दिवाळी संपली..तुळशीविवाह आटोपले..आता सुरु झालेत लग्नसोहळ्यांचे दिवस.काही घरांमध्ये लग्नाच्या तयारीची लगबग सुरु आहे तर काहीजण वर -वधू संशोधनात मग्न आहेत. आपल्याकडे विवाहसोहळ्यांमध्ये काळानुरूप बदल झाले.पण एक गोष्ट अजूनही तशीच आहे ..ती म्हणजे -हुंडा. आज हे आठवण्याचं कारण म्हणजे आजचा दिवस -२६ नोव्हेंबर हा हुंडाविरोधी दिन (Anti -Dowry Day ) आहे. १९६१ साली आपल्या देशात हा हुंडा घेणे गुन्हा ठरवणारा कायदा अस्तित्वात आला. पण आजही हुंडा न घेणाऱ्या-देणाऱ्या लोकांची संख्या नगण्य आहे. आजही हुंड्यामुळे होणारया हत्या- आत्महत्यांच्या बातम्या आपण ऐकतो. ' तंबाखू खाल्ल्याने कर्करोग होतो ' असं कितीही मोठ्या टाईपमध्ये लिहिलेलं असलं तरी जोपर्यंत खाणारयाच्या मानसिकतेत बदल होत नाही तोपर्यंत त्याचं व्यसन सुटत नाही- तसा हा प्रकार.
महाराष्ट्रासहित देशातल्या अनेक राज्यांमध्ये वर्षानुवर्षे आपण या प्रथेला खतपाणी घालत आलो आहोत. आणि आजकालचे सुशिक्षित, स्वतःला पुढारलेल्या विचारांचे समजणारे लोकही यात मागे नाहीत ही सर्वात लाजिरवाणी गोष्ट. गुरांच्या बाजारात जशी प्रत्येक बैलाची किंमत ठरलेली असते तशीच प्रत्येक नवरदेवाची किंमत(Rates !!) ठरलेली असते. कुणी हजारांत, कुणी लाखांत स्वतःला विकून घेतात, तर कुणी आपली किंमत २५- ३० तोळे सोन्यांत सांगून मोकळे होतात. काहीजणांचा युक्तिवाद असतो कि - "आम्ही मुलाच्या शिक्षणासाठी एवढा खर्च केलाय .." मग ? त्याची भरपाई मुलीच्या वडिलांकडून घेता का ? जणूकाही मुलीचं शिक्षण खर्च न करताच झालंय..आणि ती कमावणारी असेल तर तिचा पगार दर महिन्याला माहेरीच नेउन देणार आहे..!वडिलांची हुंडा देण्याची ऐपत नाही म्हणून कितीतरी मुलींची लग्न मोडतात किंवा त्यांना अपेक्षेप्रमाणे वर मिळत नाही.
लग्न झाले तरी देण्याघेण्याच्या गोष्टींवरून नात्यांमध्ये आलेली कटुता आपण बरेचदा पाहतो. दिवाळीला सासऱ्यानं आपल्याला सोन्याची अंगठी द्यावी, चारचाकी किंवा नवीन व्यवसायासाठी पैसे द्यावेत अशा मागण्यांसाठी रुसून बसणारे, प्रसंगी बायकोला त्यासाठी माहेरी पाठवणारे 'महाभाग' ही आहेत. वास्तविक पाहता, लग्न म्हणजे फक्त वर-वधूचं नव्हे तर दोन घराचं मिलन. या एका नात्यामुळे कितीतरी नाती तयार होतात; पण ही नाती हुंड्यातून येणाऱ्या पैशांच्या स्वार्थावर आधारलेली असतील तर ती बहरतील कशी ? एक मुलगी सून होताना आपले आई-बाबा, घर, मायेची माणसं हे सारं सोडून येते- कायमची-आयुष्यभर पतीला साथ देण्यासाठी. हे कमी आहे का? पैसे मागण्यापेक्षा तिला प्रेम दिलं तर तीही घराला प्रेमच देईल.
कायदा त्याचं काम करत राहील पण या गोष्टी थांबवण्याचं सामर्थ्य आहे- युवाशक्तीत. आपण पाहतो की विवाहेच्छुक तरुण मुलगी पसंत करण्यात रस घेतात पण हुंड्याची बोलणी सुरु झाली की आपल्या घरच्यांकडे धुरा सोपवतात.प्रत्येक तरुण- तरुणीने ठरवलं की "मी हुंडा देणार/घेणार नाही ' तर हे सहज शक्य आहे .हे सर्वांनी ठरवणं गरजेचं आहे कारण आपण दिला नाही तर दुसरा कोणी हुंडा देईल आणि आपली मुलगी बिनलग्नाची राहील याच भीतीतून, इच्छा नसूनही, हवं तर कर्ज काढून हुंडा दिला जातो.ज्या घरी एकापेक्षा जास्त मुली आहेत असे लोक, शेतकरी,मजूर,मध्यमवर्गासाठी 'मुलीचं लग्न' हा चिंतेचा विषय असतो. आई -वडील आपलं कर्तव्य निभावतात पण मुलीच्या लग्नासाठी स्वतःच्या, घराच्या छोट्या-छोट्या गरजांना महत्व न देता, स्वतःच्या इच्छांचा त्याग करतात--हे पाहणं कोणत्या मुलीसाठी सुखदायक असेल ? मुलींच्या मनात त्यामुळे अपराधीपणाची भावना असते.
एकीकडे महाराष्ट्रासारख्या राज्यांत हुंड्याची प्रथा आहे तर दुसरीकडे हरियाणा-सारख्या राज्यांत मुलींची संख्या कमी असल्यामुळे लग्नासाठी त्यांचा 'सौदा' अर्थात व्यापार केला जातो.हुंड्याची प्रथा नष्ट झाली तर मुलींचा जन्म आणि शिक्षण नाकारण्याचं प्रमाणही कमी होईल.तेव्हा शुभमंगल करताना ..हुंडा दिला-घेतला जाणार नाही यासाठीही सावधान राहूया..आणि हुंड्याची अनिष्ट प्रथा नष्ट करण्यात आपल्या परीने प्रयत्न करूया..तुम्हाला काय वाटतं ?