आपल्या डोळ्यासमोरून आपल्याला हवी असणारी बस निघून जाताना बघणं अजिबात सुखावह नसतं. १ मिनिट का होईना..मन खट्टू होतंच. परवा ऑफिसमधून घरी जाताना असंच झालं. पूर्वीच्या बसेस- ज्यांचे दरवाजे उघडे असायचे त्यात वेग कमी झाल्यास पळत जाऊन ती पकडण्याचा पर्याय असायचा. पण आमच्या मार्गात नवी इलेक्ट्रिक बस..जिचे दरवाजे बंद असतात. मग अशा वेळी गाडी सुटताना आपण ऑफिस मधून निघताना दवडलेली २-४ मिनिटं उगाच आठवत राहतात.आणि दुसऱ्या बसने अर्ध्या-पाऊण तासाच्या प्रतीक्षेनंतर दर्शन दिल्यास होणारी चिडचिड विचारायलाच नको. पण कानात गुणगुणणारे किशोरदा, रफीसाहेब,लतादीदी किंवा इतर अनेक कलाकार हा त्रागा सुसह्य करतात.असो :)
त्यानंतरचा दुसरा दिवस- ऑफिसचं काम संपवून आज मी वेळेत घरी जायला निघाले. बसस्टॉपच्या दिशेने झपझप चालणाऱ्या पावलांना एका काकूंनी मध्येच येऊन ब्रेक लावला आणि मला विचारलं - "तुम्ही कुठे काम करता ?" मी ऑफिसच्या इमारतीकडे बोट दाखवून उत्तर दिलं. "घरी किंवा ओळखीच्या ठिकाणी लहान मुलांना सांभाळायचं काम मिळेल का ? कुणाला तशी गरज असेल तर मला सांगा. मी काम शोधतेय " त्यांनी एका दमात सांगून टाकलं. " सध्या कुठे काम करता तुम्ही ?" मी विचारलं. "याच भागात राहते आणि इथल्याच काही घरांत धुणी-भांडी. पण खूप वर्षांपासून करतेय आणि आता तब्येत साथ देत नाही, म्हणून थोडं कमी धावपळीचं काम बघतेय, एखादं लहान मूल व्यवस्थित सांभाळू शकते." त्या म्हणाल्या. "मी या परिसरात राहत नाही. माझ्या घरी तर नाही पण ओळखीच्या कुणाला गरज असेल तर नक्की सांगेन." असं सांगून मी इतर काही पर्याय सुचवले.
बोलता बोलता त्यांनी सांगितलं - त्या सोलापूरच्या आहेत. घरी कोण कोण असतं विचारलं तर म्हणाल्या "मी आणि माझी मुलं -एक मुलगा आणि मुलगी." "आणि त्यांचे वडील ?" "त्याचं काय ? त्याला काही पडलेली नाही आमची.तो काय..असून नसून सारखाच. बेवडा आहे ओ.. लग्न झाल्यावर काही महिने धड राहिल्याचं आठवत नाही. तेव्हापासनं मीच ओढतेय गं. थकले आता आणि तेच तेच काम करून नको नको झालंय. पाठदुखी, कंबरदुखी सगळं मागं लागलं , म्हणून मी शोधायला लागलेय वेगळं काम." मुलांच्या बापाला दोन शिव्या घालून न राहवून त्या बोलल्या. आपल्या अस्तित्वाची आपल्या जोडीदाराला जाणीव नसणं, लग्न करताना आपल्या जोडीदाराला कायम साथ देऊ, बायकोची जबाबदारी घेऊ ही घेतलेली वचनं रोज मोडताना पाहणं याचं दुःख काय असतं हे त्यातून गेलेल्या स्त्रियांनाच माहीत. व्यसनापायी पांगळे झालेले असे कित्येक संसार पाहिले आजवर. चांगल्या माणसांची मती आणि कॉमन सेन्स हलवणाऱ्या 'दारू' या गोष्टीचा मला यामुळेच तिरस्कार आहे ,अगदी लहानपणापासून. अशा अनेक निरुद्योगी माणसांच्या संसाराचा गाडा एकहाती ओढलाय अनेक माऊल्यांनी..केवळ आपल्या मुलांसाठी. का कुणास ठाऊक...लग्नासाठी स्थळांना भेटताना सांगाव्या लागणाऱ्या अपेक्षांमध्ये 'निर्व्यसनी माणूस' ही अपेक्षा सांगितल्यावर कपाळावर आठ्या आणणारे, क्वचित हसणारे, किंवा २०२३ मध्ये हा काय मागासलेपणा असं सुचवणारे काही चेहरे मला आठवले.
काही वेळ त्या बोलत होत्या, मी ऐकत होते. "काय शिकलीस गं तू? आणि कधीपासून काम करते?" "इंजिनिअरिंगची पदवी घेतली नंतर जॉब." म्हणत मी माझ्याविषयी थोडं सांगितलं. इतका वेळ मला न्याहाळत असताना त्यांना आपली मुलगी दिसत होती हे कळलं होतं. "माझी मुलगी हुशार आणि मेहनती आहे गं. तिलाही लागेल ना नोकरी ? " मी उत्तरले - "का नाही ? तुम्ही शिकवा तिला, किमान पदवीधर करा. कितवीत आहे ?" "दहावीची परीक्षा देतेय, चांगले जातायेत पेपर. शिकवायचंय मला तिला.आणि ती करणार काही ना काही, विश्वास आहे मला. " त्यांच्या डोळ्यात एक चमक होती. पुढच्याच क्षणी चिंतेने म्हणाल्या - "खरं पोरगा लई ताप देतोय, पोरीपेक्षा मोठा आहे पण बापाच्या वळणावरच जातोय का काय असं वाटतं. शाळा सोडली आणि अजूनही त्याचा मला काही हातभार नाही." मुलीला त्यांच्या कष्टाची जाणीव आहे हे प्रत्येक वाक्यात जाणवत होतं. परिस्थितीचे चटके एकवेळ ठीक पण त्या बरोबरच व्यसनी बापाच्या चुकांपायी होरपळून निघालेलं बालपण अनुभवलं तर त्यातून दोन टोकाची व्यक्तिमत्व घडतात. एक - लहानपणीच जबाबदारी आल्यामुळे मनाने लवकर प्रौढ आणि जबाबदार झालेली मुलं, आणि दुसरी - त्या वाईट गोष्टींमध्येच हरवून आयुष्य वाया घालणारी. "हीच वेळ आहे. त्याला नीट समजावून सांगा, गरज पडली तर खडसावून. त्याच्या जबाबदारीची जाणीव करून द्या, छोटं-मोठं मिळेल ते काम प्रामाणिकपणे करू द्या पण व्यसन नका लागू देऊ." मी सांगत होते. त्यांनी होकार दिला.
२५६...बसचा नंबर मला लांबूनच दिसला पण आमचं बोलणं संपलं नव्हतं. "ताई, तू एखादे दिवशी माझ्या मुलीशी बोलशील ? माझा नंबर घेऊन ठेव." म्हणत त्यांनी मोबाईल नंबर ची देवाणघेवाण केली. एकमेकींचा निरोप घेऊन आम्ही आपापल्या दिशेने वळलो. काल हुकलेली बस आज दिसूनही मी मुद्दाम सोडली होती पण तरी आज त्याचा खेद नव्हता. त्या त्या वेळी मनात असलेल्या भावना एकसारख्या परिस्थितीचेही संदर्भ बदलून टाकतात. अंधारलेल्या वाटांवर मोठ्या हिमतीनं चालणाऱ्या आणि मुलीच्या रूपात भेटलेल्या पणतीला तेवत ठेवत प्रकाशाचं स्वप्न पाहणाऱ्या त्या आईशी बोलणं अर्धवट सोडून गेले असते तर लवकर पोचूनही टोचत राहिली असती ती गोष्ट. क्षणभर मन हलकं करून कुणाला बरं वाटत असेल तर ऐकण्यासाठी कान नक्कीच देऊ शकतो आपण.
जन्मभराची साथ देणाऱ्या जोडीदाराला चांगल्या सहजीवनाऐवजी फक्त त्या नात्याचं ओझं सांभाळायला भाग पाडणाऱ्या नालायक जोडीदारांसारखं कुणीच..कधीच होऊ नये. असं करून त्यांना आपसूक मिळणारा आदर आणि प्रेम ते स्वतः गमावतात. त्या काकू आणि अशा अनेकींच्या डोळ्यांतली व्यथा तमाम बेवड्यांना वाचता आली आणि कळली तर किती बरं होईल. नाही का ?
#PMT_Diaries
-©अमिता
(PMT - पुणे म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट)
No comments:
Post a Comment