Tuesday, 31 December 2019

मखमल...


वावटळ म्हणू 
की म्हणू..वाऱ्याचे सुरेल गाणे 
फुलांच्या देशात मित्रा
काट्यांचे येणे-जाणे 

दान सुगंधाचे घेताना 
फुले अलगद वेचावी 
पाने धीराची उडता..
घट्ट काट्यांनी टाचावी...

जगणे व्हावे फुलांचे अन,
एकेक 'आठवण' दरवळ व्हावी..
फुलता फुलता काट्यांनाही 
थोडी थोडी मखमल द्यावी...!
#यूँही...

#remembering_2019_Welcome_2020
#Happy New year to u all!
                                             -©अमिता अशोक पाटील 
Picture Credit- Namrata Patil

Note: टाचणे - शिवणे/जोडणे 
दरवळ - सुगंध 
मखमल - रेशमी (कोमल या अर्थाने)/velvet 




Monday, 23 December 2019

हिशोब...

     


       माझ्या लहानपणीची गोष्ट आहे. तेव्हा ATM  चा वापर सुरु झाला नव्हता. माझ्या पप्पांना एकदा बँकेतून काढून आणलेल्या रकमेत ५०० रुपये जास्त आले होते. त्यांनी ते लगेच कॅशिअरला दिले तेव्हा त्यांनी कौतुक आणि आश्चर्य दोन्हीही व्यक्त केलं होतं. अहमदनगरला माळीवाडा परिसरात 'विशाल गणपती मंदिर' आहे. खरेदीसाठी जाणारे बहुतेक लोक हमखास बाप्पाचं दर्शन घेऊनच पुढे जातात.एकदा तिथून दर्शन घेऊन पुढे जाताना काही हजारांचं नोटांचं पुडकं त्यांना दिसलं होतं. एका मारवाडी कुटुंबातल्या स्त्रियांच्या घोळक्यातल्या एकीच्या पाकिटातून ते पैसे पडले होते. गर्दी कमी असल्याने ते त्यांना तात्काळ पोचवता आले. रक्कम मोठी असल्याने ती परत मिळताच त्यांचं थँक्यू आणि देवाचेही परत आभार मानण्यासाठी त्या महिलेने केलेला नमस्कार आजही आमच्या लक्षात आहे. "ही पोरगीही अशीच वेंधळी आहे बाई..! नीट ठेवत जा पाकीट " हा माझ्या आईचा सदाबहार टोमणा ऐकायची  मला (बहुधा माझ्यासारख्या अनेकींना/अनेकांना) सवय आहे ! "अगं पैसे कुठे, किती खर्च होतात हे लिहून ठेवत जा." कॉलेजला आणि पुढे होस्टेलला गेल्यावर पॉकेटमनी देताना पप्पा मला नेहमी सांगायचे. मला मात्र हिशोब ठेवायचा जाम कंटाळा. "तुमच्याकडेच ठेवा ना लिहून..मी सांगते ना खर्च" "तो प्रश्न  नाहीये पण तुझ्याकडची बचत, जमा खर्च हे सगळं बघायची सवय तुला लागेल म्हणून.."  कधीतरी त्यांच्या आग्रहावरून मी अशा नोंदी करायला सुरुवात करायचे पण पैसे संपेपर्यंत त्यात बरेचदा सातत्य काही राहायचं नाही. अर्थात तेव्हा खर्च मोजका अन ठरलेला असायचा. आपण स्वतः कमवू लागल्यावर आणि जबाबदाऱ्या घेतल्यावर या गोष्टींचं महत्व जास्त कळतं. या बाबतीत थोडीफार सुधारणा नंतर होत गेली. हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे एकदा अशाच चुकता चुकता बरोबर झालेल्या हिशोबाचा किस्सा आज सांगतेय.
       मागच्या वर्षीची दिवाळीची सुट्टी संपून ऑफिसला जायचा दिवस उजाडला. बसच्या पासची मुदत संपलेली होती. सुट्टी असल्याने मुदत वाढवून घेतली नव्हती (पास renew  केला नव्हता ). आज ते काम करायला हवं म्हणून मी २००० रुपये काढले. १४०० चा पास आणि माझ्याकडे राहतील ६०० असा हिशोब मनात लावत -'वरं जनहितं ध्येयं' हे ब्रीदवाक्य लिहिलेल्या पुणे मनपा भवनातल्या PMPL च्या पास केंद्रात मी पोचले. "renew करायचाय..आजपासून." म्हणत पास आणि पैसे पहिल्या खिडकीतून लिपिकांकडे (क्लार्क) सुपूर्द केले." "पाटील..घ्या.." आवाज देत त्यांनी माझ्या हातात पास आणि फक्त १०० रुपये दिले. "सर, मी २००० दिले होते तुम्हाला, अजून ५०० ?" हे म्हणत असतानाच आपण काय माती खाल्लीय हे मला कळलं होतं. २००० किंवा १००० च्या नोटा असतील तर २००० रुपये देणं ठीक आहे ..पण १४०० च्या पाससाठी मी ५०० च्या ४ नोटा दिल्या होत्या ..चौथ्या नोटेची काहीएक गरज नसताना ! २००० - १४०० = ६०० हा हिशोब बरोबर असला तरी पैसे देताना कॉमन सेन्स वापरलाच नाही ! "नाही नाही..असं कसं? बरोबर १०० रुपये दिले तुम्हाला, १५०० च दिले होते तुम्ही" क्लार्क त्यांच्या मतावर ठाम होते. "मॅडम, तुम्ही परत एकदा तुमचं पाकीट तपासा. त्यातच असतील तुमचे ५०० रुपये."  हे सांगतानाच  त्यांच्याकडच्या ड्रॉवरमध्ये जमा झालेले पैसे दाखवत आता यातल्या तुमच्या ५०० च्या नोटा कोणत्या हे ओळखण्यात आपण असमर्थ आहोत हेही त्यांनी सुचवलं.. "ठीक आहे, मी एकदा बघते" म्हणून मी मागे आले. माझ्या सोबत, रांगेत उभ्या असलेल्या लोकांची कामं चालू होती. आणि मी मात्र पाकीट तपासत होते. पण ५०० रुपये काही मिळाले नाहीत. २००० - १४०० = ६०० हा सकाळपासून घोकलेला हिशोब माझ्या अंगाशी आला होता तर..मी नक्की ५०० च्या ४ नोटा दिल्या हे मला अगदी स्वच्छ लक्षात आलं होतं. दहावीला गणितात मिळालेले १४८ गुण मार्कलिस्टमधून बाहेर येऊन रागाने माझा कान ओढत - "लाज काढलीस गं..!" असं म्हणत असल्याचा भास मला होऊ लागला. सोडून द्यावेत काय पैसे..उशीरही होतोय ऑफिसला..१०-२० नाही..५०० आहेत कष्टाचे..आणि हो..आई आणि माझ्या आईचा तो सदाबहार टोमणा खराच आहे हे दाखवून देण्याची एकही संधी न सोडणारी  माझी भावंडंही मला दिसू लागली. हे त्यांना कळणं म्हणजे पुरावा देण्यासारखं होतं..आता तर हा इज्जत का सवाल झाला होता. "पण आता त्या क्लार्कना पटवून कसं द्यायचं ? भांडण झालं तर ? या प्रश्नांनी मला थंडीतही घाम फुटला. मी क्षणभर डोळे मिटून घेतले. 
  माझा हिशोब(technically) बरोबर असला तरी मी तार्किकदृष्ट्या (logically)चुकले होते. आणि मी बरोबरच असेल हे गृहीत धरून घाईत पैसे नीट न मोजण्याची चूक लिपिकांकडूनही झाली होती. जरा शांत झाल्यावर मला संत एकनाथ आठवले. आपले गुरु जनार्दन स्वामींकडे असताना हिशोबात एका 'पै' ची चूक मिळत नव्हती म्हणून रात्रभर जागून हिशोब करत बसलेले नाथ महाराज ! आणि त्यांना ती एका पैची चूक नंतर बरोबर कळली होती. काय सांगावं ? चूक शोधून दुरुस्त केलीच पाहिजे असं या २ खिडक्यांमागे बसलेल्या लिपिकांपैकी एकाला तरी वाटेल. मी प्रयत्न करायला हवा. 
    सकाळची वेळ असल्याने फार मोठी रांग नव्हती .एव्हाना रांग संपली होती. "सर, नाही मिळाले  मला पाकिटात पैसे. मला नक्की आठवतंय मी तुम्हालाच दिल्या ५०० च्या ४ नोटा."असं कसं होईल ? " त्याच अविश्वासाने ते बोलले. "तुला खात्री आहे ?" त्यांच्या शेजारच्या दुसऱ्या क्लार्कनी मला विचारलं" "हो काका " मी म्हणाले. 
"एक काम करू.. सकाळपासून तशाही नोंदी(entries)  कमी आहेत. लावूया सगळा हिशोब. यात असेल तर मिळेल गं तुझी ५०० ची नोट, नसेल तर दुसरीकडे हरवलीय. मान्य ? " "हो चालेल"  दिवसाच्या अखेरीस दिवसभरात झालेल्या व्यवहारांचा हिशोब द्यावा लागतो. तोच हिशोब आतापर्यंतच्या नोंदींसाठी त्या दोघांनी सुरु केला. पुढच्या १०-१५ मिनिटांत आज या काही तासांत एकूण किती पैसे जमा झालेत याचा एक आकडा मिळाला. आता पहिल्या लिपिकांनी पैसे मोजायला सुरुवात केली. आणि..त्या अपेक्षित आकड्यापेक्षा ५०० रुपये जास्त मिळाले. खात्री करण्यासाठी परत एकदा पैसे मोजले गेले."हम्म...आहेत ५०० जास्तीचे. तुझेच आहेत !" ते म्हणाले. " मी इतक्या वर्षांपासून काम करतोय इथे,आणि आम्हाला असा हिशोब रोज द्यावा लागतो..मी का घेईल जास्तीचे  पैसे ?" "काका,तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, पहिली चूक माझीच होती. तुम्ही हिशोब करायची तयारी दाखवलीत त्यातच सगळं आलं. माझी काहीही तक्रार नाही. त्यांनी ५०० ची नोट खिडकीतून माझ्या हातात दिली आणि आम्ही दोघेही खळखळून हसलो. गेल्या १५-२० मिनिटांत निर्माण झालेला ताण आता एकदम निवळला होता. 
    चुकता चुकता सावरलेला हा छोटासा हिशोब मला काही गोष्टी शिकवून गेला .
१) आपण शहाणे आहोत असं आपल्याला अन जगालाही वाटत असलं तरी कधीतरी आपल्याकडूनही अगदी बाळबोध वाटावी अशी  चूकही  (silly mistake) होऊ शकते.
२) चूक झाली आहे हे लक्षात येताच ती दुरुस्त करण्याच्या दृष्टीने टाकलेलं पहिलं पाऊल म्हणजे ती चूक स्वीकारणं ..चूक झाल्याचं कबूल करणं (to admit mistake)
३)शेवटची आणि महत्वाची गोष्ट म्हणजे बरेचदा आपण बोलताना कोणत्या पट्टीत (tone) बोलतो यावर    समोरच्या व्यक्तीची प्रतिक्रिया अवलंबून असते . उगाच चढ्या आवाजात, अरेरावीच्या भाषेत एकमेकांच्या चुका दाखवत आम्ही भांडत बसलो असतो तर प्रश्नाच्या उत्तरापर्यंत उशिरा पोचलो असतो. आणि उत्तर मिळूनही समाधानाच्या ऐवजी चिडचिड, मनस्ताप जास्त झाला असता. वर, माझ्या दिवसाची सुरुवात खूप खराब झाली हे दिवसभर सगळ्या गावाला सांगत बसलो असतो ते वेगळंच.
" पाटील, नंबर घेतलाय तुमचा,  गरज पडलीच तर फोन करू आम्ही तुम्हाला." मी निघताना ते काका उगाच म्हणाले. अपेक्षेप्रमाणे फोन काही आला नाही. 
           तुम्हीही कधी असा एखादा हिशोब चुकून चुकवलाय 😀? किंवा दुरुस्त केलाय ? एखादा चुकलेला/चुकता चुकता राहिलेला  हिशोब तुम्हाला काही शिकवून गेलाय ? आपला पराक्रम सांगायची संधी आपल्याला खूपदा मिळते. पण फजिती सांगायची संधी कमी वेळा आपण वापरतो.नाही का?असा प्रसंग तुमच्याकडे असेल तर जरूर शेअर करू शकता.
    नवीन वर्ष लवकरच सुरु होणार आहे . तेव्हा, येणाऱ्या वर्षात तुमचे सर्व हिशोब अगदी अचूक होवोत या शुभेच्छा...!
#PMT_Diaries
                                                                                       -©अमिता अशोक पाटील.

Monday, 30 September 2019

चेरी ऑन द केक... (cherry on the cake...)

                   
          
     
  "प्रियांक !!?? अगं ताईच्या नावाऐवजी हे कुणाचं नाव आहे केकवर ? कुणाचा केक घेऊन आलीस तू ? " संध्याचा भाऊ 'पंकज' जवळपास किंचाळलाच. हे ऐकून धावत धावत ती टी-पॉयवर ठेवलेला केक बघायला गेली. "अरेच्चा ! ब्लॅक फॉरेस्ट !! मी तर दुसरा, साधा फ्लेवर घेतला होता आणि ताईचं नाव माझ्या डोळ्यादेखत टाकून घेतलं होतं..हा तर दुसऱ्या कुणीतरी ऑर्डर केला होता. आणि आपलं  ठरलं होतं ना..की छोटाच आणायचा केक कारण आपण दोघे -तिघेच आहोत. "अदलाबदल झालेली दिसतेय मग..असो पण फ्लेवर तर ताईच्या आवडीचा मिळालाय." तो हसत म्हणाला.
   आता नेमकी चूक झाली कुठे ? हे ती आठवू लागली .ताईचा वाढदिवस आहे म्हणून आज वेळेत ऑफिसमधून निघाली होती. संध्याकाळी घरीच पावभाजी करायची आणि जाताना पेस्ट्री किंवा केक न्यायचा हा बेत पक्का होता. बर्थडे सेलिब्रेशनचा विचार केला तर माणसं दोन प्रकारची असतात. पहिली- जी केकची किंमत, फ्लेवर याबाबतीत प्रचंड चोखंदळ (particular ) असतात. आणि दुसरी- ज्यांना केकपेक्षा ते उत्सवी वातावरण, शुभेच्छांचा वर्षाव, आठवणींच्या वहीत जोडलं जाणारं अजून एक पान हे जरा जास्त आवडतं.बाकी गोष्टींबद्दल त्यांचा खास आग्रह नसतो. संध्या या दुसऱ्या प्रकारात येणारी. म्हणून तर लहानपणी केकशिवाय साजरे केलेले वाढदिवसही तिच्यासाठी तेवढेच खास आहेत.आजही केकशॉप मध्ये पोचल्यावर तिची नजर सर्वात आधी एका रांगेत मांडून ठेवलेल्या सुंदर smiling candles (मेणबत्त्यांकडे) गेली. "या ब्लॅक फॉरेस्ट ची किंमत ? "तिच्या शेजारी उभ्या असलेल्या एका स्त्रीनं विक्रेत्या मुलाला (सेल्सबॉय) विचारलं. "फक्त ३१० रुपये ! तो उत्तरला. ओके..बहुधा तिने तो नक्की (फायनल) केला. ३-४ पेस्ट्रीजपेक्षा छोटासा केकच घेऊया असं ठरवून संध्या म्हणाली   - "हा कोणता फ्लेवर ?"  "पिस्ता..फक्त २१० रुपये." खरं तर ब्लॅक फॉरेस्ट जास्त आवडेल तिला असं वाटून तिनं विचारलं - "ब्लॅक फॉरेस्ट एकच राहिलाय का ? " "हो मॅडम ..हा शेवटचा होता..आणि आता उशीरही झालाय सो..!" तो उत्तरला. "ठीक आहे,  हा छोटाच - (पिस्ता )पॅक करा." तिनं सांगितलं. "आणि बर्थडे बॉम्ब ? " छोटासा फटाका पुढे करत त्याने विचारलं. "हो हो ..द्या तोही" म्हणत तिनं पैसे देण्यासाठी कार्ड पुढे सरकवलं. एक- दोन मिनिट प्रयत्न केल्यावर तो मुलगा म्हणाला - "मशीनचा  काहीतरी प्रॉब्लेम आहे , कार्ड स्वॅप होत नाहीये. शेजारीच ATM आहे. कॅश आणाल ?" "ठीक आहे " म्हणाली खरी पण मनात -' एक दिवस घरी लवकर जावं म्हटलं तर त्यातही घोडं अडतंच..'काहीशी वैतागूनच ती ATM कडे गेली.पैसे काढून बिल दिलं. एव्हाना तिच्यासोबत उभी असलेली ती स्त्री आणि इतर ग्राहकही निघून गेले होते. काउंटरवर ठेवलेली एकमेव बॅग ज्यात तिचा केक  पॅक केला होता ती घेऊन थँक्यू म्हणून ती झपाझप पावलं टाकत घराकडे निघाली. 
       "ओह..म्हणजे इथे चूक  झाली तर ! मी पैसे काढून आणेपर्यंत एकतर त्या मुलाने चुकीची बॅग त्या स्त्रीला दिली किंवा तिने गडबडीत स्वतःच चुकीची बॅग नेली.. त्यानंतर ट्राफिक, अचानक रस्त्यात भेटलेली कॉलेजची मैत्रीण यात घरी पोचायला अजून काही मिनिटं गेली.सर्वजण घरी येता येता उशीरच झाला." दहाकडे जाणाऱ्या घड्याळाच्या काट्याकडे तिची नजर गेली. "तरीच..केक फ्रीजमध्ये ठेवताना ती मेणबत्ती बघून वाटलं होतं की ही तर मी घेतली नव्हती..मला वाटलं complementary असेल! " सगळा गुंता पंकजला सांगत ती म्हणाली." हम्म..हे सरप्राईजच कॉम्प्लिमेंटरी आहे !! तो म्हणाला. "पण बघ ना..तिनं घरी बॉक्स उघडल्यावर कुणीतरी तुझ्यासारखंच किंचाळलं असेल, नाही ?यात  तिचं थोडं नुकसान झालंय. तिनं मोजलेल्या पैशांपेक्षा कमी quantity आणि फ्लेवर पण वेगळा..कदाचित मूडऑफ झाला असेल तिचा अन कदाचित त्या 'प्रियांक'चाही..लवकर लक्षात आलं असतं तर परत नेऊन तरी दिला असता ..ती हळहळली. "असू दे गं..दोन्हीकडे  केक तर  आहे ना सेलिब्रेशनला ? "पण तो  बर्थडे बॉम्ब गेला ना तिच्याकडे "संध्याच्या रडवेल्या वाक्यावर एकच हशा पिकला. केकवर लिहिलेली  'प्रियांक' नावाची स्ट्रीप तिनं पलटवली तर त्यावर 'प्रियांका'  लिहिलेलं होतं. अर्थात स्पेलिंगच्या चुकीमुळे स्ट्रिपच्या दोन्ही बाजू वापरल्या गेल्या होत्या. आणि एवढा खटाटोप होऊनही केक काही त्या 'प्रियांक'कडे पोचला नव्हता. स्ट्रीपभोवतीचं चॉकलेट तिच्यावर भुरभुरून तात्पुरतं ते नाव अदृश्य करून पंकजने आपली कल्पकता दाखवून दिली आणि उत्सवमूर्तीने एकदाचा केक कापला. 
      सेलिब्रेशन मस्त झालं. पण अजूनही तिच्या मनात त्या स्त्रीचा विचार घोळत होता. तिने परत केला असेल का तो केक ? मग..दुकानदाराला पैसे परत  करावे लागले असतील तिला..की आपल्यासारखाच स्वीकारला असेल तिने ? केकशॉप, ती स्त्री आणि संध्या.. ८०-९० रुपये फार गौण होते तिघांसाठीही .पण त्या स्त्रीचं थोडं नुकसान आणि त्याहीपेक्षा तिला  करावं लागलेलं कॉम्प्रोमाइझ (compromise ) याची टोचणी संध्याच्या मनाला लागून राहिली होती . स्वतःची चूक नसतानाही केक खाताना उगाच लाभार्थी झाल्याची भावना तिला बहुधा खटकत होती.
          दुसऱ्या दिवशी सकाळीच तिनं केकशॉप गाठलं. कालचा सेल्सबॉय सकाळच्या शिफ्टला नव्हता. दुकानमालकाला तिनं झालेला घोळ सांगितला. आणि राहिलेले पैसे दिले. माझ्याआधी कुणी स्त्री अशी तक्रार घेऊन आली का ? तिला पैसे refund  झाले का ? या तिच्या प्रश्नांची उत्तरं दुकानमालकाकडेही नव्हती. "मी विचारेल त्या मुलाला  आणि असं झालं असेल तर पैसे जरूर परत करीन त्यांना." ते म्हणाले. लगेच त्या मुलाशी संपर्क करून या गोष्टीची खातरजमा करून घेण्यापेक्षा आपलं संभाव्य नुकसान भरून घेण्याची तत्परता त्यांच्या बोलण्यात जाणवून..'कुणी विचारायला आलं नाही तर यांचाच फायदा व्हायचा' असा विचार क्षणभर तिच्या मनात डोकावला. पण तेवढ्यात  "खरं तर केक मिळाला ना ? हा विचार करून कदाचित कुणी आलंही नसतं पण तुझा थोडा फायदा होऊनही तू आलीस हेच खूप आहे. थँक्स हा !" हे दुकानमालकाच्या तोंडून  ऐकून तिला बरं वाटलं.  ती स्त्री तक्रार घेऊन आलीच तर तिला तिचे पैसे मिळतील अशी सोय तर तिने केली होती. घरी आल्यावर कालच्या उरलेल्या केकवर यथेच्छ ताव मारला.  "घे, घे, कॉम्पलेमेंटरी नाही बरं का काही..आपलाच आहे..अक्क्खा ! " पंकजच्या डोक्यात टपली मारत ती म्हणाली.
       आयुष्यही असंच असतं , नाही ? बरेचदा समोर  बरे-वाईट सरप्राईज येतात. कधी अनपेक्षितपणे असा आवडता फ्लेवर समोर येतो..तर कधी..त्या स्त्रीसारखं कॉम्प्रोमाईज. तुम्ही, मी, कुणीही..हातून चुका होणार. कधीकधी काही चुका त्याच वेळी दुरुस्त करायची संधीही मिळणार नाही पण त्या दुरुस्त करायचा प्रयत्न करायलाच हवा..आणि हे सगळं करताना ..त्या त्या वेळी आयुष्य साजरं करायला मात्र विसरू नये ! शेवटी वस्तूंपेक्षा आपल्या जवळची माणसे  आणि भावनाच आपल्याला जास्त सुखावतात. आयुष्य केकसारखं असेल तर ही सुखं म्हणजे - त्यावरची Icing. (आइसिंग) आणि काल काहीसं हरवलेलं आणि आज संध्याला परत मिळालेलं  समाधान म्हणजे - चेरी ऑन द केक..!   (Cherry on the Cake !). टेबलवर हसत बसलेल्या smiling candle कडे बघून ती गोड हसली...!
                                                                             -©अमिता अशोक पाटील.

Note - cherry on the cake - एखाद्या सुंदर गोष्टीला अजून सुंदरता किंवा पूर्णत्व देणारी गोष्ट (thing which give finishing touch to add beauty in something which is already beautiful )

Saturday, 31 August 2019


अंधेरोंमें थे कल तक,
सितारों में आ गये है..
कुबूल न थे अपनोंको 
और..जहाँ में छा गये है...

रेल की धडकन में 
दिल की धडकन सुनने की 
कहा फुर्सत थी ?  
जरूरतें पूरी करते थे नगमें..
यू मशहूर होने की 
कहा हसरत थी ?

उपरवाले की देन है 
लुटाते चले थे,
धूप में ही सही..
सुकून के पल
ऐसे ही मिले थे 

क्या पाया..क्या खोया
इसका हमें अफसोस नही
अपनोंका साथ न छोडना यारों...
प्यार मिले तो समझो,
मिल गया..फिरदौस यही...!!!
#यूँही...
                                   -©अमिता अशोक पाटील.
#Dedicated to Ranu Mandal  (रानू मंडल)..Lovey voice which got recognition in 2019.
#रानू मंडल या नुकतीच नवी ओळख मिळालेल्या सुरेल आवाजाला समर्पित

Note - 
१.फुर्सत - मोकळा वेळ/free time 
२.नगमा- गीत/Song 
३.मशहूर- प्रसिद्ध/popular 
४.हसरत - इच्छा/चाह/wish 
५.अफसोस - खेद,दुःख/regret 
६.फिरदौस - स्वर्ग/जन्नत/paradise  
      
  पश्चिम बंगालच्या एका रेल्वेस्टेशनवर गाणी गाऊन मिळालेल्या पैशांमधून चरितार्थ चालवणाऱ्या रानू मंडल हिच्या गाण्याचा व्हिडिओ 'अतीन्द्र चक्रवर्ती' या अभियंत्या युवकानं सोशल मीडिया वर अपलोड केला आणि तिच्या कलेला त्याने दिलेली दाद नंतर देशभरातून सगळीकडून येऊ लागली.
     रानूला दहा वर्षांपूर्वी एकटी सोडून गेलेली तिची मुलगी आता तिच्याकडे परतल्यावर तुमच्या माझ्यासारख्या अनेकांनी नाराजी व्यक्त करत तिला धारेवर धरलं..जे अगदी स्वाभाविक आहे. रानूने मात्र आपल्याला मिळालेल्या या दुसऱ्या संधीचा प्रेमानं स्वीकार केला. लतादीदींनी गायलेलं  'एक प्यार का नगमा है..'गाता गाता कदाचित जीवनाचा  अर्थ तिला गवसला असावा. मुलीला आपल्या चुकीचा पश्चाताप होणे आणि पैशांसाठी नव्हे तर  इथून पुढे कधीही आईची साथ न सोडणे हे तिच्यासाठी खरं प्रायश्चित असेल.
  गायिका होणं ही तिची महत्वाकांक्षा नव्हतीच मुळी..पण तिच्या कलेबरोबरच तिच्या माणूसपणालाही नवी ओळख मिळाली. अतीन्द्र, रानू मंडल यांना चित्रपटाच्या एका गाण्याची संधी देणारा संगीतकार हिमेश रेशमिया हे दोघे अभिनंदनास पात्र आहेत. नव्या प्रवासात यश आणि ज्यापासून ती पारखी राहिली ते प्रेम रानू आंटीला मिळो ही बाप्पाचरणी प्रार्थना! 
       दरम्यान, एकीकडे या सुरेल आवाजाचं कौतुक होत असताना या गोष्टींवरही खूप जण विनोद करत आहेत.  सुरुवातीला दुर्लक्ष केलं पण काल एका FM  स्टेशन वर एका विनोदी कार्यक्रमात यावर विनोद ऐकला तेव्हा खूप वाईट वाटलं. तिला मिळालेली आवाजाची देणगी,  नशिबानं आणि काही लोकांनी दिलेली संधी यावर विनोद करणं..ही वृत्ती चांगली नाही. (हे न करण्याचं आवाहन करणाऱ्या पोस्ट्स ही वाचल्या ही समाधानाची बाब ).या सर्वांनी अतीन्द्रची प्रतिक्रिया ऐकायला हवी..तो म्हणाला- पैशांनीच सगळी सुखं मिळतात हे खरं नाही..वगैरे गोष्टी ऐकल्या होत्या पण आज माझी १ छोटीशी कृती मला खूप समाधान देऊन गेली आहे.  तेव्हा आपण (दाद देणार नसू) , appriciate करणार नसू तर किमान शांत तर राहू शकतो. Just be Kind ! विनोदाची सर्वोत्तम परंपरा लाभलेल्या आपल्या महाराष्ट्रात तरी असं होता कामा नये.सर्व कलागुणांचा अधिपती असलेला बाप्पा या सर्वांनाही सद्बुद्धी देवो...येणाऱ्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा !
                                                                          -©अमिता अशोक पाटील.

Sunday, 28 July 2019

ब्युटीफुल...


                                    

  गेली पाच मिनिटं संध्या स्वतःलाच आरशात न्याहाळत उभी होती. खुलून दिसणाऱ्या लाल रंगाच्या साडीच्या निऱ्या तिनं व्यवस्थित केल्या. कमरेपर्यंत रुळणारे मोकळे सोनेरी केस हलक्या हातांनी सावरत उगाच पापण्यांची मंद उघडझापही करून पाहिली.एरवी तिला मांजरीसारखे वाटणारे घारे डोळे आज काजळाने जरा जास्तच उठून दिसत होते.कानात डुलणाऱ्या झुमक्यांकडे बघताना आज दिवसभर ऑफिसात ऐकलेली वाक्य.."छान दिसतेयंस हा !", "looking beautiful !","डोळे सुंदर आहेत गं तुझे!" ही वाक्ये आठवून ती स्वतःशीच छान हसली."चला पार पडला एकदाचा traditional day..! " दिवसभरातला शेवटचा सेल्फी घेऊन तिनं मेकअप उतरवायला सुरुवात केली.
         लिपस्टिक पुसून टाकताना तिनं स्वतःलाच विचारलं- "आजची मी अन रोजची मी फारच फरक आहे का ?"  मोकळ्या केसांत जेवढी छान दिसते तेवढी तेल लावून घातलेल्या वेणीत...? काजळ, eyeliner, लिपस्टिक यांच्याशी फार मैत्री झालीच नाही कधी. हळूहळू प्रसंगानुसार (occasionally )का होईना वापरायला शिकले. पण पुस्तकं-कागद-पेन-माईक-प्रवास-गाणी यांच्यासोबतची सहजता कदाचित इकडे अजून नाहीच. तरी कधीतरी नटायला आवडतं..कुणाला आवडत नाही ?या गोष्टींचा माझं काम, कार्यक्षमता, आणि माझ्या स्वभावाशी काही संबंध नाही ना ?पण कधीकधी तुम्ही चढवलेल्या पुटांवरून तुमची लायकी ठरवणारी माणसं पाहिली की खटकतं ना ? निसर्गाकडे असं नसतं..पाऊस कसा खरा असतो..सगळी पुटं धुवून काढतो अन म्हणूनच असेल कदाचित पण भिजल्यावर ती नितळता आपल्याला अनुभवायला मिळते.
कोरलेल्या दाट भुवयांकडे पाहताना तिला काही दिवसांपूर्वीचा प्रसंग आठवला.
     ".. तू त्या फेशिअल वाल्या क्लायंटकडे बघ..मी आहे इकडे. आणि ते वॅक्स गरम करायला ठेव गं रेश्मा  .." 'ब्युटीफुल' ब्युटी पार्लरची संचालिका सौ. रुपाली  आपल्या सहकाऱ्यांना भराभर सूचना देत होती. संध्या अन तिची मैत्रीण शरयू त्यांच्या नंबरच्या प्रतीक्षेत होत्या."हम्म ..तुझं काय आहे..?" "आयब्रोज आणि हॅन्डवॅक्स. " हेअरकट वगैरे ?"  "नाही..सध्या तरी नको..मागच्या महिन्यात तर दिला होता shape" "साधा आकार ?स्टेप..लेअर काहीच्च नाही ? काय गं ..कशी राहतेस..जरा बघ आजूबाजूला..वेणीकडे अगदीच कसातरी कटाक्ष टाकत रुपाली बोलली. "ही आमची रेश्मा बघ...बॉयफ्रेंड मिळाल्यापासून रुपडंच पालटलंय..अगदी हायफाय राहायला लागलीये..तुझं काही होणार नाही..कोण रेश्मा ? हे बघण्यासाठी संध्या वळली तर डोळ्यांवर येणारी बट सावरत एक मुलगी हसत होती. "कोणती केशरचना करायची ही आवड आहे ज्याची-त्याची..पण प्रेमात पडण्यासाठी भावना जास्त महत्वाच्या असतात की हाही निकष (क्रायटेरिया) असतो?..छे..छे !! संध्या मनातच म्हणाली . "कसंय ना ताई, माझ्या केसांचा पोत (texture) बारीक  आणि लांबी जास्त आहे..रोज एवढ्या घाईत मोकळ्या केसांचा गुंता सोडवण्यापेक्षा वेणी मला जास्त  सोयीची वाटते. प्रेझेन्टेबल वगैरे राहणं समजू शकते  मान्यही आहे पण comfortable  वाटत नसताना फॅशन म्हणून कदाचित रोज मी नाही वावरू शकत अशी. आणि फॅशनचं काय..उद्या एखाद्या अभिनेत्रीने घातलेली वेणी प्रसिद्ध झाली तर तुम्ही पॅटर्न बनवून नवा ट्रेंड म्हणून क्लायंट्सला दाखवाल..नाही का ? हसत हसत शक्य  तेवढं logical उत्तर द्यायचा तिने प्रयत्न केला. "असो..शरयू मला मार्केटमध्ये जायचंय..निघायला हवं..तू येशील का नंतर..आणि हे ठेव पैसे..रुपालीताई हिच्याकडून घ्या दोघींचे.."  "अगं जास्त आहेत ते.."  "असू दे.." शरयूला दटावत संध्या पार्लरमधून बाहेर पडली.
       आता शरयूकडे मोर्चा वळवत सौ. रुपाली म्हणाल्या.."काय गं, वाटलं नव्हतं मला पण बोलते तर भारी..काय करते तुझी मैत्रीण ? "काय वाटतं, काय करत असेल ?" शरयूने मुद्दाम विचारलं."करत असेल कुठेतरी काम..अन तुला पैसे कसेकाय दिले तिने ..तुला तर तिच्यापेक्षा जास्त पगाराची नोकरी असेल.." रुपालीच्या तर्कबुद्धीला लगाम लावत शरयू म्हणाली- "नाही हो..मी अजून struggler आहे , स्थिरावली नाहीये अजून. संध्या - वर्षांपासून IT   आहे. स्वतः केलेला struggle लक्षात आहे म्हणून दिले मघाशी पैसे.अभ्यासातही आधीपासून हुशार आहे बरं का माझी मैत्रीण. शरयू कौतुकानं बोलत होती. "अगं बाई..हो का ? पण साधी राहते..मी तिला काहीतरीच समजत होते गं."
      "खरं सांगू रुपालीताई ? आपण कधीकधी काही गोष्टींना नको तसं stereotype करतो. म्हणजे बघा ना ..IT  किंवा कोणत्याही कंपनीत बरा पगार मिळवणारी मुलगी ही तिचे ब्रॅण्डेड/शॉर्ट कपडे,  सो कॉल्ड मॉडर्न समजलं जाणारं राहणीमान यानेच ओळखली जावी का ? बरेचदा हे सगळं त्या व्यक्तीची वैयक्तिक आवड, निवड (चॉईस) , मनस्थिती, परिस्थिती, प्राधान्यक्रम (priorities)  यांच्यावर अवलंबून असतं. घरच्या जबाबदाऱ्या पार पाडून कामावर जाणारी एखादी स्त्री कदाचित आपल्या बाळाचा टिफिन चेक करायला  विसरत नाही..पण एकवेळ eyeliner चेक करायला विसरत असेल.एखादी मुलगी आपल्या शिक्षणाच्या खर्चाचा वडिलांवर पडणारा भार जाणवून छानसं मेकअप किट घ्यायची आपली इच्छा बऱ्याच काळापासून पुढे ढकलत आलेली असू शकते. कुणी आपल्या धेय्यापाठी प्रयत्न करताना  तुमच्या- आमच्या दृष्टिकोनातून कधीतरी सुंदर दिसायला कमी पडू शकेल कदाचित..पण म्हणून ती व्यक्ती सुंदर माणूस नसते का ? एखाद्याचं रूप, राहणीमान  यावरून त्याचं स्टेटस/लायकी याबाबत चुकीचे आडाखे बांधून त्यांना लेबलं लावण्यापेक्षा तो माणूस म्हणून कसा आहे आणि त्याचं कर्तृत्व या गोष्टी महत्वाच्या आहेत..नाही का ?आणि आपली एखादी नकारात्मक टिप्पणी (कमेंट) एखाद्याच्या मनात न्यूनगंड (कॉम्प्लेक्स) निर्माण करू शकते. एखादा बदल जरूर सुचवावा पण त्यात हिणवण्याची भाषा नसावी ..असं मला वाटतं. तुम्ही तर इतक्या छान ब्युटिशिअन आहात. आम्हाला सुंदर look  देण्याचं केवढं कौशल्याचं काम करता..त्याबद्दल आदर आहेच. आपण आपली मनंही अशीच खुली ठेवली तर आपलं आणि इतरांचं जगणंही नेहमी 'ब्युटीफुल' राहील..तुमच्या पार्लरसारखं ! नाही का ?"
" हो गं, खरंय..आणि मेकओव्हर काय..कमी वेळातही शक्य आहे पण मन ब्युटीफुल ठेवण्यासाठी काय अप्लाय करायचं अन काय नाही हे आपणच ठरवायला हवं..पटलंय मला. "
       "अगं..उरकलं की नाही तुझं ?" "हो हो ,आलेच " म्हणत शरयूनं फोन ठेवला.घरी जाताना संध्याला मोबाइलमधला एक फोटो दाखवत ती म्हणाली -"ही बघ साई पल्लवी, दक्षिणेतली अभिनेत्री. सुंदरतेची व्याख्या काही प्रमाणात बदललीय तिने." " हो सुंदर अभिनय करते म्हणे. मागे एका फेअरनेस क्रीम च्या जाहिरातीला तिने नकार दिल्याचं वाचलं होतं."संध्या म्हणाली. "साधं राहण्याचा एखादा वेगळा फायदा सांगू शकतेस का संध्या ?" "आपलं रूप/श्रीमंती/ऐपत बघून मैत्री करणाऱ्या लोकांपासून सुटका होते..मग आमच्या बागेत सगळी फुलं सुंदर असतात. गिनी-चुनी..तुझ्यासारखी ! समजलं का बाळा?" खिदळत संध्या उत्तरली.
"हो..चल,, पाणीपुरी खाऊ..म्हणजे आपली संध्याकाळही होईल- "ब्युटीफुल "!!! दोघी एकसुरात म्हणाल्या.
अमिता अशोक पाटील.