Monday, 25 February 2019

उर्मिला...


रामायणातली अनेक पात्र अद्वितीय आणि महान आहेत. 'रघुकुल रीति सदा चली आयी, प्राण जाई पर वचन न जाई..' हे पाळण्यासाठी राजसिंहासन सोडून वनवासात जाणारे प्रभू श्रीरामचंद्र, त्यांना साथ देणारी सीतामाई, ज्यांच्यासाठी हे केलं पण त्याने सर्वात जास्त दुःखी होणारे , व्याकुळ होऊन सेवकासारखा १४ वर्ष राज्यकारभार चालवणारे प्रिय बंधू ..भरत. अधर्माची साथ द्यायची नाही म्हणून भावाच्या विरुद्ध लढणारा बिभीषण, पतीला वारंवार सावध करणारी रावणाची पत्नी - मंदोदरी, स्वामीनिष्ठेचे आदर्श हनुमंतराय,  बंधुप्रेमाखातर व कर्तव्यासाठी कोणीही सक्ती न करताही राजसुखाचा त्याग करणारे रामचंद्रांचे बंधू लक्ष्मण, आणि..आपल्या तारुण्यातली काही वर्ष यासाठी समर्पित करणारी लक्ष्मणाची पत्नी  - उर्मिला!
   रामायणातलं उर्मिला हे पात्र मला खूप उत्कट वाटतं..पण या पात्रावर फार लिहिलं गेलं नाहीये. लक्ष्मण-उर्मिलेचं प्रेम, समर्पण, विरह ,विश्वास हे सगळं ४-५ ओळींच्या कवितेतून मांडणं हे अवघड  त्या पात्राला न्याय देण्यासारखंही नाही. उर्मिलेवर १-२ हिंदी कविता वाचल्या. मराठीत कवी ग्रेस यांची १ कविता आहे असं ऐकलं पण अद्याप माझ्या वाचनात आली नाही .मला समजलेली उर्मिला मांडण्याचा प्रयत्न केलाय. दीर्घ कविता किंवा गीत तिच्यावर ऐकलं नाही..चित्रित झालेलं पाहिलं नाही. कधीतरी या महान पात्राचं जीवन शब्दांत उतरवता यावं असं खूप वर्षांपासून वाटत होतं. आज ती इच्छा पूर्ण झालीय. प्रयत्न तरी करू शकलेय. जसा असेल तो प्रयत्न सविनय ...,

#उर्मिलेच्या चरणी समर्पित...
#Dedicated_To_Urmila

Sketch Credit- ' नम्रता पाटील '

या रचनेसाठी समर्पक असं चित्र रेखाटलंय - माझी ताई - नम्रता पाटील हिने.
Thanks a lot for Superb superb sketch tai !!! you did it ! !😊

*******************************************************************************

                             उर्मिला...

तुम्ही प्रवासी कुण्या वाटेचा,
मी त्राण तुम्हा पाऊली व्हावे
उन्हे वाटून घेण्यासाठी
वाटे तुमची साऊली व्हावे...

ओघळू देणार नाही
थिजवला पूर आसवांचा नेत्री
वाहणे विसरले आहे
जल शरयूच्या पात्री

टोचती तलम राजवस्त्रे
होता वल्कलांचे ध्यान
सुखे गेली वनवासा..
अन..अयोध्या झाली रान...
कर्णफुले पाहताना रोज
आठवते माझी जानकीताई,
कोमल त्या पावलांना जपाल ना..
तुम्ही आणिक रघुराई ?
विखारी शर तसे,
ते निरोपाचे क्षण,
जपण्या 'भाता' व्हावे..माझे दुबळे मन...

आपण नसता शृंगारास,
पाहतील का दर्पण
महालाचे गवाक्षही पुसती,
"कधी येणार सुमित्रानंदन?"
एके रात्री शय्या..विचारती झाली मजला
नाथांनी त्यागली निद्रा..ठावे का तुजला?
स्वप्नीही त्यांच्या येणार नाही..इतकी का तू अभागी ?
कर्तव्याच्या आड न येता,
त्या लोचनांत मी सदैव जागी !
जगावेगळा परि मान्य..नियतीचा हा सौदा,
तुमच्या त्यागयज्ञापुढती ,
कमीच माझ्या समिधा - 'चौदा'

भाग्यवान तुम्ही किती..
चुडा म्हणतो रोज या हातांना
यांना स्पर्शून वदला आपण..
"उर्मिले, जप हो साऱ्या मातांना"
साक्षात रघुवीर सोबती असता,
कसली चिंता आर्या ?
कर्तव्यपालनातही अनुकरेल
'रामानुजांस' ही भार्या...


हे बंधुप्रेम, ही  वचनपूर्तीची रीत,
प्रेमात भिजलेले हे त्यागाचे गीत,
कोणी काय अन किती किती घ्यावे ?
मी पायरी..मी पायरी..
रघुकुलाच्या राउळी व्हावे ...

सुकल्या या पाकळ्यांचे
अत्तर अत्तर होईल
मी प्रश्नचिन्ह जणू ..
यथावकाश माझे उत्तर उत्तर येईल...
भाळीचे कुंकू तैसे,
प्रतिबिंब तुमचे जवळी निरंतर,
प्रीत गहिरी-गहिरी होते,
स्मरता तुमच्या-माझ्यातले अंतर...

विणले तमाचे जाळे जयाने
प्रकाश त्यानेच निर्मिला,
गवाक्षांनाही कळून चुकलेय,
श्वासापरी 'विश्वासावर' जगते,
ही - 'लक्ष्मणाची उर्मिला...!'

                                   
- ©️अमिता अशोक पाटील .
                                         copyright 2019 -20 All rights are reserved 
#उर्मिलेच्या चरणी समर्पित...
#Dedicated_To_Urmila


टीप/Note :
१.नेत्र=लोचन= डोळे /eyes
२.तलम- मऊ/soft
३.वल्कले- झाडांच्या सालीपासून बनवलेल वस्त्र, अथवा वस्त्रासारखी गुंडाळलेली झाडांची साल 
४.विखारी- विषारी, शर- बाण
५.भाता - बाण ठेवण्यासाठी वापरले जाणारे साधन  / quiver(container which
is used to hold arrows)
६. गवाक्ष - खिडकी/झरोका/ - Window
७ . शय्या- अंथरूण/गादी/शेज/bed
८ .समिधा- आहुती (यज्ञात देण्यात येणारी)
९. आर्य - वीर
१०. भार्या- कांता/पत्नी/बायको/wife
११ . रामानुज= रामाचा (भगवान श्रीरामांचा )
अनुज (लहान भाऊ)= लक्ष्मण (younger brother of Lord 'Ram')
१२ . राऊळ - मंदिर/temple
१३. भाळ - कपाळ/ forehead
१४ . तम - अंधार/Dark

१५ . उर्मिला- लक्ष्मणाची पत्नी 
   

1 comment: