Monday, 17 July 2017
Sunday, 9 July 2017
दृष्ट...
सुनी-सुनी पंढरी, सुने चंद्रभागातीर
वाळवंटी बाकी अजून - गुलाल-अबीर
रखुमाई म्हणे चंद्रभागे,
काही केल्या करमेना
काय बरं करत असेल
राऊळी द्वारकेचा राणा ?
दबक्या आवाजात तिने
टाकले गाभारी पाऊल
टाळ वाजवत होता कुणी
त्याला नव्हती चाहूल
गळ्यात तुळशीची माळ
मस्तकी चंदनाचा टिळा
आत्मानंदी दंग होता
एक वारकरी सावळा...
कोण बरं तू ?
इथं चुकून का राहिला ..?
विचारताना तिनं - कंठीचा कौस्तुभमणी पहिला
तिन्ही लोकांत कौतुक असं ज्याचं रूप
त्या सावळ्या चैतन्याला
भक्तांचं एवढं अप्रूप..?
तिनं विचारलं-
वैष्णवांचा मेळा परतला
आम्हा खेद वाटे भारी
प्रसन्न कशी मग, सांगा बरं स्वारी..?
तो उत्तरला -
" अगं , युगा-युगांचे हे नाते,
सदोदित आम्ही संग
मन लावून ऐक,..
घडोघडी ऐकू येती, माझ्या तुकोबाचे अभंग..
सोहळा संपला तरी, ना संपते वारी
भक्ती-प्रेमाचा प्रसाद, जगी वाटतो वारकरी
चिरंतन प्रेमसागर कधी का आटतो ?
नित्य नव्या रूपात मी लेकरांना भेटतो
वरुणाला सांगून आता..
आभाळी बुक्का पसरतो,
भेट घेतो लाडक्यांची
मगच ओसरतो...! "
रखुमाईची मायाही
आता कणभर वाढली
गहिवरल्या डोळ्यांनी तिनं
दृष्ट विठोबाची काढली...!
##विठूमाऊली,गुरुमाऊली,सर्व वारकरी,आणि माझ्या आई-वडिलांच्या चरणी समर्पित...
-अमिता
Subscribe to:
Posts (Atom)


