Monday, 23 December 2019

हिशोब...

     


       माझ्या लहानपणीची गोष्ट आहे. तेव्हा ATM  चा वापर सुरु झाला नव्हता. माझ्या पप्पांना एकदा बँकेतून काढून आणलेल्या रकमेत ५०० रुपये जास्त आले होते. त्यांनी ते लगेच कॅशिअरला दिले तेव्हा त्यांनी कौतुक आणि आश्चर्य दोन्हीही व्यक्त केलं होतं. अहमदनगरला माळीवाडा परिसरात 'विशाल गणपती मंदिर' आहे. खरेदीसाठी जाणारे बहुतेक लोक हमखास बाप्पाचं दर्शन घेऊनच पुढे जातात.एकदा तिथून दर्शन घेऊन पुढे जाताना काही हजारांचं नोटांचं पुडकं त्यांना दिसलं होतं. एका मारवाडी कुटुंबातल्या स्त्रियांच्या घोळक्यातल्या एकीच्या पाकिटातून ते पैसे पडले होते. गर्दी कमी असल्याने ते त्यांना तात्काळ पोचवता आले. रक्कम मोठी असल्याने ती परत मिळताच त्यांचं थँक्यू आणि देवाचेही परत आभार मानण्यासाठी त्या महिलेने केलेला नमस्कार आजही आमच्या लक्षात आहे. "ही पोरगीही अशीच वेंधळी आहे बाई..! नीट ठेवत जा पाकीट " हा माझ्या आईचा सदाबहार टोमणा ऐकायची  मला (बहुधा माझ्यासारख्या अनेकींना/अनेकांना) सवय आहे ! "अगं पैसे कुठे, किती खर्च होतात हे लिहून ठेवत जा." कॉलेजला आणि पुढे होस्टेलला गेल्यावर पॉकेटमनी देताना पप्पा मला नेहमी सांगायचे. मला मात्र हिशोब ठेवायचा जाम कंटाळा. "तुमच्याकडेच ठेवा ना लिहून..मी सांगते ना खर्च" "तो प्रश्न  नाहीये पण तुझ्याकडची बचत, जमा खर्च हे सगळं बघायची सवय तुला लागेल म्हणून.."  कधीतरी त्यांच्या आग्रहावरून मी अशा नोंदी करायला सुरुवात करायचे पण पैसे संपेपर्यंत त्यात बरेचदा सातत्य काही राहायचं नाही. अर्थात तेव्हा खर्च मोजका अन ठरलेला असायचा. आपण स्वतः कमवू लागल्यावर आणि जबाबदाऱ्या घेतल्यावर या गोष्टींचं महत्व जास्त कळतं. या बाबतीत थोडीफार सुधारणा नंतर होत गेली. हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे एकदा अशाच चुकता चुकता बरोबर झालेल्या हिशोबाचा किस्सा आज सांगतेय.
       मागच्या वर्षीची दिवाळीची सुट्टी संपून ऑफिसला जायचा दिवस उजाडला. बसच्या पासची मुदत संपलेली होती. सुट्टी असल्याने मुदत वाढवून घेतली नव्हती (पास renew  केला नव्हता ). आज ते काम करायला हवं म्हणून मी २००० रुपये काढले. १४०० चा पास आणि माझ्याकडे राहतील ६०० असा हिशोब मनात लावत -'वरं जनहितं ध्येयं' हे ब्रीदवाक्य लिहिलेल्या पुणे मनपा भवनातल्या PMPL च्या पास केंद्रात मी पोचले. "renew करायचाय..आजपासून." म्हणत पास आणि पैसे पहिल्या खिडकीतून लिपिकांकडे (क्लार्क) सुपूर्द केले." "पाटील..घ्या.." आवाज देत त्यांनी माझ्या हातात पास आणि फक्त १०० रुपये दिले. "सर, मी २००० दिले होते तुम्हाला, अजून ५०० ?" हे म्हणत असतानाच आपण काय माती खाल्लीय हे मला कळलं होतं. २००० किंवा १००० च्या नोटा असतील तर २००० रुपये देणं ठीक आहे ..पण १४०० च्या पाससाठी मी ५०० च्या ४ नोटा दिल्या होत्या ..चौथ्या नोटेची काहीएक गरज नसताना ! २००० - १४०० = ६०० हा हिशोब बरोबर असला तरी पैसे देताना कॉमन सेन्स वापरलाच नाही ! "नाही नाही..असं कसं? बरोबर १०० रुपये दिले तुम्हाला, १५०० च दिले होते तुम्ही" क्लार्क त्यांच्या मतावर ठाम होते. "मॅडम, तुम्ही परत एकदा तुमचं पाकीट तपासा. त्यातच असतील तुमचे ५०० रुपये."  हे सांगतानाच  त्यांच्याकडच्या ड्रॉवरमध्ये जमा झालेले पैसे दाखवत आता यातल्या तुमच्या ५०० च्या नोटा कोणत्या हे ओळखण्यात आपण असमर्थ आहोत हेही त्यांनी सुचवलं.. "ठीक आहे, मी एकदा बघते" म्हणून मी मागे आले. माझ्या सोबत, रांगेत उभ्या असलेल्या लोकांची कामं चालू होती. आणि मी मात्र पाकीट तपासत होते. पण ५०० रुपये काही मिळाले नाहीत. २००० - १४०० = ६०० हा सकाळपासून घोकलेला हिशोब माझ्या अंगाशी आला होता तर..मी नक्की ५०० च्या ४ नोटा दिल्या हे मला अगदी स्वच्छ लक्षात आलं होतं. दहावीला गणितात मिळालेले १४८ गुण मार्कलिस्टमधून बाहेर येऊन रागाने माझा कान ओढत - "लाज काढलीस गं..!" असं म्हणत असल्याचा भास मला होऊ लागला. सोडून द्यावेत काय पैसे..उशीरही होतोय ऑफिसला..१०-२० नाही..५०० आहेत कष्टाचे..आणि हो..आई आणि माझ्या आईचा तो सदाबहार टोमणा खराच आहे हे दाखवून देण्याची एकही संधी न सोडणारी  माझी भावंडंही मला दिसू लागली. हे त्यांना कळणं म्हणजे पुरावा देण्यासारखं होतं..आता तर हा इज्जत का सवाल झाला होता. "पण आता त्या क्लार्कना पटवून कसं द्यायचं ? भांडण झालं तर ? या प्रश्नांनी मला थंडीतही घाम फुटला. मी क्षणभर डोळे मिटून घेतले. 
  माझा हिशोब(technically) बरोबर असला तरी मी तार्किकदृष्ट्या (logically)चुकले होते. आणि मी बरोबरच असेल हे गृहीत धरून घाईत पैसे नीट न मोजण्याची चूक लिपिकांकडूनही झाली होती. जरा शांत झाल्यावर मला संत एकनाथ आठवले. आपले गुरु जनार्दन स्वामींकडे असताना हिशोबात एका 'पै' ची चूक मिळत नव्हती म्हणून रात्रभर जागून हिशोब करत बसलेले नाथ महाराज ! आणि त्यांना ती एका पैची चूक नंतर बरोबर कळली होती. काय सांगावं ? चूक शोधून दुरुस्त केलीच पाहिजे असं या २ खिडक्यांमागे बसलेल्या लिपिकांपैकी एकाला तरी वाटेल. मी प्रयत्न करायला हवा. 
    सकाळची वेळ असल्याने फार मोठी रांग नव्हती .एव्हाना रांग संपली होती. "सर, नाही मिळाले  मला पाकिटात पैसे. मला नक्की आठवतंय मी तुम्हालाच दिल्या ५०० च्या ४ नोटा."असं कसं होईल ? " त्याच अविश्वासाने ते बोलले. "तुला खात्री आहे ?" त्यांच्या शेजारच्या दुसऱ्या क्लार्कनी मला विचारलं" "हो काका " मी म्हणाले. 
"एक काम करू.. सकाळपासून तशाही नोंदी(entries)  कमी आहेत. लावूया सगळा हिशोब. यात असेल तर मिळेल गं तुझी ५०० ची नोट, नसेल तर दुसरीकडे हरवलीय. मान्य ? " "हो चालेल"  दिवसाच्या अखेरीस दिवसभरात झालेल्या व्यवहारांचा हिशोब द्यावा लागतो. तोच हिशोब आतापर्यंतच्या नोंदींसाठी त्या दोघांनी सुरु केला. पुढच्या १०-१५ मिनिटांत आज या काही तासांत एकूण किती पैसे जमा झालेत याचा एक आकडा मिळाला. आता पहिल्या लिपिकांनी पैसे मोजायला सुरुवात केली. आणि..त्या अपेक्षित आकड्यापेक्षा ५०० रुपये जास्त मिळाले. खात्री करण्यासाठी परत एकदा पैसे मोजले गेले."हम्म...आहेत ५०० जास्तीचे. तुझेच आहेत !" ते म्हणाले. " मी इतक्या वर्षांपासून काम करतोय इथे,आणि आम्हाला असा हिशोब रोज द्यावा लागतो..मी का घेईल जास्तीचे  पैसे ?" "काका,तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, पहिली चूक माझीच होती. तुम्ही हिशोब करायची तयारी दाखवलीत त्यातच सगळं आलं. माझी काहीही तक्रार नाही. त्यांनी ५०० ची नोट खिडकीतून माझ्या हातात दिली आणि आम्ही दोघेही खळखळून हसलो. गेल्या १५-२० मिनिटांत निर्माण झालेला ताण आता एकदम निवळला होता. 
    चुकता चुकता सावरलेला हा छोटासा हिशोब मला काही गोष्टी शिकवून गेला .
१) आपण शहाणे आहोत असं आपल्याला अन जगालाही वाटत असलं तरी कधीतरी आपल्याकडूनही अगदी बाळबोध वाटावी अशी  चूकही  (silly mistake) होऊ शकते.
२) चूक झाली आहे हे लक्षात येताच ती दुरुस्त करण्याच्या दृष्टीने टाकलेलं पहिलं पाऊल म्हणजे ती चूक स्वीकारणं ..चूक झाल्याचं कबूल करणं (to admit mistake)
३)शेवटची आणि महत्वाची गोष्ट म्हणजे बरेचदा आपण बोलताना कोणत्या पट्टीत (tone) बोलतो यावर    समोरच्या व्यक्तीची प्रतिक्रिया अवलंबून असते . उगाच चढ्या आवाजात, अरेरावीच्या भाषेत एकमेकांच्या चुका दाखवत आम्ही भांडत बसलो असतो तर प्रश्नाच्या उत्तरापर्यंत उशिरा पोचलो असतो. आणि उत्तर मिळूनही समाधानाच्या ऐवजी चिडचिड, मनस्ताप जास्त झाला असता. वर, माझ्या दिवसाची सुरुवात खूप खराब झाली हे दिवसभर सगळ्या गावाला सांगत बसलो असतो ते वेगळंच.
" पाटील, नंबर घेतलाय तुमचा,  गरज पडलीच तर फोन करू आम्ही तुम्हाला." मी निघताना ते काका उगाच म्हणाले. अपेक्षेप्रमाणे फोन काही आला नाही. 
           तुम्हीही कधी असा एखादा हिशोब चुकून चुकवलाय 😀? किंवा दुरुस्त केलाय ? एखादा चुकलेला/चुकता चुकता राहिलेला  हिशोब तुम्हाला काही शिकवून गेलाय ? आपला पराक्रम सांगायची संधी आपल्याला खूपदा मिळते. पण फजिती सांगायची संधी कमी वेळा आपण वापरतो.नाही का?असा प्रसंग तुमच्याकडे असेल तर जरूर शेअर करू शकता.
    नवीन वर्ष लवकरच सुरु होणार आहे . तेव्हा, येणाऱ्या वर्षात तुमचे सर्व हिशोब अगदी अचूक होवोत या शुभेच्छा...!
#PMT_Diaries
                                                                                       -©अमिता अशोक पाटील.

1 comment: