Saturday, 22 February 2020

नूतन...

                               


                                     इन आँखों ने काजल से,
                                     इन होठों ने बादल से कहा था 
                                     ये मुस्कान हमेशा जिंदा रहेगी..
                                     क्योंकि..
                             फूल..कभी वक्त की कमी का अफसोस नहीं करते...!
      लहानपणी दूरदर्शन (DD नॅशनल) च्या फिल्मोत्सवमध्ये 'सौदागर' हा चित्रपट पहिला होता.  कथेतल्या भाव-भावनांची गुंतागुंत पुरेपूर समजण्याचं ते वय नव्हतं. पण अगदी आपल्या घरात आपल्या आईचा वावर असतो तसाच सहज वावर पडद्यावर असणारा हा चेहरा कोण ? हा प्रश्न तेव्हा पडला होता. नंतर कधीतरी  'सावन का महिना, पवन करे सोर ' या गोड गाण्यातून ती पुन्हा दिसली..बोलके डोळे,गव्हाळ रंग,लांब केसांची निसटती वेणी, "अरे बाबा शोर नहीं..सोर, सोर! " असं सुनील दत्तनी म्हणताच जीभ बाहेर काढून अचूक गाणं गाणारी ती..या चेहऱ्याचं नाव नंतर कळलं - "नूतन !" आणि पाहता पाहता हा चेहरा, ते भाव ओळखीचे होत गेले आणि मग आवडते झाले.
         सौदागर मधल्या 'तेरा मेरा साथ रहे' या गाण्यात आणि एकूणच या चित्रपटात नायकाची (अमिताभ बच्चन) एक समर्पित पत्नी इतकी सुंदर साकारलीय नूतनजींनी. रवींद्र जैन यांचं मधुर संगीत, आनंद बक्षींचे बोल आणि लतादीदींच्या स्वरांना तिची देहबोली, भाव (expressions) यांनी यथार्थ न्याय देऊन गाणं खूप जिवंत आणि सुंदर केलंय. lips sync इतकं परफेक्ट की बघणाऱ्याला स्वतः नूतन गात असल्याचा भास होतो. त्या काळातले बहुतेक कलाकार या गोष्टीकडे लक्ष देत असत. दिग्दर्शक व कवी - कुमारसेन समर्थ आणि आई - अभिनेत्री शोभना समर्थ या मराठी दाम्पत्याची कन्या असलेल्या नूतनला एका चित्रपटातून आईने या क्षेत्रात पदार्पण करायची संधी दिली असली तरी तिला खरी ओळख दिली नंतरच्या काळात म्हणजे १९५५ नंतरच्या अनेक भूमिकांमधून..सीमा, बंदिनी, सुजाता, पेयिंग गेस्ट, मिलन,सरस्वतीचंद्र इत्यादी चित्रपटांनंतर तिनं कधी मागे वळून पाहिलंच नाही. राज कपूर, देव आनंद, धर्मेंद्र या आघाडीच्या कलाकारांबरोबर काम करतानाही तिच्या भूमिका या महत्वाच्या,भाव-भावनांचे खूप पदर दाखवणाऱ्या, सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या, रोमँटिक,विनोदी अशा सर्व प्रकारच्या होत्या. आपल्या सहज सुंदर, नैसर्गिक अभिनयातून हे भाव उलगडून दाखवण्याचं कौशल्य तिच्याकडे होतं. बरोबरीला साधेपणातलं सौंदर्य (beauty in simplicity) ही प्रतिमा तिनं जपली आणि प्रेक्षकांना आणि समीक्षकांनाही ती भावली. काळानुरुप चरित्र भूमिकांकडेही ती वळली. दिलीप कुमार  यांच्यासोबत आलेला 'कर्मा' हा १९८० च्या दशकातला तिचा असाच चित्रपट. 
       अवॉर्ड सोहळ्यांभोवती वादाचं वलय नसतानाच्या दशकांमध्ये फिल्मफेअर चे ६ अवॉर्ड्स नावावर असणारी ही अभिनेत्री प्रत्यक्ष जीवनातही विचारी, काहीशी अंतर्मुख(introvert), साधेपणा जपणारी होती.मी तिचे सर्वच चित्रपट पाहिलेले नाहीत पण प्रत्यक्ष न भेटूनही तिच्या गहिऱ्या डोळ्यांत कधी कारुण्याची वा ममतेची किनार दिसते तर कधी एखादी कहाणी त्यात दडलीय का ? असं वाटून जातं. नेव्हीत लेफ्टनंट कमांडर असलेले तिचे पती 'रजनीश बहल' यांची एक जुनी मुलाखत माझ्या वाचनात आली.(प्रसिद्ध अभिनेता मोहनीश बहल हे नूतन आणि रजनीश बहल यांचे पुत्र) मोठी अभिनेत्री असण्याचा अभिनिवेश न दाखवता आपल्या घरात (सासरी) सर्वांसोबत जुळवून घेण्याच्या तिच्या स्वभावाचं कौतुक त्यांना होतं. तिच्या फिल्मी करिअरला बहल कुटुंबाकडून तेवढाच पाठिंबा होता. ते म्हणतात ,पार्ट्या, फंक्शन इत्यादी ठिकाणी " मी हे शूज इतक्या हजारांत घेतले, इंपोर्टेड आहेत " याच प्रकारच्या गप्पा करणाऱ्या बायकांपेक्षा ती वेगळी होती, तिला genuine माणसं आवडायची. ती तेवढीच विनोदी आणि मुद्द्याचं बोलणारीही होती. 
         अभिनयाबरोबरच मला तिची ही बाजूही आवडली. मोठ्या माणसांचं जमिनीवर (down to earth)असणं हे खरंच खूप सुखद आणि पुढच्या पिढीसाठी प्रेरक असतं. २१ फेब्रुवारी १९९१ या दिवशी वयाच्या ५४ व्या वर्षी तिनं जगाचा निरोप घेतला. आयुष्याच्या शेवटच्या काही वर्षांत तिनं कृष्णाची काही भजनं स्वतः लिहिली आणि गायलीही होती. लेखन, गायन, नृत्य, दिग्दर्शन क्षमता, अध्यात्म या सगळ्या गोष्टींमध्ये नवीन शिकण्याची, करण्याची सवय तिला होती.आपलं काम, आपली माणसं, आणि आपल्या भावना यांच्याशी प्रामाणिकपणे ती जगली असं मला वाटतं. 
         रजनीशजींच्या त्या मुलाखतीतली एक गोष्ट हृदयाला स्पर्शून गेली. नूतन जग सोडून गेल्यानंतरच्या वर्षात रजनीशजींच्या आई (ज्यांचं वय त्यावेळी होतं - ८७ वर्षे), एकदा त्यांना फोन करून म्हणाल्या "मुझे नूतन बहुत याद आ रही है..तभी मैं तुझे फोन कर रही हूँ ". सतत आपल्याजवळ न राहिलेल्या, आपल्या प्रथितयश अभिनेत्री असलेल्या दिवंगत सुनेच्या आठवणीने आपल्या मुलाशी बोलून मन हलकं करणारी सासू..हे घडण्यासाठी मनांमध्ये भावनेचा ओलावा असावा लागतो..जो त्यांनी अनुभवला असावा. 
                         खुशबू वही..जो बिखरके भी दिलों में जतन हो
                         कौन कहता है पुराने जमाने की ?    
                         तुम आज भी..' नूतन ' हो... 
       नूतनजींचा भावस्पर्शी अभिनय रसिक प्रेक्षकांच्या मनात कायम राहील.त्यांना नमन आणि भावपूर्ण श्रद्धांजली!
# in the remembrance of legendary  actress नूतनजी. (4 June 1936- 21 Feb 1991)
Simple+beautiful+natural expressions= class❤
                                                                               -©अमिता अशोक पाटील.
                                                                    Picture Editing- Ganesh Patil