धापा टाकतच ती बसमध्ये शिरली. बाहेर उन्हाचा वाढणारा पारा, वेळेत कामावर जायच्या घाईत जागा आहे, नाहीये याचा विचार न करता पटापट मिळेल त्या जागी बसलेली, उभी राहिलेली अनेक माणसं. घाई-घाईत अशा बसमागे धावणाऱ्या, सर्व शक्तीनिशी धावत जाऊन बस पकडणाऱ्या माणसांमध्ये मी अनेकदा स्वतःला पाहते. तो/ती कमी प्रयत्नात यशस्वी झाली तर आपसूकच बरं वाटतं.कारण अनेक वेळी मीही नेमक्या याच परिस्थितीत असते. क्वचित कधीकधी बस कंडक्टर, चालकांनी आपल्याला पळत येताना पाहून काही क्षण गाडी थांबवली किंवा वेग कमी केलाय हेही कळतं. हे gestures (या कृती) छोटे वाटत असले तरी सुखावून जातात, त्याही क्षणी चेहऱ्यावर स्माईल आणतात.
ती आली तशी सरळ बसच्या पायऱ्यांवर बसली, मोकळा श्वास घेतला. थोड्या वेळाने उभी राहिली. तिच्यालगतच्या खांबाला टेकून मीही उभी होते. नकळत एकमेकींशी हसलो. कंडक्टर म्हणाले- " ताई..फार पळत आलीयेस तू. बस जरा. पाणी पाहिजे ?" तिने मान डोलावत नकार दिला.
आयुष्याचंही असंच असतं..नाही ? जगात आजवर सुखापेक्षा दुःखाने जोडलेली माणसं जास्त असावीत असं मला वाटतं. आणि कठीण परिस्थितीत कळत-नकळत ज्यांनी एकमेकांना साथ दिली, फार काही नाही तर किमान एकमेकांना ऐकून घेतलं ते बंध जास्त अतूट असतात. समदुःखी माणसं नकळत जोडली जातात. मग त्यांचा प्रवास वेगवेगळा असेल तरी ती समान परिस्थिती, ती सहवेदना, त्यांना त्या काळापुरती का होईना एकटेपणाच्या भावनेतून बाहेर काढते आणि काळ सुसह्य होतो. म्हणून तर आपण एकाच वाटेचे प्रवासी आहोत किंवा "वी आर ऑन द सेम पेज /सेम पाथ " हे वाक्य ऐकल्यावर जरा बरं वाटतं की नाही ? आणि हे शेअरिंग त्यांना आशादायी ठेवतं. या नात्यांना कित्येकदा काही नाव नसतं पण अस्तित्व मात्र असतं. आपापलं इच्छित स्थळ (डेस्टिनेशन) आल्यावर तो सहप्रवास थांबतो किंवा कुणी एकजण मागे राहिला तर तो पुन्हा एकटा होतो किंवा खूप काही शिकलेला असतो. क्वचित काही ठिकाणी हे बंध कायम जपले जातात ही सुंदर गोष्ट! व्यक्तिपरत्वे वेगळी.
विचारांच्या तंद्रीत माझाही थांबा आला. कानात आणि मनात मन्ना डेंचे स्वर अजून घोळत होते-
"फिर कही कोई फूल खिला
चाहत ना कहो उसको...
फिर कही कोई दीप जला
मंजिल ना कहो उसको...
फिर कही कोई फूल खिला..."
#DilSe...
#PMT_Diaries
-©अमिता
(PMT - पुणे म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट)

👌👍
ReplyDelete