Thursday, 26 November 2015

शुभमंगल... सावधान !

             दिवाळी संपली..तुळशीविवाह आटोपले..आता सुरु झालेत लग्नसोहळ्यांचे दिवस.काही घरांमध्ये लग्नाच्या तयारीची लगबग सुरु आहे तर काहीजण वर -वधू संशोधनात मग्न आहेत. आपल्याकडे विवाहसोहळ्यांमध्ये काळानुरूप बदल झाले.पण एक गोष्ट अजूनही तशीच आहे ..ती म्हणजे -हुंडा. आज हे आठवण्याचं कारण म्हणजे आजचा दिवस -२६ नोव्हेंबर हा हुंडाविरोधी दिन (Anti -Dowry Day ) आहे. १९६१ साली आपल्या देशात हा हुंडा घेणे गुन्हा ठरवणारा कायदा अस्तित्वात आला. पण आजही हुंडा न घेणाऱ्या-देणाऱ्या लोकांची संख्या नगण्य आहे. आजही हुंड्यामुळे होणारया हत्या- आत्महत्यांच्या बातम्या आपण ऐकतो. ' तंबाखू खाल्ल्याने कर्करोग होतो ' असं कितीही मोठ्या टाईपमध्ये लिहिलेलं असलं तरी जोपर्यंत खाणारयाच्या मानसिकतेत बदल होत नाही तोपर्यंत त्याचं व्यसन सुटत नाही- तसा हा प्रकार.   
              महाराष्ट्रासहित देशातल्या अनेक राज्यांमध्ये वर्षानुवर्षे आपण या प्रथेला खतपाणी घालत आलो आहोत. आणि आजकालचे सुशिक्षित, स्वतःला पुढारलेल्या विचारांचे समजणारे लोकही यात मागे नाहीत ही सर्वात लाजिरवाणी गोष्ट. गुरांच्या बाजारात जशी प्रत्येक बैलाची किंमत ठरलेली असते तशीच प्रत्येक नवरदेवाची किंमत(Rates !!) ठरलेली असते. कुणी हजारांत, कुणी लाखांत स्वतःला विकून घेतात, तर कुणी आपली किंमत २५- ३० तोळे सोन्यांत सांगून मोकळे होतात. काहीजणांचा युक्तिवाद असतो कि - "आम्ही मुलाच्या शिक्षणासाठी एवढा खर्च केलाय .." मग ? त्याची भरपाई मुलीच्या वडिलांकडून घेता का ? जणूकाही मुलीचं शिक्षण खर्च न करताच झालंय..आणि ती कमावणारी असेल तर तिचा पगार दर महिन्याला माहेरीच नेउन देणार आहे..!वडिलांची हुंडा देण्याची ऐपत नाही म्हणून कितीतरी मुलींची लग्न मोडतात किंवा त्यांना अपेक्षेप्रमाणे वर मिळत नाही.
          लग्न झाले तरी देण्याघेण्याच्या गोष्टींवरून नात्यांमध्ये आलेली कटुता आपण बरेचदा पाहतो. दिवाळीला सासऱ्यानं आपल्याला सोन्याची अंगठी द्यावी, चारचाकी किंवा नवीन व्यवसायासाठी पैसे द्यावेत अशा मागण्यांसाठी रुसून बसणारे, प्रसंगी बायकोला त्यासाठी माहेरी पाठवणारे 'महाभाग' ही आहेत. वास्तविक पाहता, लग्न म्हणजे फक्त वर-वधूचं नव्हे तर दोन घराचं मिलन. या एका नात्यामुळे कितीतरी नाती तयार होतात; पण ही नाती हुंड्यातून येणाऱ्या पैशांच्या स्वार्थावर आधारलेली असतील तर ती बहरतील कशी ? एक मुलगी सून होताना आपले आई-बाबा, घर, मायेची माणसं हे सारं सोडून येते- कायमची-आयुष्यभर पतीला साथ देण्यासाठी. हे कमी आहे का? पैसे मागण्यापेक्षा तिला प्रेम दिलं तर तीही घराला प्रेमच देईल.
       कायदा त्याचं काम करत राहील पण या गोष्टी थांबवण्याचं सामर्थ्य आहे- युवाशक्तीत. आपण पाहतो की विवाहेच्छुक तरुण मुलगी पसंत करण्यात रस घेतात पण हुंड्याची बोलणी सुरु झाली की आपल्या घरच्यांकडे धुरा सोपवतात.प्रत्येक तरुण- तरुणीने ठरवलं की "मी हुंडा देणार/घेणार नाही ' तर हे सहज शक्य आहे .हे सर्वांनी ठरवणं गरजेचं आहे कारण आपण दिला नाही तर दुसरा कोणी हुंडा देईल आणि आपली मुलगी बिनलग्नाची राहील याच भीतीतून, इच्छा नसूनही, हवं तर कर्ज काढून हुंडा दिला जातो.ज्या घरी एकापेक्षा जास्त मुली आहेत असे लोक, शेतकरी,मजूर,मध्यमवर्गासाठी 'मुलीचं लग्न' हा चिंतेचा विषय असतो. आई -वडील आपलं कर्तव्य निभावतात पण मुलीच्या लग्नासाठी स्वतःच्या, घराच्या छोट्या-छोट्या गरजांना महत्व न देता, स्वतःच्या इच्छांचा त्याग करतात--हे पाहणं कोणत्या मुलीसाठी सुखदायक असेल ? मुलींच्या मनात त्यामुळे अपराधीपणाची भावना असते.
         एकीकडे महाराष्ट्रासारख्या राज्यांत हुंड्याची प्रथा आहे तर दुसरीकडे हरियाणा-सारख्या राज्यांत मुलींची संख्या कमी असल्यामुळे लग्नासाठी त्यांचा 'सौदा' अर्थात व्यापार केला जातो.हुंड्याची प्रथा नष्ट झाली तर मुलींचा जन्म आणि शिक्षण नाकारण्याचं प्रमाणही कमी होईल.तेव्हा शुभमंगल करताना ..हुंडा दिला-घेतला जाणार नाही यासाठीही सावधान राहूया..आणि हुंड्याची अनिष्ट प्रथा नष्ट करण्यात आपल्या परीने प्रयत्न करूया..तुम्हाला काय वाटतं ?

Saturday, 21 November 2015

मुश्किलें

एक दिन किस्मत ने हमारा दरवाजा खटखटाया
और बोली - " मेरे चाहनेवाले तो बहोत हैं - मगर इनका कोई नहीं
संभालो इन मुश्किलोंको
मैं मिलूंगी तुम्हें फिर कही"
तब से मुश्किले हमारे साथ आयी
उम्र के साथ वो भी बडी हुई
गम के अंधेरे भी आये जिंदगी में
और आये खुशियों के मौसम
उनके साथ ही बढाया हमने अपना हर कदम
फिर एक दिन किस्मत वापस आयी
बोली - लौटा दो उन मुश्किलोंको
जो मैने थी तुम्हारे दामन में डाली
हमने कहा - "बरसों की दोस्ती पलभर में कैसे तोडे ?
हर मोड पर जो मिल जाये -उनसे मुॅह  कैसे मोडे ?
खूब शिकायत करता है जमाना
पर हमें तो उनकी आदत-सी हो गयी है
और शायद.... भा गये हम उन्हे  इसकदर
कि उनको भी हमसे मोहब्बत हो गयी है
उनको भी हमसे मोहब्बत हो गयी है ....|"
                                                   ©️अमिता अशोक पाटील 

Wednesday, 11 November 2015

पहिलं पाऊल

काही दिवसांपूर्वी 'मांझी- The  Mountain Man'  सिनेमा पहिला.सुस्तावलेल्या डोळ्यांत कुणीतरी अंजन घालावं असा अनुभव. दशरथ मांझी आणि पडद्यावर ही व्यक्तिरेखा साकारणारा नवाजुद्दिन सिद्दिकी या दोघांनाही सलाम ! आपल्यासमोरच्या आव्हानाला आव्हान देणारा, भल्यामोठ्या डोंगराला रोजच ललकारणारा मांझी खूप काही शिकवून गेला. इथून पुढे 'अवघड आहे..!' असं कोणत्याही गोष्टीबद्दल वाटलं तर मनात घर केलेला मांझी विचारेल - " पहाड तोडे से भी मुश्किल हैं का ?" आजूबाजूची माणसं वेडा ठरवत असताना त्याचा आत्मविश्वास वाढवणारी कोणती गोष्ट होती त्याच्याकडे ? - त्यानं सुरु केलेलं,रोज थोड्या थोड्या प्रमाणात पूर्णत्वाकडे जाणारं त्याचं काम त्याला उभारी देत होतं.म्हणजे एका अर्थानं हा कामाचा पाठपुरावा होता.
        आजकाल कर्मचाऱ्यांच्या कामाचा पाठपुरावा (follow -up ) घेण्यासाठी project management ची साधनं (tools ) वापरतात. अशाच एका tool मध्ये कामांची वर्गवारी To Do, Doing, आणि Done अशा याद्यांमध्ये (lists) मध्ये केली जाते. ज्याची To Do लिस्ट मोठी त्याच्याकडे Pending कामं जास्त असा त्याचं अर्थ. मला वाटतं- आपल्या रोजच्या चाकोरीच्या जगण्याव्यातिरिक्त अशा बऱ्याच छोट्या-मोठ्या गोष्टी असतात ज्या आपल्याला करायच्या असतात ..किंवा कधीतरी कराव्या वाटलेल्या असतात. पण 'छे ! जमेल का मला? ' म्हणून त्यांचा विचार सोडून दिलेला असतो किंवा 'बघू,करू नंतर...' असं म्हणत त्या अद्यापही करायच्या राहिलेल्या असतात.ही अलिखित To Do लिस्ट बऱ्याचदा खूप मोठी असते.
        एका टीशर्टवर एक वाक्य वाचलं होतं - 'I am just waiting for a better day'. बरेचदा चांगल्या दिवसाची वाट पाहत पाहतच आपली To Do लिस्ट मोठी होत जाते. अन मग whatsapp  वर वाचून वाचून रटाळ वाटू लागलेला विनोद डिलीट करावा तशा काही गोष्टी मनातून पुसून टाकल्या जातात. आपल्याला सुचलेल्या एखाद्या सुंदर विचाराचं, सुखावणाऱ्या स्वप्नाचं, एखाद्या कल्पनेचं हे मरणच नव्हे का? तिला तिलांजली देण्यापेक्षा ती प्रत्यक्षात आणण्यासाठी थोडी धडपड केली तर? चांगल्या दिवसाची वाट पाहत बसण्यापेक्षा अशी सुरुवात करून वाटयाला आलेल्या दिवसांना चांगलं करण्याचा प्रयत्न तर नक्कीच करू शकतो आपण.
            कदाचित काही गोष्टी पूर्ण होणार नाहीत. कधीकधी पावलांनी चाललेली वाट बदलावी लागेल..दुसरी वाट शोधावी लागेल. पण काहीतरी मिळेलच. कारण मी अमुक एक चांगली गोष्ट करून पहिली नाही याचं शल्य आयुष्यभर घेऊन जगण्यापेक्षा अपयशाची एखादी कथा मिरवणं कधीही चांगलं ! नाही का ?
               थोडक्यात काय, तर पुढचं पाऊल म्हणजे यशाची खूण असली तरी पहिलं पाऊल जास्त महत्वाचं..ते एकदा उचललं की पुढची पावलंही पडतील अन एखादी वाट चालता चालता दशरथ मांझीसारखं काहीतरी गवसेलही - 'शानदार,जबरदस्त,जिंदाबाद !!' दीपावलीच्या शुभदिनी लक्ष लक्ष दीपांच्या साक्षीने प्रकाशमय वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा...Happy Diwali...!!