परवा ऑफिसमध्ये एक संवाद कानावर पडला. "अरे विनय, तुझ्या मुलींना तू मराठी माध्यमाच्या शाळेतच घाल बरं
का.." "अरे वा..तुम्ही तुमच्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिकवताय आणि मला असा सल्ला का देताय?" - इति विनय..
“तेच तर..आम्ही चूक केली..तू करू नको..साधे पाढे म्हणता येत नाहीत..आपल्यासारखा तोंडी हिशोब करता येत नाही..दुकानात गेल्यावर बेसिक हिशोब करताना calculator लागतो बरेचदा.. सगळ्या विषयांत चांगला स्कोअर येतो पण मराठी शब्दांच्या स्पेलिंगची काळजी वाटावी ? नाही पटत रे..मी genuine प्रयत्न केला होता त्याला "अमुक" मराठी शाळेत addmission मिळावं म्हणून..पण नाही जमलं.”
“तेच तर..आम्ही चूक केली..तू करू नको..साधे पाढे म्हणता येत नाहीत..आपल्यासारखा तोंडी हिशोब करता येत नाही..दुकानात गेल्यावर बेसिक हिशोब करताना calculator लागतो बरेचदा.. सगळ्या विषयांत चांगला स्कोअर येतो पण मराठी शब्दांच्या स्पेलिंगची काळजी वाटावी ? नाही पटत रे..मी genuine प्रयत्न केला होता त्याला "अमुक" मराठी शाळेत addmission मिळावं म्हणून..पण नाही जमलं.”
"नको गं एवढं टेन्शन घेऊ..आपण शिकवायचं मुलांना मराठी.."
२७ फेब्रुवारी हा कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिन - "मराठी राजभाषा दिन " म्हणून साजरा केला जातो. मराठी राजभाषा दिन जवळ आलेला असताना हा संवाद ऐकायला मिळावा हाही एक योगायोगच.या संवादाने एकीकडे अंतर्मुख तर केलंच पण आपल्याला मिळालेला मायबोलीचा संपन्न वारसा आपल्या मुलालाही मिळावा ही त्या आईची इच्छा, तळमळ आणि चर्चेचा निष्कर्ष ऐकून बरंही वाटलं.
मराठी भाषा जगायला हवी, टिकवायला हवी हे आपण नुसतेच एकमेकांना सांगत बसणार आहोत आणि प्रत्यक्षात काय करणार आहोत त्यासाठी ? मी मराठी माध्यमाच्या शाळेत शिकले. कुसुमाग्रज, विंदांपासून ते अगदी नव्या पिढीतल्या कवी- लेखकांनी आपल्या समर्थ लेखणीने मराठीला समृद्ध केलंय. आम्हाला कवी यशवंतांनी ‘आई म्हणून कोणी आईस हाक मारी’ म्हणून रडवलंय, बहिणाबाई चौधरींनी "तुला दिले रे देवाने दोन हात दहा बोटं" म्हणून सुगरणीच्या खोप्यातुन जीवनाची कला
शिकवलीय..बालकवींनी 'श्रावणमासी हर्ष मानसी' म्हणून खुलवलंय, कुणी प्राजक्ताची टपटप पडणारी फ़ुलं वेचण्यातला, पावसाचा मनसोक्त आनंद घ्यायला सांगितलं ,निसर्गाचं सौंदर्य न्याहाळायला कुणी दृष्टी दिलीय. मिरासदार, अत्रे,पु लं नी खळखळून हसवलंय. आपण जगतो त्यापेक्षा कितीतरी खडतर आयुष्य जगणारे आपलेच समाज बांधव या समाजात आहेत..शेतकरी, कष्टकरी वर्गाच्या समस्या आणि तरीही निखळपणे जगण्याची त्यांची वृत्ती या सगळ्याची जाणीव काही लेखकांनी करून दिली. त्यामुळेच कोकण, मराठवाडा, खान्देश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र इत्यादी वेगवेगळ्या भागातल्या बोलीभाषांची गोडी आम्हाला चाखायला मिळाली.जरा मोठे झाल्यावर वपुंनी खोल विचारांच्या सागरात आम्हाला
कित्येकदा बुडवून स्वतःशी बोलायला भाग पाडलंय. ज्ञानोबा माऊलींच्या ओव्यांमधून, तुकोबाच्या अभंगांमधून,समर्थांच्या मनाच्या श्लोकांमधून आमच्या मनात सुविचारांचं अमृत अगदी अलगदपणे, कुठलाही गाजावाजा न करता पाझरवलं गेलं..आमच्या जडण-घडणीत या सगळ्यांचा वाटा आहे .
आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मराठीच्या ज्ञानानं आम्हाला कधीही इंग्रजी किंवा इतर कुठलीही प्रादेशिक अथवा परकीय भाषा शिकायला अडवलं नाही. उलट मातृभाषेची चांगली ओळख असलेली व्यक्ती इतर भाषा सहजतेने शिकू शकते असं मला वाटतं. एखाद्या प्रदेशाच्या समाजजीवनाचा आरसा त्या भाषेतल्या साहित्यात बघायला मिळतो. म्हणून हे शिक्षण महत्वाचं आहे. इतर भाषांबरोबर तिचं
आदान-प्रदान होणंही गरजेचं आहे. नवनवीन भाषा जरूर शिकाव्यात पण मायमराठीला न विसरता!
आजच्या playgroup,LKG,UKG मध्ये interview देऊन प्रवेश घेणाऱ्या चिमुकल्यांना हे सगळं मिळतंय का? अमृतातेही पैजा जिंकणारी माझी मायमराठी तिच्याच लेकरांपुढे हरतेय का ? दैनंदिन जीवनात मराठीचा जास्तीत जास्त वापर करायला आणि मुलांना ती शिकवायला आपल्याला कमीपणा का वाटावा ? स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी मुलांना सी.बी.एस.ई, कॉन्व्हेंट,किंवा आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये दाखल केलं जातं. यातल्या बऱ्याच ठिकाणी फक्त सरकारची सक्ती आहे म्हणून प्रादेशिक - मराठी भाषा शिकवली जाते. त्यामुळे ती दुर्लक्षित राहते. इतर विषयांप्रमाणे तिला न्याय मिळावा ही शाळांचीही जबाबदारी आहे. शाळांचं माहीत नाही पण या चिमुकल्यांचे आई-बाबा, ताई -दादा, काका, मामा, मावश्या या सर्वांनी आपल्याला मिळालेला मायमराठीचा वारसा त्यांनाही द्यावा. नाहीतर मोडीलिपी लयास गेल्यावर आता जसं संशोधन सुरु आहे तसंच काही वर्षांनी -"Once upon a time there was a Language
called Marathi" असं ऐकून हळहळणारी आणि ती शिकण्यासाठी धडपडणारी ही पिढी आपल्याला माफ करणार नाही. अर्थात असं आपण होऊ देणार नाही !!
शिवरायांनी मराठी संवर्धनाचं काम 'राजकोश
' तयार करून केलं होतं. आजही मराठीवर प्रेम करणारे लोक तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनही प्रयत्न करत आहेत. ई- पुस्तके, ब्लॉग्स इत्यादी. यात अनिवासी मराठी बांधवांचाही समावेश आहे . मराठी नाटकं सिनेमे सातासमुद्रापार जात आहेत ही चांगली बाब आहे.तेव्हा हा समृद्ध वारसा जपूया..मराठी बोलत, वाचत, लिहीत राहूया.. कारण कवी सुरेश भटांनी म्हटल्याप्रमाणे -
"लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक मानतो मराठी
"लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक मानतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी.."
- अमिता
- अमिता
