तिने वावरात लावलेला लसणाचा वाफा आता बराच फुलला होता. परवा माणसं लावून शेतातली तूर काढून घरी पोती आणली ती पाहून सगळ्यांची मनं गलबलली. हे पीक किती मेहनतीने जपलं होतं तिनं. बाजूलाच मागच्या हंगामाची तूरही पडून होती..मी बरी झाले की तूर भरडून डाळ करायचीय..शेवटच्या दिवसांतही तिच्या डोक्यात हा विचार होता.या वर्षी शेतात विहीर खणली..तशी तिची उमेद अजून वाढली होती. आता यंदा पीक व्यवस्थित आलं की छोटं का होईना घर नीट बांधू.. पत्र्याच्या घरात नाही काढायचा पुढचा उन्हाळा..तिने ठरवलेलं. पण उन्हाळ्याआधीच होत्याचं नव्हतं झालं. परिस्थितीशी लढली पण आजाराशी झुंजायला नियतीनं वेळच दिला नाही.
पुरुषाचं जाणं आणि एका बाईचं जाणं त्यातही..तरुण कर्त्या बाईचं जाणं यात खूप फरक असतो. ती जग सोडून जाते तेव्हा कुठे कुठे अस्तित्व ठेवून जाते.. नाही ? कष्टाने फुलवलेलं रान, लहानसं पण पसारा नीट आवरलेलं घर..कपाटात रचून ठेवलेल्या मोजक्या साड्या, अंगणातली तुळस, स्वयंपाकघरातली भांडी..अन अश्रू गोठून गेलेल्या डोळ्यांनी भिरभिर पाहणारे मुलांचे चेहरे...कुठे कुठे शोधायचं..कुठे कुठे आठवायचं? सगळीकडं तिनं आपलं मन गुंतवलेलं असतं. सगळीकडे तिच्या आठवणी आहेत. आणि जो जो इथे बघतो त्याला प्रत्येक गोष्ट अधुरी वाटते. खुद्द तिलाही शेवटच्या क्षणापर्यंत हे वाटत राहिलं- हे राहिलं, ते राहिलं, ते साफ करायचं होतं, हे बनवायचं होतं....हे तिच्या तोंडून ऐकून तिच्या म्हाताऱ्या आईच्या मनात खोल खड्डा पडत होता. बाईनं स्वतःभोवतीचे पाश स्वखुशीने इतके आपलेसे केलेले असतात की नियतीनं ते सोडवले तरी त्याच्या खुणा धूसर व्हायला खूप वेळ जावा लागतो.
तिचा मुलगा यंदा बारावीला , अन लहान मुलगी सातवीत. मी आईच्या दशक्रिया विधीला गेलो नाही तर काही होईल का ? तिच्या मनात काही इच्छा असेल तर ? मी जायला हवं..पण बोर्डाचा पेपर..वर्षभराचा अभ्यास. काय करू ? मुलाच्या मनात द्वंद्व सुरु होतं. तेवढ्यात तिचे शब्द आठवले. "माझा दादा कॉलेजला जायला लागला..सगळ्या मित्रांकडे मोबाईल आहे, घेणं झाला नाही, पण आता घे. छोटी दिदी आणि तू व्यवस्थित रहा, नीट अभ्यास कर आणि शेताकडे पण लक्ष दे." मुलाच्या मनात आईचे शब्द घुमत होते. तसा तो मनाशी काहीतरी ठरवून बोलला - "मी देणार पेपर." नातेवाईक , आप्त-स्वकीय सांत्वन करतात ते महत्वाचं असतंच. पण जेव्हा नॉर्मल रोजचं आयुष्य तिच्याविना सुरु होतं तेव्हा त्या आईने लेकरांच्या डोळ्यात पेरलेली स्वप्नंच कदाचित त्यांना पुन्हा नव्याने उभी करत असतात. सुरुवातीला छळणाऱ्या आठवणी जपूनच कदाचित जगण्याचं बळ येतं.
आज एक महिना झाला. घर हळूहळू सावरायचा प्रयत्न करत आहे. बहिणाबाई एका कवितेत सांगून गेल्यात ना.. एक सासुरवाशीण जेव्हा आपल्या माहेरच्या आठवणीत भावुक होवून माहेराबद्दल सांगते तेव्हा साधुबुवा विचारतात - तुला इतकी आठवण येतेय माहेरची तर का राहतेस सासरी ? जा ना माहेरी. तेव्हा ही सासुरवाशीण सांगते -
"देरे देरे योग्या ध्यान, ऐक काय मी सांगते
लेकीच्या माहेरासाठी , माय सासरी नांदते "
आज दिदीने तिच्या बाबांना स्वयंपाकात मदत केली. तुम्ही भाजी करत जा, पोळ्या येतात मला, भाकरी पण शिकवलीये मला आईने, जमेल सगळं." ती आत्मविश्वासाने बोलली. भिंतीवर अडकवलेल्या फोटोत आपल्या स्वर्गीय पत्नीच्या आणि घराची जबाबदारी सांभाळू पाहणाऱ्या लेकीच्या डोळ्यांत एकच चमक तिच्या बाबाने अनुभवली. आणि बऱ्याच दिवसांनी त्याला बरं वाटलं.
-©अमिता
#Women'sDay
#internationalwomensday
8th March 2025
PC - google.
Note - वावर - शेत