Tuesday, 18 June 2024

झरोका...

         


      एक नेहमीची सकाळ. स्वयंपाकघरातलं काम उरकून ती वरच्या खोलीत आली. वर्क फ्रॉम होम म्हणजे तेच घर..तेच ऑफिस.  कामाच्या तासांमध्ये ऑफिससारखं वातावरण घरी टिकवून ठेवलं तर कामं व्यवस्थित होतात. अजून लॉगिन करायला बराच वेळ होता म्हणून आधी सगळी साफ-सफाई करूया असं मनाशी ठरवून तिनं हातात झाडू घेतला. दोन खोल्यांमध्ये झाडू मारला. समोरच्या मोकळ्या जागेत झाडू मारून , कुंड्यांमधल्या रोपांना पाणी घातलं. मागच्या खोलीत जाऊन झाडून घेऊ ? तिनं स्वतःलाच एकदा विचारलं. कुठलीही नवविवाहिता सासरी रुळताना आणि कदाचित त्यानंतरही असे प्रश्न स्वतःला विचारूनच कृती करते .  

      मागची खोली जिजींची - तिच्या आजे-सासूबाईंची.. इतर वेळी कुटुंबासोबत असल्या तरी दिवसभर आराम करण्यासाठी त्या याच खोलीत असतात. प्रत्येक मुलाकडे आणि मुलींकडे त्या ठराविक काळ राहून हवापालट करतात हे तिनं ऐकलं होतं. त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट तशी लग्नानंतरच झाली. म्हणून सासूबाईंसारखा प्रत्यक्ष संवाद आजे-सासूबाईंशी अजून नव्हता. त्यात वयोमानानुसार आणि कदाचित स्वभावानुसार त्याही मोजक्याच बोलतात असं तिला जाणवलं होतं. 

        आतापर्यंत तिने तुलनेत बोलक्या आज्या अनुभवल्या होत्या. मामाच्या गावी गेलं की लगेच तोंडावरून हात फिरवणारी "आली माझी चिमणी.." म्हणत कपाळावर मुका घेणारी आजी. ऑफिसचे कॉल आणि काम चालू असताना कौतुकानं पाहणारी आणि नंतर प्रश्न विचारणारी आजी. फावल्या वेळेत जात्यावरच्या ओव्या म्हणत बसणारी आजी. या आजींशी मात्र आतापर्यंत काही प्रसंगी आशीर्वादासाठी पाया पडताना ,जेवताना काय हवं- नको विचारतानाच बोलणं झालं होतं. यांच्याशी माझा संवाद कधी होईल  का ? आणि तो व्हावा म्हणून मी काय बोलू ? कुठून सुरुवात करू ? तिला समजत नव्हतं. नव्या वातावरणात- नवीन माणसांत मिसळताना सुरुवातीला काही झरोके असे बंद असतात. काहीतरी निमित्ताने ते उघडले जातात ना तेव्हा संवाद सुरु होतो..लय सापडली तर तो खुलतो आणि मग माणसांची सवय होते.

           काय करू... म्हणत म्हणत ती त्यांच्या खोलीत झाडू घेऊन पोचली.काही न बोलताच तिनं कचरा काढायला सुरुवात केली. आजी आपल्याकडे  बघत आहेत हे मात्र तिला दिसत होतं. खाली अंथरलेली चटई तिनं उचलताच आजींनी ती हातात घेऊन नीट ठेवली. हातासरशी फरशी पुसूनच घेते असं ठरवत ती पुन्हा तिच्या खोलीत गेली. बादलीत पाणी आणि फडकं घेऊन सज्ज झाली. आयत्या झाडूपेक्षा (मॉप) छोटे-छोटे काने-कोपरे पुसायला कधी-कधी फडकं बरं. तर आता सुरुवात आजींच्या खोलीपासून करावी म्हणून ती पुन्हा त्यांच्यासमोर जाऊन उभी राहिली. हातातली बादली बघून त्या म्हणाल्या - परवाच पुसली होती मी. "असू द्या..मी बाकीचं सगळं करतेय स्वच्छ. म्हणून इथे पण घेते पुसून" म्हणत ती कामाला लागली. पाण्याचा तांब्या, बामची बाटली, छोटं स्कार्फ, मिश्रीचा डबा..एकेक गोष्ट बाजूला करत ती पटापटा हात फिरवत होती. "आजी, करमतं का तुम्हाला इथं ? " तिनं मध्येच विचारलं. "करमतं ..न करमून कुणाला सांगते ?" तीन ठिकाणी तीन लेक. सगळ्यांकडे राहते. "गावाला जास्त करमत असेल ना ? " "हा..तिथंच आयुष्य गेलं..तिकडं चांगलंच वाटतं. बोलायला माणसं असतात. ऊन केवढं आहे..वाईच हवेला बसलं की बरं वाटतंय" वगैरे.. त्या बोलत होत्या ..ती ऐकत होती. बहुतेक आजी - आजोबांना शहरात सगळ्या सुविधा असूनही कोंडल्यासारखं वाटतं. यात आपण एक करू शकतो ते म्हणजे त्यांच्याशी संवाद साधून , शक्य त्या गोष्टींत त्यांना सामील करून त्यांच्या मनात  एकटं पडल्याची भावना येऊ नये यासाठी प्रयत्न करू शकतो. आणि जेव्हा जमेल तेव्हा गावी राहणं, मुळांशी जोडून राहणंही महत्वाचं. घरातली माणसं समाधानी दिसली की घर खऱ्या अर्थाने  ताजं वाटतं.

       आता तिने राहिलेल्या खोल्या पुसून घेतल्या..टेबल पुसून घेतला. खिडकीच्या काचा पुसून ती उघडली...घरातल्या झरोक्यांबरोबर आजींसोबतच्या संवादाचा झरोकाही आज उघडला होता. आता कुठे तिला फ्रेश - फ्रेश वाटलं. एकदा घरात सगळीकडे नजर फिरवत स्वतःवर जाम खूश होतं तिनं वेणी हवेत उडवली. बाहेरच्या झाडाची फूलं आणून टेबलवर मांडत लॉगिन केलं. डेली मीटिंग मध्ये तिचा बॉस " importance of effective communication with clients" बद्दल बोलत होता. मान डोलावत ती हसली.

-©अमिता 

Note : झरोका = खिडकी 

Picture Credit - google +  Two Women at a Window (1665-1675) by Bartolomé Esteban Murillo

(about 2nd pic- ही सुंदर कलाकृती (खिडकीत बसलेल्या २ स्त्रिया )Bartolomé Esteban Murillo या  स्पॅनिश चित्रकाराची आहे. ☺