"प्रियांक !!?? अगं ताईच्या नावाऐवजी हे कुणाचं नाव आहे केकवर ? कुणाचा केक घेऊन आलीस तू ? " संध्याचा भाऊ 'पंकज' जवळपास किंचाळलाच. हे ऐकून धावत धावत ती टी-पॉयवर ठेवलेला केक बघायला गेली. "अरेच्चा ! ब्लॅक फॉरेस्ट !! मी तर दुसरा, साधा फ्लेवर घेतला होता आणि ताईचं नाव माझ्या डोळ्यादेखत टाकून घेतलं होतं..हा तर दुसऱ्या कुणीतरी ऑर्डर केला होता. आणि आपलं ठरलं होतं ना..की छोटाच आणायचा केक कारण आपण दोघे -तिघेच आहोत. "अदलाबदल झालेली दिसतेय मग..असो पण फ्लेवर तर ताईच्या आवडीचा मिळालाय." तो हसत म्हणाला.
आता नेमकी चूक झाली कुठे ? हे ती आठवू लागली .ताईचा वाढदिवस आहे म्हणून आज वेळेत ऑफिसमधून निघाली होती. संध्याकाळी घरीच पावभाजी करायची आणि जाताना पेस्ट्री किंवा केक न्यायचा हा बेत पक्का होता. बर्थडे सेलिब्रेशनचा विचार केला तर माणसं दोन प्रकारची असतात. पहिली- जी केकची किंमत, फ्लेवर याबाबतीत प्रचंड चोखंदळ (particular ) असतात. आणि दुसरी- ज्यांना केकपेक्षा ते उत्सवी वातावरण, शुभेच्छांचा वर्षाव, आठवणींच्या वहीत जोडलं जाणारं अजून एक पान हे जरा जास्त आवडतं.बाकी गोष्टींबद्दल त्यांचा खास आग्रह नसतो. संध्या या दुसऱ्या प्रकारात येणारी. म्हणून तर लहानपणी केकशिवाय साजरे केलेले वाढदिवसही तिच्यासाठी तेवढेच खास आहेत.आजही केकशॉप मध्ये पोचल्यावर तिची नजर सर्वात आधी एका रांगेत मांडून ठेवलेल्या सुंदर smiling candles (मेणबत्त्यांकडे) गेली. "या ब्लॅक फॉरेस्ट ची किंमत ? "तिच्या शेजारी उभ्या असलेल्या एका स्त्रीनं विक्रेत्या मुलाला (सेल्सबॉय) विचारलं. "फक्त ३१० रुपये ! तो उत्तरला. ओके..बहुधा तिने तो नक्की (फायनल) केला. ३-४ पेस्ट्रीजपेक्षा छोटासा केकच घेऊया असं ठरवून संध्या म्हणाली - "हा कोणता फ्लेवर ?" "पिस्ता..फक्त २१० रुपये." खरं तर ब्लॅक फॉरेस्ट जास्त आवडेल तिला असं वाटून तिनं विचारलं - "ब्लॅक फॉरेस्ट एकच राहिलाय का ? " "हो मॅडम ..हा शेवटचा होता..आणि आता उशीरही झालाय सो..!" तो उत्तरला. "ठीक आहे, हा छोटाच - (पिस्ता )पॅक करा." तिनं सांगितलं. "आणि बर्थडे बॉम्ब ? " छोटासा फटाका पुढे करत त्याने विचारलं. "हो हो ..द्या तोही" म्हणत तिनं पैसे देण्यासाठी कार्ड पुढे सरकवलं. एक- दोन मिनिट प्रयत्न केल्यावर तो मुलगा म्हणाला - "मशीनचा काहीतरी प्रॉब्लेम आहे , कार्ड स्वॅप होत नाहीये. शेजारीच ATM आहे. कॅश आणाल ?" "ठीक आहे " म्हणाली खरी पण मनात -' एक दिवस घरी लवकर जावं म्हटलं तर त्यातही घोडं अडतंच..'काहीशी वैतागूनच ती ATM कडे गेली.पैसे काढून बिल दिलं. एव्हाना तिच्यासोबत उभी असलेली ती स्त्री आणि इतर ग्राहकही निघून गेले होते. काउंटरवर ठेवलेली एकमेव बॅग ज्यात तिचा केक पॅक केला होता ती घेऊन थँक्यू म्हणून ती झपाझप पावलं टाकत घराकडे निघाली.
"ओह..म्हणजे इथे चूक झाली तर ! मी पैसे काढून आणेपर्यंत एकतर त्या मुलाने चुकीची बॅग त्या स्त्रीला दिली किंवा तिने गडबडीत स्वतःच चुकीची बॅग नेली.. त्यानंतर ट्राफिक, अचानक रस्त्यात भेटलेली कॉलेजची मैत्रीण यात घरी पोचायला अजून काही मिनिटं गेली.सर्वजण घरी येता येता उशीरच झाला." दहाकडे जाणाऱ्या घड्याळाच्या काट्याकडे तिची नजर गेली. "तरीच..केक फ्रीजमध्ये ठेवताना ती मेणबत्ती बघून वाटलं होतं की ही तर मी घेतली नव्हती..मला वाटलं complementary असेल! " सगळा गुंता पंकजला सांगत ती म्हणाली." हम्म..हे सरप्राईजच कॉम्प्लिमेंटरी आहे !! तो म्हणाला. "पण बघ ना..तिनं घरी बॉक्स उघडल्यावर कुणीतरी तुझ्यासारखंच किंचाळलं असेल, नाही ?यात तिचं थोडं नुकसान झालंय. तिनं मोजलेल्या पैशांपेक्षा कमी quantity आणि फ्लेवर पण वेगळा..कदाचित मूडऑफ झाला असेल तिचा अन कदाचित त्या 'प्रियांक'चाही..लवकर लक्षात आलं असतं तर परत नेऊन तरी दिला असता ..ती हळहळली. "असू दे गं..दोन्हीकडे केक तर आहे ना सेलिब्रेशनला ? "पण तो बर्थडे बॉम्ब गेला ना तिच्याकडे "संध्याच्या रडवेल्या वाक्यावर एकच हशा पिकला. केकवर लिहिलेली 'प्रियांक' नावाची स्ट्रीप तिनं पलटवली तर त्यावर 'प्रियांका' लिहिलेलं होतं. अर्थात स्पेलिंगच्या चुकीमुळे स्ट्रिपच्या दोन्ही बाजू वापरल्या गेल्या होत्या. आणि एवढा खटाटोप होऊनही केक काही त्या 'प्रियांक'कडे पोचला नव्हता. स्ट्रीपभोवतीचं चॉकलेट तिच्यावर भुरभुरून तात्पुरतं ते नाव अदृश्य करून पंकजने आपली कल्पकता दाखवून दिली आणि उत्सवमूर्तीने एकदाचा केक कापला.
सेलिब्रेशन मस्त झालं. पण अजूनही तिच्या मनात त्या स्त्रीचा विचार घोळत होता. तिने परत केला असेल का तो केक ? मग..दुकानदाराला पैसे परत करावे लागले असतील तिला..की आपल्यासारखाच स्वीकारला असेल तिने ? केकशॉप, ती स्त्री आणि संध्या.. ८०-९० रुपये फार गौण होते तिघांसाठीही .पण त्या स्त्रीचं थोडं नुकसान आणि त्याहीपेक्षा तिला करावं लागलेलं कॉम्प्रोमाइझ (compromise ) याची टोचणी संध्याच्या मनाला लागून राहिली होती . स्वतःची चूक नसतानाही केक खाताना उगाच लाभार्थी झाल्याची भावना तिला बहुधा खटकत होती.
दुसऱ्या दिवशी सकाळीच तिनं केकशॉप गाठलं. कालचा सेल्सबॉय सकाळच्या शिफ्टला नव्हता. दुकानमालकाला तिनं झालेला घोळ सांगितला. आणि राहिलेले पैसे दिले. माझ्याआधी कुणी स्त्री अशी तक्रार घेऊन आली का ? तिला पैसे refund झाले का ? या तिच्या प्रश्नांची उत्तरं दुकानमालकाकडेही नव्हती. "मी विचारेल त्या मुलाला आणि असं झालं असेल तर पैसे जरूर परत करीन त्यांना." ते म्हणाले. लगेच त्या मुलाशी संपर्क करून या गोष्टीची खातरजमा करून घेण्यापेक्षा आपलं संभाव्य नुकसान भरून घेण्याची तत्परता त्यांच्या बोलण्यात जाणवून..'कुणी विचारायला आलं नाही तर यांचाच फायदा व्हायचा' असा विचार क्षणभर तिच्या मनात डोकावला. पण तेवढ्यात "खरं तर केक मिळाला ना ? हा विचार करून कदाचित कुणी आलंही नसतं पण तुझा थोडा फायदा होऊनही तू आलीस हेच खूप आहे. थँक्स हा !" हे दुकानमालकाच्या तोंडून ऐकून तिला बरं वाटलं. ती स्त्री तक्रार घेऊन आलीच तर तिला तिचे पैसे मिळतील अशी सोय तर तिने केली होती. घरी आल्यावर कालच्या उरलेल्या केकवर यथेच्छ ताव मारला. "घे, घे, कॉम्पलेमेंटरी नाही बरं का काही..आपलाच आहे..अक्क्खा ! " पंकजच्या डोक्यात टपली मारत ती म्हणाली.
आयुष्यही असंच असतं , नाही ? बरेचदा समोर बरे-वाईट सरप्राईज येतात. कधी अनपेक्षितपणे असा आवडता फ्लेवर समोर येतो..तर कधी..त्या स्त्रीसारखं कॉम्प्रोमाईज. तुम्ही, मी, कुणीही..हातून चुका होणार. कधीकधी काही चुका त्याच वेळी दुरुस्त करायची संधीही मिळणार नाही पण त्या दुरुस्त करायचा प्रयत्न करायलाच हवा..आणि हे सगळं करताना ..त्या त्या वेळी आयुष्य साजरं करायला मात्र विसरू नये ! शेवटी वस्तूंपेक्षा आपल्या जवळची माणसे आणि भावनाच आपल्याला जास्त सुखावतात. आयुष्य केकसारखं असेल तर ही सुखं म्हणजे - त्यावरची Icing. (आइसिंग) आणि काल काहीसं हरवलेलं आणि आज संध्याला परत मिळालेलं समाधान म्हणजे - चेरी ऑन द केक..! (Cherry on the Cake !). टेबलवर हसत बसलेल्या smiling candle कडे बघून ती गोड हसली...!
-©अमिता अशोक पाटील.
Note - cherry on the cake - एखाद्या सुंदर गोष्टीला अजून सुंदरता किंवा पूर्णत्व देणारी गोष्ट (thing which give finishing touch to add beauty in something which is already beautiful )

No comments:
Post a Comment