Wednesday, 16 December 2020



आले अवेळी भरून 
निळ्या आभाळाचे डोळे 
घट्ट पकडते माती 
लेकरांची पाळेमुळे

काळजाच्या कपारीत 
पाणी मायेचे वाहते 
ऋतू येतात जातात 
ओल उरात राहते 

काळ आला मोठा बाका 
रस्ता क्षणात वळतो 
आला पोटामधी गोळा 
तो का कुणाला कळतो ?

कुणी असती कनवाळू 
कुणी स्वतःमध्ये दंग
सरडा लाजून मरेल
असा बदलू नये रंग 

स्वार्थाचा आड खोल 
परि सदा तो कोरडा 
कसा भरेल त्याच्या काठी 
तुझा न माझा घडा 

प्रेम घागर इवलीशी 
लई मोठी तिची ख्याती 
काठोकाठ भरंल पुन्हा 
जशी करावी ती रिती

चोरपावलांनी जातो कुठं 
उठून पाहे माय रखमा
बाप जगाचा विठूराया
पुसे लेकरांच्या जखमा…
                             -©अमिता  
Note:
कपार- खडकांची रचना/गुहा 
बाका - अवघड 
कनवाळू - मायाळू 
आड - खोल विहीर