Sunday, 7 April 2019

#PMT_Diaries_1


    
 " ७.४५..आज जरा जास्तच उशीर..काही खरं नाही..ताईसाहेब आरतीचं ताट घेऊनच तयार असतील आज.."सिटीबसला हात  दाखवत ती स्वतःशीच पुटपुटली. काही तास बंद असलेला मोबाईलडेटा सुरु करून खिडकीची सीट बघून ती बसली .बाहेरचा अंधार, कानाला हेडफोन लावून आवडीची गाणी आणि मेसेजेसवर नजर टाकणे या अर्थाने हा  तिचा एकटीचा स्वतःचा वेळ असतो. नेहमीच्या प्रवाशांना शक्यतो रोज पास दाखवण्याची गरज नसते या रोजच्या अनुभवाने कंडक्टरच्या प्रश्नार्थी नजरेला उत्तरादाखल - "पास..!" म्हणून ती स्थिरावली. तिच्या गळ्यात अडकवलेल्या कंपनीच्या आयकार्डकडे कटाक्ष टाकत  "पाहू पास.." म्हणत तो जवळ आला. एका हाताने बसचा पास दाखवत गळ्यातलं I-card आता तिनं काढून बॅगेत ठेवलं. बसमध्ये गर्दी फार नव्हतीच. पास पाहून झाल्यावरही कंडक्टर तिथेच घुटमळत होता. यांना काहीतरी विचारायचंय का ? असं वाटून तिने हेडफोन काढले. 
          "IT त काम करता? " तो विचारता झाला.. "हो." कोणती कंपनी?" "अमुक अमुक"  "उशीर होतो तुम्हाला..आमची PMT मिळते का वेळेत?" त्यानं हसत विचारलं. "कधीकधी पाहावी लागते वाट, वेळा अनिश्चित असतात, घर लांब आहे त्यामुळे मला हा पर्याय योग्य आहे." "माझं लहानपणापासून एक स्वप्न होतं, कॉम्प्युटर माहीत झाल्यापासून..की अशाच एखाद्या ऑफिसात जॉब असावा. माझे काही मित्र आणि तुमच्यासारख्यांच्या गळ्यात अशी आयकार्ड्स दिसतात ना, तेव्हा तिकिटं फाडतानाही मी स्तब्ध होतो, भूतकाळात जातो" कुठेतरी हरवत तो उद्गारला. साधारण तिशीच्या आतला तो तरुण कंडक्टर- बोलण्यातून सुशिक्षित. "ग्रॅज्युएशन कशात केलंय ?" तिनं विचारलं. "बीए. डी.एड. झालंय.परिस्थितीमुळे बारावी सायन्सकडून इकडे मोर्चा वळवला.आणि स्वप्न ते स्वप्नच राहिलं. मी लातूरकडचा -रेड्डी समाजाचा..३ बहिणींच्या लग्नात प्रत्येकी ७-८ लाख हुंडा. वडील शेतकरी. माझ्या या नोकरीमुळे घरात स्थिरता आहे. 
  काहीतरी  आठवत ती म्हणाली-   "हम्म..शिक्षक भरतीची अवस्था कित्येक वर्षांपासून काय आहे हे माहित आहे मला..तरीही..इकडेही सगळं सहज नाहीच. आमच्यासारखे कित्येक अभियंतेही सुरुवातीला फ्री,कधी तुटपुंज्या पगारावर काम करत, अनुभव मिळवत पुढे येतात. अगदी लायकी असूनही. त्यात सगळ्या नसल्या तरी काही fake  कन्सल्टन्सीज वगैरे आहेतच.पण या २-३ वर्षांत मी हेच शिकले की, समोर जे आहे त्यातून मार्ग काढायचा, स्वतःशीच तुलना करून एकेक पायरी पुढे जात राहायचं.लगेच जॅकपॉट नाही मिळणार कदाचित..कदाचित आपला मार्ग जरा खडतर असेल इतकंच.  हे इतकं मनाशी ठरवलं तेव्हा आताची परिस्थिती आहे.आणि अजूनही सुधारणा चालू आहेत. तोवर ज्या कामानं आपल्याला स्थिरता देण्यात मदत केली  त्याच्याविषयीही कृतज्ञता वाटते. शेवटी, हे सगळे अनुभव आपल्याला शिकवतातच. नाही का ?"
    "हो, अगदी ." बोलण्याला दाद देत तो उत्तरला. "तुमच्या क्षमता पूर्णपणे वापरता येतील असं काम तुम्ही शोधत असाल..हो ना ?" "होय स्पर्धा परीक्षा दिल्यात, देतोय .सुरुवातीला यशाच्या जवळही गेलोय पण नंतर मला नोकरी करणं फार गरजेचं होतं. पण अजूनही प्रयत्न चालू आहेत.या नोकरीनंतर मिळेल तेवढा वेळ अभ्यास करतो. बघू. वेळेनुसार काही निर्णय घ्यावा लागेल. सध्या छोटा बिजनेस करायचा विचारआहे.
त्याचे डोळे विश्वासाने चमकले. "नक्की मिळेल तुम्हाला हवं तसं काम!" ती म्हणाली.
       "thanks!एक विचारू? खूप लोक भेटतात रोज. काहींच्या..खासकरून तुमच्यासारख्यांच्या नजरेत एक वेगळा भाव पाहायला मिळतो अन त्या अपुऱ्या स्वप्नाची गोष्ट मनाला जास्त टोचते..पण आपण गेला अर्धा तास बोलतोय." "त्यांचं मला माहीत नाही..पण एक आहे..सगळ्या प्रकारची माणसं सगळीकडेच असतात..त्याकडे दुर्लक्ष करणंच योग्य. प्रामाणिकपणे केलेलं कोणतंही काम कमी दर्जाचं नाहीच मुळी.आपल्या कामात आणि क्षमतांवर विश्वास असला की पुरे..best of luck ! "  ती उत्तरली.  
  स्वप्नांचा पाठलाग करणारी, कधीतरी आपण गेलो तशाच परिस्थितीतून जाणारी पण त्यासाठी धडपडणारी लोकं अनोळखी असूनही ओळखीची वाटू लागतात..एकमेकांना बळ देऊन जातात. त्यांना यश मिळो ही भावना आपसूकच मनात येते तेव्हा. तिनंच  कधीतरी लिहिलेलं एक वाक्य आता तिच्या मनात रुंजी घालत होतं- "एखादी गोष्ट परवडत नसेल तर माणूस जिवाची परवड करून घ्यायला  मागे पुढे पाहत नाही.मग पुढे कधीतरी , सगळी गोळाबेरीज करताना जेव्हा समाधानाची बाकी उरते तेव्हा तो मनोमन सुखावतो. परिस्थितीशी केलेला व्यवहार त्याला परवडलेला असतो बहुतेक..!" असंच  काहीसं यांच्या बाबतीत होवो असं मनोमन म्हणत थांबा(स्टॉप) येताच ती उतरली..अन पुढच्या बसची वाट पाहत उभी राहिली.
      दोन वेगवेगळ्या स्वप्नांना PMT दोन वेगवेगळ्या दिशांना घेऊन गेली.अर्थात-विसाव्यासाठी.. पुन्हा उद्याच्या प्रवासासाठी तयार व्हायला !  
#PMT_Diaries...
                                                                                      -अमिता.

[मुंबई ची lifeline अर्थात जीवनवाहिनी म्हणजे- लोकल.तशीच सामान्य वर्गाला जवळची वाटणारी आणि परवडणारी इतर शहरातली- सिटी बस. पुण्यात- PMT. कितीतरी स्वप्नं, प्रयत्न, तिच्या माध्यमातून प्रवास करत असतात. ती हसतात, बोलतात, रडतात अन मानवी स्वभावगुणांनुसार भांडतातही! प्रवास मग तो छोटा असो की मोठा त्याचाही आनंद असतोच. खूपदा काही गोष्टी इथे नव्याने पाहायला मिळतात , शिकायला मिळतात, काही ओळखी होतात ,काही जपल्या जातात, काही मनात कोरल्या जातात,काही विस्मरणातही जातात.काही गोष्टी draft ही इथेच होतात.या प्रवासासाठी २ ओळी मला कायम सार्थ वाटतात- 
      राहों-से जोडे तार जिसने 
      उसका  जीवन जलसा हो गया..
      मंजिल तो हर कोई चाहता है 
      पर राहों को बनाया 'यार' जिसने ,
      उसे जीना आ गया... !                                                                         ]                                                                 

2 comments: