Monday, 7 March 2022

   


       कोणे एके काळी आई पार्वतीने भगवान शंकराशी आपला विवाह व्हावा म्हणून तप केलं होतं म्हणे. कारण तिचा हा हट्ट तिच्या वडिलांना मान्य नव्हता . भगवान विष्णूसारखी स्थळं येत असताना देव असला तरी तुलनेत दिसणारी संपत्ती कमी आहे म्हणून त्याला नाकारणारा तिचा पिता. कलियुगात असं तप करता येतं का ? हट्ट, प्रतीक्षा, विनवण्या ,नाराजी हे सहन करणं हेच तप असावं या काळात पण प्रत्येकीलाच त्यात यश मिळेल असं नाही.

     खरं तर मुलगी कमावती असो किंवा न कमावणारी , तिच्यापेक्षा जास्त कमावणारा, सो कॉल्ड स्टेबल (स्थिरावलेला) म्हणता येईल असाच मुलगा मिळणं म्हणजे खूप मोठ्ठी आणि अत्यावश्यक गोष्ट आहे हाच समज आपल्याकडे आजही आहे. त्यात फार गैर असं नसेल पण कुण्या मुलीने स्वतः पैश्यांपेक्षा माणसाची माणुसकी, विचार या गोष्टींचा विचार करून एखाद्या मुलाला पसंती देणं आपल्याकडे मूर्खपणाचं लक्षण समजलं जातं. अर्थात यात शिकण्याच्या अल्लड वयात शिक्षण सोडून कसलाही विचार न करता पळून जाणाऱ्या, आणि नंतर पश्चात्ताप करणाऱ्या लोकांचा मोठा वाटा आहे. त्यांनी त्यांचा निर्णय त्यांच्यापुरता घेतला असला तरी एखाद्या प्रगल्भ मुलीने असा स्वतःपेक्षा जरा बीस-उन्नीस कमी मुलाला पसंती दर्शवली की स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा करणाऱ्या, ऐकणाऱ्या आदरणीय वरिष्ठ पिढीचा त्रास वाढतो. अशा लोकांची उदाहरणं मग पावलोपावली दिली जातात. खरं तर त्याची काही गरज नसते. इतकं हे मुलगा सर्व पातळींवर  श्रेष्ठ  'सुपेरीअर' (superior) असावा हे भूत आपल्याकडे आहे. पण याउलट याच हट्टाने एखाद्या मुलीचं लग्न जमत नसेल तर कर ना अडजस्टमेन्ट म्हणून तिच्या मागे लागणारीही हीच मंडळी असतात. थोडक्यात काय, तुझं मन, तुझी इच्छा, तुझी तयारी यापेक्षा ही गणितं महत्वाची ठरवली जातात. गंमत म्हणजे जास्त शिकलेल्या मुलींना या अडचणी जास्त येतात. फक्त पॅकेज, पगार , संपत्ती याशी लग्न करण्याची त्यांची इच्छा मुळीच नसते. अर्थात त्यांचं  हित त्यांना कळत असल्याने अगदीच विजोड निवड त्यांचीही नसते पण पगाराची फूटपट्टी घेऊन निवड करणं त्यांना मान्य नसतं, कर्तृत्वाने, प्रयत्नाने प्रगती होते, संधी मिळतात हे व्यवहारज्ञान त्यांना अनुभवाने मिळालेलं असतं. आणि तशी साथ देण्याची त्यांची तयारीही असते. स्वावलंबनाने कमवत असल्याने असेल कदाचित पण कदाचित माझ्या कुटुंबाला माझी गरज पडली तर मीही समर्थ आहे हा विश्वास त्यांना असतो. वर ती थोडंफार जास्त कमवणारी असेल (किमान आज ) तरी आज ना उद्या यात खंड पडेल, कुटुंबाच्या दृष्टीने कदाचित ती काही काळ कामापासून दूर राहू शकते हेही तिच्या डोक्यात असतं आणि तिला मान्यही असतं.

     पण असा थोडाफार वेगळा विचार करणाऱ्या मुली त्यांच्या पालकांना, कुटुंबाला, तिच्या आयुष्याशी काहीही घेणं-देणं नसलेल्या आजू-बाजूच्या चार लोकांना अविचारी वाटतात. मग तिच्या इच्छांना तिच्या घरातलीच पूरूष मंडळी ज्यांना ती आपली सपोर्ट सिस्टीम समजत असते ती मंडळी सुरुंग लावतात. कधी दुर्लक्ष करतात , कधी आवाज गप्प करतात, कधी खोट्या प्रतिष्ठेची कारणं देतात. कधी तिच्या आयुष्यातल्या स्त्रियाही तिला याबाबतीत समजून घेत नाहीत. तरी ती एकटी लढत राहते.यापाठीमागची त्यांची काळजीही समजते पण काळजी करता करता अहंकारापायी  सुवर्णमध्य काढायचं सोडून अनावश्यक गोष्टी होतात हे वाईट.

     कधीकधी काय होतं, तिच्या प्रतिक्षेचा पाचोळा होतो . कारण वेळ ही अशी गोष्ट आहे की २४ तास सर्वांना मिळत असले तरी ते सर्वांसाठी सारखे नसतात. वेळ जुळवण्याचा धडपडीत कधीतरी ती हरते. ज्या क्षणांची वाट पाहण्यात खूप वेळ लागला ते क्षण, ती संधी फक्त झलक दाखवून निघून जाते. ती आटापिटा करत राहते पण जिंकण्याची खात्री आता तिनेही सोडलेली असते. घरातली कामं, ऑफिसची कामं, जबाबदाऱ्या,  आवडी , छंद सगळ्या बाबतीत कौतुक ऐकत असली तरी तरी आपल्या इच्छेचं मोल कुणाला नाही ही जाणीव तिच्या जाणिवांना मारून टाकते. आजवर आई-वडील, कुटुंब, गुरुजन तिची आपली माणसं यांचा मान राखून त्यानं कधी खाली बघावं लागू नये म्हणून तिनं केलेल्या तडजोडी, तिनं पाळलेली मर्यादा सारं सारं तिला व्यर्थ वाटू लागतं. पण म्हणतात ना प्रामाणिकपणा हे एक व्यसन आहे ज्याला हिंदीत 'लत' म्हणतात. ज्यांना ती असते ती सुटणं कठीणच. तिला वाटतं टोकाचं व्यवहारीच असलेलं बरं, दुनियादारी शिकून घ्यायला हवी पण छे! तिला माहित असतं टोकाची दुनियादारी या जन्मात तरी जमणार नाही.

    कुठेतरी वाचलेल्या ओळी तिला आठवतात- 'आयुष्याच्या कपड्याला सुरकुत्या (आढ्या) पडल्या असतील तरी उत्साहाची इस्त्री फिरवली कि त्या जाऊ शकतात. ती स्वतःशीच बडबडते "सुरकुत्यांची, आढ्यांची  कुणाला भिती आहे ? फक्त दुसऱ्या कुणी तो कपडा कुस्करु नये, फाडू नये इतकंच."या सगळ्या विचारानं थोडी हताश, थोडी निराश, थोडी थकलेली ती उद्याच्या कामाचा यादी मनात करत  असते. कधी एखाद्या निरागस चिमुकल्यावर माया करते. मनात विचारांचं वादळ चालू असताना वर शांत दिसत असते. मोबाईल, सोशल मीडिया, इनबॉक्सात महिलादिनाचे मेसेज, शुभेच्छा ओसंडून वाहत असतात. ती मोबाईल उचलते, तिच्यासकट तिच्यातली वेदनाही हसते आणि ती शुभेच्छांवर उत्तरते - "थँक यू!" आणि सृष्टीला जन्माला घालणाऱ्या , न पाहिलेल्या तरी आपल्या वाटणाऱ्या शक्तीला स्मरून सज्ज होते पुढच्या प्रवासासाठी..चालत राहण्यासाठी ...

                                                                                                                                              -© अमिता

अनेक अपवादात्मक उदाहरणं आहेतच ही चांगली बाब आहे . हा नाण्याची दुसरी बाजू दाखवण्याचा प्रयत्न..मित्रांनो, भावांनो, विशेष करून आई-बाबा, काका -मामा म्हणवणाऱ्या जेष्ठ वंदनीय पिढीतल्या लोकांनो किमान शिकलेल्या मुलींनी विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयांना किमान विचारात घेण्याचं औदार्य माणूस म्हणून आपण दाखवलं पाहिजे ही कित्येक मुलींची इच्छा असेल हे नक्की.

#अजूनही_रात्रंदिन_आम्हा_युद्धाचा_प्रसंग  

#Happy_Women's_Day