाजूची माणसं आपापल्या तंद्रीत. दिवसभरचा शीणभाग, थकलेले चेहरे. कुणाला वेळ आहे इकडे तिकडे बघायला ?इतक्या गर्दीत अश्रू ढाळत असली तरी हातातल्या रुमालाशिवाय कुणाच्या लक्षातही येत नव्हती ती. आधी खूप विचारात होती..चिंतेत. मग डोळ्याच्या कडा ओलावल्या आणि एका क्षणी बांध फुटला. बसच्या आवाजात, रस्त्यावरच्या कोलाहलात आवाज ऐकू येत नव्हता. वाटलं..कसलं टेन्शन आहे ? नवरा, घरातलं कुणी, बाहेर कुणी काही बोललं असेल का ? जवळ जाऊन पाणी द्यावं का ? पण नको...कधीकधी ना..रडणाऱ्या माणसाची समजूत कशी घालावी कळत नाही..त्यातही आपण एकदम त्रयस्थ..त्याच्याशी काहीही संबंध नसलेले असलो तर अजूनच. त्या वेळी रडणाऱ्या व्यक्तीला अपेक्षा असते कुणा आपल्या माणसाने सांत्वन करण्याची..ऐकून घेण्याची. त्या अश्रूंचं मोल तिच्या आपल्या माणसालाच असावं. आपल्याला कितीही वाटलं तरी तिच्या वेदनेवर फुंकर घालणारी तिला अपेक्षित असणारी कुणी व्यक्तीच तिथे हवी असते. माझ्या नकळत मी रडणाऱ्या तिला पाहत राहिले...का कुणास ठाऊक तिला रडू द्यावं , रडून मोकळं होऊ द्यावं असं वाटलं.
आजूबाजूला काय घडतंय, कोण काय करतंय याची पर्वा न करता मनात आलं की रडता येणं हेही सर्वांना प्रत्येक वेळी जमेलच असं नाही. अशा वेळी आपल्यालाही आपली एखादी दुखरी बाजू आठवते..कसलं शल्य आठवतं..टोचणारी, लागलेली एखादी गोष्ट आठवते. एखादं अपयश, एखादा पचवलेला नकार, आपली भावना चांगली असली तरी जगाने आपल्याला चुकीच्या पद्धतीने जोखलं..जज केलं आणि आपण काही करू शकलो नाही..एक ना दोन अनेक. कुणाच्या अश्रूंमध्ये आपण आपले न वाहिलेले अश्रू अनुभवून घेतो मग. हे असं काही मला वाटलं त्यानंतर वपुंचा एक विचार वाचायला मिळाला -" प्रत्येक वेळेला रडणाऱ्याचं सांत्वन करता येतंच असं नाही. त्याची जाणीव रडणाऱ्याला नसते. केव्हाही आपले डोळे कोरडे करायला आपली आवडती व्यक्ती जवळ यावी असं तिला वाटतं. पण काही वेळेला रडण्यापेक्षा सांत्वन करणाऱ्या माणसावरच जास्त ताण पडलेला असतो ." केवढं तंतोतंत ! लेखक म्हणून वपु आवडण्याचं हे एक कारण. असो.
दोघीही बसमधून उतरलो एकाच थांब्यावर..बाहेर अंधार झाला होता..मी मूक सोबती होते फक्त.तिच्या डोळ्यातलं पाणी अजूनही चमकत होतं. तिनं डोळे पुसले. बरं वाटलं.. स्वतः डोळे पुसून उभं राहणं हेच महत्वाचं आहे. आम्ही आपापल्या वाटांकडे वळलो. आपल्या माणसानं जपलेला आपला अश्रू भविष्यात आपल्याला मोती भासू शकतो. देव करो ..तिच्या आपल्या माणसानं तिला समजून घ्यावं. आणि उद्याच्या दिवसात हसण्यासाठी तिला एकतरी सुंदर कारण मिळावं.
-©अमिता
#PMTDiaries...

