Monday, 23 September 2024

शंभू.. कैलासीचा राजा...

            


     रेवलकरवाडी...सातारा जिल्ह्यात खटाव तालुक्यात डोंगराच्या कुशीत वसलेलं एक छोटं गाव. माझ्या सासूबाईंचं माहेर आणि अभिजीतचं (अहोंचं) आजोळ. आमच्या लग्नानंतर एक-दोनदा धावती भेट झाली या गावाला पण यावेळी निवांत राहता आलं. गावात काळूबाईचं एक मंदिर आहे, जिथे यात्रेला गर्दी असते. मनात मराठवाडा-खान्देश घेऊन आलेल्या आपल्या बायकोला आपल्या भागात (पश्चिम महाराष्ट्रात )तिला ओळखीच्या, आपल्या वाटतील अशा गोष्टी, असे परिसर दाखवण्यासाठी पतीदेव कायम प्रयत्नात असतात. तुला पुढच्या वेळी रामाच्या डोंगरावर नक्की नेणार..तिथं शंकराचं मंदिर आहे.तुला नक्की आवडेल..हे वाक्य मी त्यांच्याकडून काही महिन्यांपासून ऐकत होते. अनंत रूपांमध्ये एकच देव वसतो असं सगळ्याच आस्तिकांना वाटतं. पण तरीही आपण एखाद्या रूपाच्या जास्त प्रेमात असतो. श्रीकृष्णाच्या मंदिरात भावतो तो शृंगार..एकीकडे गीतेच्या  खोल ज्ञानाबरोबर दुसरीकडे  बासरी, मोरपीस, खेळ, या गोष्टी मनाला मोहून घेतात. तशी मला कुठल्याही शिवमंदिरात असलेली शांतता भयाण शांतता नव्हे..चित्ताला खूप सुखद शांतता देणारी अनुभूती (आजच्या भाषेत म्हणूयात- vibe ) खूप आवडते.  आणि तिथे असलेला एक नैसर्गिक साधेपणा..शंकराच्या आवडीच्या फुला-पानांमध्येही हा  झळकतो.गढूळ पाण्यात तुरटी  फिरवल्यावर  सगळा गाळ तळाशी जाऊन नितळ पाणी दिसावं तसं  मनातली सैरभैर आंदोलनं तळाशी जाऊन स्थिरतेकडे मन आपोआप झुकलं जातं. 

         ठरल्याप्रमाणे आम्ही गावातून मंदिरात जाण्यासाठी निघालो. गावातून दोनेक किलोमीटरचं अंतर. बाईकवर निघालो खरे पण मधेमधे थांबत..निसर्ग न्याहाळत, फोटो काढत वर जात होतो. रस्त्याची वळणं, चढ आणि खड्डे पाहता पायी जाणं उत्तम वाटलं. काही ठिकाणी उभे राहून एका दृष्टीक्षेपात दिसणारं गाव, तळं, पावसाने हिरवे झालेले डोंगर आणि त्यावर ऐटीत उभ्या असलेल्या अनेक पवनचक्क्या.. एकेक गोष्ट बघत बघत पुढे चाललो होतो. आम्ही ज्या मंदिरात चाललो होतो त्याचं नाव- रामेश्वर.स्थानिक लोक या जागेचा उल्लेख रामावर, रामाच्या डोंगरावर असा करतात त्यामुळे हे  राममंदिर आहे की काय असं मला पूर्वी वाटलं होतं. भगवान शिव आणि  श्रीराम हे परस्परांचे पूजक आहेत, एकमेकांचं स्मरण करतात.दक्षिण भारतात रामेश्वरम मंदिर आहे - जिथे लंकेत जाण्याआधी प्रभू श्रीरामांनी शिवलिंग स्थापून पूजा केली होती. रामाचे ईश्वर म्हणून रामेश्वर. तशीच काहीशी आख्यायिका इथली आहे. हेही शिवमंदिर आहे. फरक हा की वनवास काळात इथेही थोडा काळ श्रीरामांचे वास्तव्य होते आणि हे मंदिर स्वयंभू आहे असं सर्वांनी सांगितलं. 

      मंदिर जवळ आलं तसं लांबून दिसणाऱ्या पवनचक्क्या आता मोठ्या दिसू लागल्या. आवारात हिरवाई,अनेक झाडं. पारिजातकाच्या फुलांचा छान सडा पडला होता. काही फुलं ओंजळीत घेऊन  आम्ही मंदिरात प्रवेश केला. मुख्य गाभारा आणि प्रवेश करताच दिसलेली खोलीवजा जागा यात बरंच अंतर आहे.बाहेर दोन मोठ्या आकाराच्या नंदीमहाराजांच्या मूर्ती आहेत. उजव्या हाताला  दगडी आणि कायमस्वरूपी बांधलेलेच ५ सहाण खूप लक्षवेधी आहेत. आणि प्रत्येक सहाणेवर मोठ्या आकाराचं चंदनाचं लाकूडही ठेवलं होतं. सहाण सपाट नसून त्याला मध्ये थोडी खोलगट जागा होती ज्यात पाणीही होतं. थोडंसं चंदन उगाळून कपाळी लावताना लक्षात आलं की इथे बऱ्याच लोकांनी भेट म्हणून दिलेले बरेच आरसे सगळ्या भिंतींवर लावलेले होते. डाव्या बाजूच्या भिंतीवर श्रीरामांचा एक फोटो होता. मी त्या सहाणांजवळ घुटमळत असताना एक आवाज आला - "कोणत्या गावचं तुम्ही ?" पांढरा कुर्ता-पायजमा, पांढरी टोपी घातलेली एक सावळी मूर्ती- हसत विचारत होती. या आजोबांना डोळ्यांनी कमी दिसत होतं, आणि मोठया आवाजात दिलेली उत्तरच ऐकू येत होती. जवळ येऊन संवाद साधताना त्यांनी हातातला मोबाईल पाहिला. मला म्हणाले - याच्यात रेकॉर्ड होतं ना ? म्हटलं - "हो !" "मी अभंग म्हणतो ..याच्यात रेकॉर्ड करता का ? मला चांगलं गाता येतं. " डोळे बारीक करत प्रश्नार्थक नजरेने ते उत्तराची वाट बघत होते. त्यांचा उत्साह बघून आपसूक हो आलं ओठांवर.  "हो , हो , का नाही ? लगेच करूया. आधी आम्ही दर्शन घेऊन येतो ". मी उत्तरले. 

       सकाळची वेळ होती. श्रावण महिना, सोमवार आणि ठराविक सण यातलं काहीच नसल्याने  मंदिरात गर्दी नव्हती. आता आम्ही दुसऱ्या खोलीच्या दिशेने गेलो ज्या पुढे मुख्य गाभारा होता.  गाभारा आणि आतली खोली यात एक पायरी होती. इथे स्त्रिया गाभाऱ्याच्या बाहेरूनच दर्शन घेतात. पण आतल्या खोलीपर्यंत प्रवेश सर्वांसाठी सारखाच आहे. वेरूळच्या घृष्णेश्वराच्या मंदिरात पुरुषांना गर्भगृहात जाताना शर्ट, चामड्याच्या वस्तू काढाव्या लागतात तोच नियम इथेही नमूद केलेला होता. गाभाऱ्याच्या बाहेरूनही  शिवलिंग एकदम व्यवस्थित बघता येत होतं - फार उंच नसलेलं आणि दगडी , खालचा भाग धातूचा.   जमिनीवर/ फरशीवर छान गारवा होता. आणि उच्चारलेलल्या  शब्दांचा आवाज चांगलाच घुमत होता. 

     दर्शन करून पुन्हा बाहेरच्या मोकळ्या जागेत आलो. आजोबा आपली टोपी- कपडे नीटनेटके करून मांडी घालून बसले. कॅमेरा सुरु होताच त्यांनी एक आलाप घेतली..चेहऱ्यावर एक छान स्माईल. "हे कॅच होतंय का ?" असं माईक टेस्ट करतात तसं त्यांनी व्हिडिओ-ऑडिओ टेस्ट करून खात्री केली. " बाळकृष्ण रामचंद्र गुरव, रामेश्वर" अशी स्वतःची ओळख करून देत अभंग गायला सुरुवात केली - 

                                          "शंभू कैलासीचा राजा, 

                                           त्यासी दंडवत माझा.."  

       चेहऱ्यावर आनंद, उत्साह आणि गायनात भाव होता. गायकीपेक्षाही देव भावाचा भुकेला. नाही का ? गुरव कुटुंब बऱ्याच वर्षांपासून मंदिराच्या आवारातच राहतं. त्यांचं घरही दिसत होतं. पुन्हा त्याच उत्साहाने  त्यांनी रेकॉर्डिंग बघितलं आणि  सांगू लागले- तरुणपणी खूप गायचो आता वयोमानानुसार कमी..पण मला आवड आहे. नंतर ते त्यांच्या कामाला निघून गेले.

       परत फिरताना पुन्हा गाभाऱ्याजवळ जावं वाटलं (आतल्या खोलीत). आवाज घुमल्यानंतर पुन्हा मिळणारी ती शांतता इतकी हवीहवीशी होती की एका ओंकाराने समाधान झालं नाही. असं वाटलं - इथेच बसून रहावं. मानला तर देव सगळीकडे असतोच पण अभ्यासिकेत गेल्यावर जसं अभ्यासासाठी पूरक वातावरण अगोदरच निर्माण केलेलं असतं तसंच मंदिर परिसराचं असतं हे मला इथे जास्त पटलं. अजून काही मिनिटं ओंकार गुंजन करून बाहेर पडलो. 

      बाहेर येण्याच्या दरवाजासमोर अजून मोकळी जागा होती. तिथे तुळशीवृंदावन आणि त्या शेजारीच एक खूप छोटी, एक मोठी खूपच सुंदर दगडी पिंड- नंदीसहित, आणि गणपती बाप्पाची मूर्ती होती. त्यावर वाहिलेली पांढरी फुलं कोवळ्या उन्हात अजून खुलून दिसत होती. इथेही जीव घुटमळत होता. मंदिराभोवती पुढे एक किलोमीटरच्या परिसरात असलेल्या बऱ्याच झाडांखाली छोटी छोटी शिवलिंगं होती. जरा पुढे गेल्यावर एक वेगळी मूर्ती आहे - रंभाजीची. या रंभाजीची एक दंतकथा इथं सांगितली जाते. रंभाजी या सेवकाकडे सूर्योदय होण्यापूर्वी मंदिरात कावडीने पाणी आणून देण्याची जबाबदारी होती. हा त्याचा नित्यनेम होता. पण एक दिवस कावड आणता आणता उशीर झाला आणि सूर्याची किरणं त्याच्यावर पडली आणि त्याचा पुतळा झाला. ही दगडी मूर्ती इथे बघायला मिळते ज्यात कावड सुद्धा दिसते. खरंच या कारणामुळे की फक्त रंभाजीच्या कामाची स्मृती म्हणून इथे ही मूर्ती आहे माहीत नाही.

     सुट्ट्यांमध्ये इथे आलो की हमखास इथे येणं, बाहेरच्या हिरवळीत  बसून जेवण करणं, खेळणं हे ठरलेलं असायचं- अभिजीत एकेक आठवण सांगत होते. " मग, कसं वाटलं ? काही साम्य वाटलं की नाही इथे आणि तुमच्या गावी ?" माझ्या मंदिर आणि या गावच्या एकूण अनुभवाबद्दल ते विचारत होते. आणि तेही शाहरुखच्या ' ऐसा देस है मेरा हो.. जैसा देस है तेरा... ' या ओळी ऐकवत. (या बऱ्यापैकी अरसिक माणसाला तिथे योग्य गाण्याच्या ओळी आठवणं ही सुद्धा त्या हवेची जादू !असो. 😊 )  

         उत्तर अर्थातच होकारार्थी होतं. वेगळा प्रदेश, थोड्या वेगळ्या पद्धती, वेगळी बोली असली तरी माणसं आणि भावभावना त्याच. माणुसकी, काळजाजवळच्या गोष्टी आणि तेच भाव गवसले की बरं वाटतं. आणि खूप वेगळ्या, नवीन गोष्टी माहितीही होतात. आणि हीच तर आपल्या भारत देशाची खासियत आहे ,सुंदरता आहे. हे साम्य आणि ही भिन्नता नेहमी एन्जॉय करता यावी हीच आशा !

                                                                                   -©अमिता 


Note -

[ठिकाण - रामेश्वर मंदिर, रेवलकरवाडी

तालुका - खटाव , जिल्हा -सातारा , महाराष्ट्र ]


अभंग -

शंभू कैलासीचा राजा  !!२!!

त्यासी  दंडवत माझा !!२!!


गिरीजा शोभे मांडीवरी !!२!!

गंगा वागवितो शिरी !!२!!

अंगी भस्मा चे लेपण  !!२!!

कंठी रुद्राक्ष भूषण !!२!! त्यासी 


व्यग्र गडासनी बैसला !!२!! 

तुका म्हणे वंदू त्याला!!२!! त्यासी

शंभू कैलासीचा राजा   !!२!!

त्यासी  दंडवत माझा !!२!!































   




















 


रंभाजी 









































No comments:

Post a Comment