Sunday, 7 March 2021


      

        असं बरेचदा होतं ना ? कधीकाळी फार चांगले मित्र किंवा किमान जिव्हाळा असलेली  माणसं बऱ्याच कालावधीनंतर भेटली की बदलल्यासारखी वाटतात. आपण त्याच जुन्या आत्मीयतेने आणि जुनं समीकरण लक्षात ठेवूनच वागत, बोलत असतो पण बहुधा ती खूप पुढे निघून गेलेली असतात.आपण त्याच जुन्या भावनांनी विचारलेल्या प्रश्नांना किंवा सांगितलेल्या गोष्टींना ऐकण्यासाठी त्यांना वेळ नसतो किंवा ऐकायची इच्छा नाहीये असं वाटत राहतं.

     माणूस हा समाजशील प्राणी आहे आणि बदल हा निसर्गाचा नियम आहे. आयुष्याच्या प्रवासात आपण अनेक टप्पे, अनेक जागांना भेटी देत राहतो. प्रत्येक थांब्यावर जोडलेली नाती, मैत्री काळाच्या ओघात सुटू नये असं मनाला वाटत असतं. किमान कधीतरी भेटल्यावर तरी पुन्हा त्या आठवणी, तीच दोस्ती आठवून काही क्षण त्यात रममाण होणं आणि आपण अजूनही जोडलेलो आहोत (कनेक्टेड) ही भावना सुरेख असते.एकाच माणसाची अनेक क्षेत्रांमध्ये ओळखीतून निर्माण झालेली वेगवेगळी वर्तुळं(सर्कल्स) असतात.काळ, वय, प्रगल्भता, स्थिती (ज्याला स्टेटस म्हटलं जातं) यांच्या बरोबर या वर्तुळांची संख्या वाढते, त्यांचा परीघही विस्तारतो. या वर्तुळांची आपण गणित आणि बुद्धिमत्तेत काढतात तशा वेन आकृत्यांमध्ये (Venn Diagram) कल्पना करू, जी इथे दिली आहे. वेगवेगळ्या वर्तुळांत समतोल ठेवता आला तर ती आकृती दिलेल्या आकृतीतल्या रंगीत, छायांकित भागासारखी दिसेल- जो दोन वर्तुळांचा सामायिक भाग(कॉमन) आहे. म्हणजे जो दोन्ही वर्तुळांचा भाग आहे. इथेही आहे, तिथेही !अशा माणसांना नवीन माणसं जोडली म्हणजे पूर्वीपासून आयुष्यात असलेल्या माणसांना विसरायची किंवा दुर्लक्षित करायची गरज नसते हे कळतं. याउलट काही वेळा आपण कधीतरी अमुक एका वर्तुळाचा भाग होतो याचा विसर पडलेला असतो.

     आता वर्तुळांचा गुंता सोडून फक्त एकाच वर्तुळाकडे येऊ. वर्तुळाचा परीघ (circumference)लहानापासून मोठा होताना सर्व बिंदूंना घेऊनच मोठा होऊ शकतो.याउलट यातले काही बिंदू परीघ सोडून दूर जाऊ पाहतात तेव्हा वर्तुळ तुटतं आणि मग तयार होतात स्वतंत्र बिंदू, आणि काही बिंदूंपासून तयार झालेल्या रेषा. वेगवेगळ्या दिशांना जाणाऱ्या, समांतर, असमांतर कशाही. मग कधीतरी या रेषा समोर येतील तेव्हा आपण या वर्तुळाचा भाग होतो हे विसरणारच. काय झालंय याची जाणीव रेषांपेक्षाही विस्कटलेल्या वर्तुळाच्या केंद्रबिंदूला जास्त असेल कारण- तो या परिघाचा, पर्यायाने एकत्र बांधलेल्या बिंदूंचा साक्षीदार होता.

       जगाच्या या कागदावर आपण माणसं जगू तोवर आपली अशी अनेक वर्तुळं बनत राहणार,  त्यांचे परीघ  विस्तारत जाणार, एकीकडून दुसरीकडे आपलं स्थानांतरही होत राहणार. तरीही थोड्या वेळासाठी हे बिंदू,या रेषा पुन्हा तात्पुरतं का होईना वर्तुळ उभं करतात, कधी दोन वर्तुळांतल्या सामायिक जागेत उभे राहून सुख- दुःख, भाव -भावना वाटतात तेव्हा या आकृत्या सुंदर वाटू लागतात. आणि त्या छायांकित(shaded region), रंगीत   भागाप्रमाणे त्यांना जे काही वेगळं गवसतं ना..त्यालाच नात्यातला, मैत्रीतला निखळ 'आनंद' म्हणत असावेत जो आपण सर्वजण शोधत असतो. नाही का ? 

                                               -© अमिता   

3 comments:

  1. अगदी बरोबर.मानवी स्वभाव आहेच चंचल.चुलीवर अन्न शिजवायला अवघड वाटले म्हणून नवनवीन ईंधन,शेगड्यांचा शोध लावला.पण तरीही चुलीवरच्या अन्नपदार्थाच्या चवीत अडकला.

    ReplyDelete
  2. अगदी बरोबर.मानवी स्वभाव आहेच चंचल.चुलीवर अन्न शिजवायला अवघड वाटले म्हणून नवनवीन ईंधन,शेगड्यांचा शोध लावला.पण तरीही चुलीवरच्या अन्नपदार्थाच्या चवीत अडकला.

    ReplyDelete