Actor of all seasons अशी ख्याती असलेले माझे खूप आवडते अभिनेते म्हणजे- ' संजीव कुमार '(मूळ नाव-हरिभाई जरीवाला). फक्त हिरोच्या भूमिकेतच अडकून न पडता त्याबरोबरच विनोदी,चरित्रभूमिका आणि खास करून आपल्या खऱ्या वयापेक्षा खूप जास्त वय असलेल्या भूमिकाही अत्यंत ताकदीने उभ्या करण्यात त्यांचा हातखंडा होता. ऐन तरुणपणात आपल्यापेक्षा फक्त ४-५ वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्यांच्या वडिलांच्या भूमिका साकारण्यातही त्यांनी संकोच केला नाही. काही ठिकाणी भूमिकेची लांबी (length) कमी असेल पण त्यांच्या नैसर्गिक अभिनयात खोली (depth) मात्र नेहमी तीच होती आणि म्हणूनच समीक्षक आणि प्रेक्षकांना तो (अभिनय )नेहमी भावला. त्यांच्या मृत्यूनंतर (१९८५) सात-आठ वर्षांनी म्हणजे ९० च्या दशकात जन्माला आलेली आमची पिढीही या कलाकाराला आठवते ही त्यांच्या अभिनयाची जादू आहे. त्यांच्या मुलाखती, आवाज शोधायचा प्रयत्न केला . मुद्रित(print) माध्यमात काही मुलाखती आहेत पण रेडिओ किंवा दूरदर्शनवर असं त्यांच्या आवाजातलं काही ऐकायला मिळालं नाही. याचं एक कारण - त्यांचं वयाच्या ४७व्या वर्षी झालेलं निधन हेही असावं. आजचा दिवस हा संजीवकुमार साहेबांचा जन्मदिवस!
खरं तर फक्त त्यांचा अभिनय पाहण्यासाठी मी अनेक सिनेमे शोधून शोधून पहिले.(पाहत राहीन!) आणि हे करत असतानाच ७० च्या दशकातल्या एका अत्यंत सुंदर कलाकृतीची ओळख झाली त्याबद्दलच इथे लिहितेय. चित्रपटाचं नाव आहे - 'अनुभव' (१९७१).
------------------------------------------------------------------------------------------------------------------
अमर सेन(संजीव कुमार) आणि मिता सेन (तनुजा)हे एक जोडपं.अमर एका चांगल्या दैनिकाचा एडिटर (संपादक). देखणा,खूप हुशार, नेहमी कामात मग्न असलेला ,उदार (generous) आणि समाजातही चांगली प्रतिष्ठा असलेला असा. त्याचं त्याच्या बायकोवर प्रेम आहे पण तिला देण्यासाठी त्याच्याकडे कमी वेळ आहे.इतका की..अजून त्यांनी फॅमिली सुरु करण्याचा विचारही केलेला नाहीये. गाडी, बंगला, दिमतीला ५-६ नोकर-चाकर हे सगळं असूनही मिताला हल्ली एक रितेपणा वाटतोय.यांत्रिक झालेल्या आयुष्याचा कंटाळा येऊ लागलाय.लग्नाच्या सहाव्या वाढदिवसाच्या पार्टीनंतर तिला वाटतं- की मला एक कुटुंब हवंय.नुसतं एखाद्या हॉटेलसारखं सुसज्ज असं घर नाही, तर.. माणसांना एकमेकांची आणि घराची ओढ वाटावी असं - 'घर' मला हवंय.ती ठरवून घराची सूत्र स्वतःकडे घेते. सर्व नोकरांना दोन महिन्याचे पगार करून दुसरं काम बघा असं सांगून निरोप देते. पण एक खूप जुना आणि स्वामिनिष्ठ नोकर जो अमरच्या लहानपणापासून इथं काम करतोय तो (ए. के. हंगल) हट्टाने घरात राहतो. मिताही त्याला परवानगी देते. घरी आल्यावर अमर विचारतो हे सगळं कशासाठी? मिता एक खूप हृदयस्पर्शी प्रश्न विचारते -"अमर, उद्या जर मी या जगात नसले तर तुला काही फरक पडेल? की माझ्यावाचून तुझं काहीच अडणार नाही ?कदाचित नाही अडणार काही " अमर न बोलता तिला जवळ घेतो.अमरचा चेहऱ्यावर क्षणात काळजी, क्षणात प्रेम आणि त्याच क्षणात स्वतःला प्रश्न विचारणारे भाव इतक्या सुरेख पद्धतीने आणलेत संजीव कुमारांनी की बास !! त्या दिवसापासून मिता स्वयंपाक आणि घर स्वतः बघते. अमरसाठी छोटी छोटी काम करताना ती एन्जॉय करते आणि अमरही !
आणि त्याच वेळी त्यांच्या आयुष्यात येतो तिसरा माणूस- जो मिताच्या पूर्वायुष्याचा भाग आहे. जवळचा मित्र किंवा कदाचित मैत्रीच्या पलीकडे असलेला कुणीतरी पण आता पूर्णपणे तिच्या भूतकाळात जमा झालेला. ज्याचं नाव आहे 'शशी' जो अमरच्याच ऑफिसात रुजू होतो .त्याची पेपरमध्ये लेख लिहिण्याची शैली आणि टॅलेंट हे अमरला आवडते.मिता आणि शशीच्या पूर्वायुष्यातील मैत्रीबद्दल अनभिज्ञ असलेला अमर त्याला एका मित्रासारखंच वागवतो. एक दिवस मिता पावसात एक खूप सुंदर गाणं अमरसाठी गाते..आणि आपल्या बायकोला इतकं छान गाता येतं हेही आपल्याला इतके दिवस माहित नव्हतं? आपण मिस केलं खूप..आणि कौतुकमिश्रित भाव अमरचे आहेत.गाण्याचे बोल आहेत "मुझे जान ना कहो मेरी जान.." गुलज़ार साहेबांचे जादुई शब्द, कनू रॉय यांचं प्रसंगाला साजेसं सौम्य, मधुर संगीत आणि गीता दत्त यांचा अद्वितीय (unique),गोड, कमालीचा सुरेल आवाज आणि कलाकारांचा प्रत्येक ओळीला न्याय देणारा अप्रतिम भावस्पर्शी अभिनय.. (गाण्यात खास करून तनुजाजींचा.. कारण गीता दत्त यांच्या आवाजाला निभावणं हे कौशल्याचं काम आहे !) एकदा ऐकल्यावर पुन्हा पुन्हा ओठांवर येणारं हे गाणं या चित्रपटाला चार चांद लावणारी गोष्ट आहे.७० चं दशक असल्याने नंतरच्या काळात सहजपणे दिली जाणारी दृश्ये (intimate scenes)नसूनही रोमँटिक..जितकं श्रवणीय तितकंच बघायलाही सुंदर आहे.
एका किरकोळ आजारपणाचं निमित्त होऊन अमर काही दिवसांची रजा घेऊन घरी राहतो. मिता ज्या पद्धतीने घर सांभाळते, त्याचीही काळजी घेते.. नेहमीच्या व्यस्त वेळापत्रकात कधी नोटीस न केलेलं
तिचं हेही रूप त्याला खूप आवडतं..पूर्वीपेक्षा तो जास्त गुंतत जातो तिच्यात. तीही खुश असते. आता सगळं कसं छान चाललंय असं आपल्याला वाटत असतानाच शशी आणि मिता एकमेकांना पूर्वीपासून जवळून ओळखतात ही गोष्ट अमरला माहित होते आणि मग सुरु होतो संशय. अमरच्या मनात असलेले प्रश्न खूप असूनही कसे विचारावेत हे त्याला कळत नाही. नवऱ्याशी खूप प्रामाणिक असलेली मिता पुढाकार घेऊन संवाद साधते. या टप्प्यावर अमर- मिता आणि अमर- शशी यांच्या संवादांची ५-१० मिनिटांचीच छोटी छोटी दृश्य आहेत..ज्यात सगळी किल्मिषं दूर होतात..पाण्यात खडा टाकल्यानं गढूळ झालेलं पाणी जरा वेळाने पुन्हा स्थिर होतं अगदी तसंच..यात कुठेही अतिरंजितपणा, मेलोड्रामा नाही हेच या चित्रपटाचं वेगळेपण आहे. अमर आणि शशी यांचं प्रोफेशनल आणि मैत्रीचं नातं, मिता-अमर यांचं नातं दोन्हीही अबाधित राहत खूप सुखद नोटवर कथा संपते.न बोलताही त्याच्या किंवा तिच्या मनातली गोष्ट समजते तेव्हा पती-पत्नीचं नातं जास्त प्रगल्भ झालेलं असतं आणि ते तसं असायला हवं. या जोडीचं पुढचं वैवाहिक आयुष्य खूप सुंदर असणार आहे कारण हा अनुभव त्यांचं नातं पूर्वीपेक्षा खूप समृद्ध आणि मजबूत करून गेलाय याची जाणीव प्रेक्षकांना होते.
यातले संवादही छान आहेत. उत्तम आणि परिणामकारक संवाद, पात्रांचे बदलत जाणारे भाव यामुळे बऱ्याच फ्रेम्समध्ये आपणही त्यांच्यासोबत असतो..काही गोष्टी subtle(सूक्ष्म) आहेत जिथे संवादांपेक्षा हे भावच आपल्या मनात ठराविक चित्र उभं करतात आणि त्याची पडताळणी जसजशी कथा उलगडत जाते तशी होतं जाते. नोकराच्या भूमिकेत असलेल्या ए. के. हंगल साहेबांनीही या दोघांमध्ये सगळं आलबेल आहे की नाही हे पाहण्यासाठी लक्ष ठेवणं, त्यांच्यात काही ठीक नाही असं वाटून नाराज होणं, ते आनंदी असतील तर स्वतःही खुश होऊन चोरून हसणं खूप लीलया पार पाडलंय.शशीच्या भूमिकेत असलेल्या दिनेश ठाकूर यांचं कामही परफेक्ट. अत्यंत तरल, सहजपणे खूप काही सांगून जाणारी अशी ही सुंदर कलाकृती आहे. अभिनेत्री तनुजा यांनी एका मुलाखतीत या चित्रपटाचं शूटिंग आम्ही जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा माझ्या फ्लॅटमध्ये पूर्ण केलं होतं असा उल्लेख केला होता. youtube वर चित्रपट उपलब्ध आहे. सिनेमा ब्लॅक अँड व्हाईट असला तरी खूप कलरफुल अनुभव देणारा आहे यात शंका नाही.
चित्रपट(हिंदी) - अनुभव (1971)
लेखक व दिग्दर्शक - बासू भट्टाचार्य
कलाकार - संजीव कुमार, तनुजा
दिनेश ठाकूर
ए.के. हंगल
#Remembering immensely talented, versatile, legendary actor "संजीवकुमार" (हरिहर जरीवाला) on his birth anniversary..(9July1938 - 6Nov 1985)
#AnActorOfAllSeasons❤️💎
-©अमिता



No comments:
Post a Comment