"हॉल टिकीट ऍण्ड आय.डी. प्रूफ..!!" .शाळेच्या प्रवेशद्वाराशी घोषणा झाली. स्थळ- कॅम्प मधली एक कॉन्व्हेंट शाळा. " हो, तेच करतो आता आयुष्यभर " गर्दीतून कुणीतरी त्राग्याने म्हणाला. काही वर्षांनी निघालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या अर्थात TET च्या केंद्रावरचं हे दृश्य. धकाधकीच्या आठवड्यानंतर शनिवार-रविवार (weekend) नोकरदारांसाठी आरामाचा असतो. दुसरीकडे बरेचदा विविध परीक्षाकेंद्रांवर पुण्यात (आणि इतर शहरांतही) अशी लगबग असते.
परीक्षार्थींमध्ये काही पदवीधर आणि काही अर्थातच सध्या तात्पुरत्या(टेम्पररी) नियुक्तीवर काम करणारी शिक्षक मंडळी होती. त्यात महिलांची संख्या जास्त होती. खूपजणींसोबत त्यांची छोटी बाळंही आली होती. बेल झाली. परीक्षार्थींना मुख्य प्रवेशद्वारातून आत सोडल्यावर लागलीच ते (गेट) बंद केलं गेलं. आत्तापर्यंत दिसणारी आई कुठेय हे न कळल्यानं काही मुलं सैरभैर झाली, काही झोपलेली होती. ज्यांना बोलता येतं अशांनी आपापल्या बाबांना आई कुठेय ? कधी येणार ? वगैरे प्रश्नांची सरबत्ती सुरु केली. एक चिमुकली तर मुसमुसून रडत होती. "मामा येतोय बेटा घ्यायला, आई लगेच येणारे आणि.." तिचे बाबा तिची समजूत काढत होते.
आणि यानंतर सुरु झाली ती परीक्षेला गेलेल्या अनेकींच्या नवऱ्यांची आणि आई बाबांची (बाळांच्या बाबांची किंवा आजी/आजोबांची) कसरत! परीक्षा केंद्रात बसण्यासाठी किमान एक पडवी किंवा शालेय कामकाजात व्यत्यय येणार नाही अशा पद्धतीने प्रवेशद्वारालगतच का होईना पण ३-४ बेंचेसची जागाही उपलब्ध करून द्यायची परवानगी आणि इच्छा नाही हे खूप जणांना खटकलं, काहींनी त्यावर रोषही व्यक्त केला. पहाटेपासून घरातून बाहेर पडलेली आणि तेही सासवड, भोर, भोसरी आणि इतर उपनगर व पुणे जिल्ह्यातून विविध ठिकाणाहून आलेली मंडळी यात असल्याने परत जाऊन येणं हे न परवडणारं आणि वेळेच्या दृष्टीनेही शक्य नव्हतं, तेव्हा असं वाटणं स्वाभाविकच होतं.
त्यातूनही एकाने पर्याय काढला. एका मोठ्या कापड दुकानाच्या इमारतीसमोरच्या मोकळ्या जागेत आडोसा होता आणि एक चिंचेचं झाडही. त्यांनी पटकन सोबत आणलेली सतरंजी अंथरली. बाळाला खेळायला एक बॉल दिला. सतत पायाला भिंगरी लावून फिरणाऱ्या मोठ्या मुलीकडे लक्ष ठेवत येणारे फोन कॉल्स घेणं, कुणी विचारपूस केली तर हसत उत्तरं देणं हेही सुरु होतं. एका बाळाच्या बाबांनी घरून येताना खेळण्यातले(प्लास्टिकचे) बरेच प्राणी खिशात घालून आणले होते. एकेक करून ते बाळाच्या हाती दिले की ते हसता हसता थोड्या वेळासाठी आईला विसरत होतं. सकाळी एक आणि दुपारच्या सत्रात एक असे दोन पेपर असणाऱ्यांसाठी ही सगळी कसरतही दुप्पट होती. त्यात कालचा रविवार 'पोलिओ रविवार' असल्याने जवळचा पोलिओ बूथ शोधून या मुलांना पोलिओ डोस देऊन आणण्याचं कामही केलं गेलं. नुकताच 'पंगा' या सिनेमाचा ट्रेलर पहिला. त्यात मुलाची जबाबदारी काही काळ स्वतः सांभाळत, मी करू शकेन मॅनेज असा विश्वास देत नायिकेला पाठिंबा देणारा नायक..असे नायक अवतीभोवतीही असतात हे पटलं.
दिवस संपता संपता या बाळांनी आपला खाऊ, खेळणी आपापसांत शेअर केली होती आणि त्यांना सांभाळणाऱ्या पप्पांनी, आजी/आजोबांनी गप्पा! शिक्षण क्षेत्रात कमी-अधिक प्रमाणात झालेले गैर व्यवहार, उपलब्ध जागा आणि उमेदवार यांच्या आकड्यातली तफावत, काही खाजगी संस्थांच्या शाळेत काही ठिकाणी नोकरीसाठी मागितली व दिली जाणारी लाखोंची रक्कम, आणि हे पर्याय नसतील तर तुटपुंज्या पगारात घर चालवत योग्य संधीची वाट पाहणं किंवा नोकरीचे दुसरे पर्याय स्वीकारणं अशी आजवरची एकूण परिस्थिती. हे सगळे प्रश्न या क्षेत्रातल्या मंडळींना माहित आहेतच. म्हणूनच या पार्श्वभूमीचा विचार करता काही काळानंतर मिळालेली आजची (परीक्षेची) ही संधी न सोडता आजमावून पाहिलीच पाहिजे म्हणून एक दिवस ऍड्जस्ट करूया ही भावना सगळ्या चेहऱ्यांवर होती.
प्रत्येक क्षेत्राची, प्रत्येक व्यक्तीची, आपापल्या आयुष्यातली वेगवेगळी आव्हानं (challenges) आहेत. कदाचित..कोणतीच परीक्षा शेवटची नसते पण एखादी परीक्षा आयुष्यातला टर्निंग पॉईंट म्हणजे कलाटणी देणारी गोष्ट होऊ शकते. या वेगवेगळ्या परीक्षांमधल्या यशापयशाची कारणंही व्यक्तिपरत्वे भिन्न आहेत पण आपण ठरवलेला लहान-मोठा टप्पा गाठेपर्यंत स्वतःच स्वतःला सांगावं लागतं - "Carry on...(प्रयत्न सुरु ठेव..)!''
शेवटची बेल झाली. मुख्य प्रवेशद्वार (मेन गेट) उघडलं गेलं. आपापल्या आईचा चेहरा शोधणाऱ्या अनेक नजरा..तो चेहरा दिसताच दोन्ही हात खुले करून.. दुडूदुडू धावत इतका वेळ ज्यांची प्रतीक्षा केली त्या खांद्यांवर विसावल्या. प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक हाताला यशही अगदी असंच मिळो...सो..कॅरी ऑन...!
-©अमिता अशोक पाटील.
(P.C.- नम्रता पाटील)
(P.C.- नम्रता पाटील)

khup chan mam
ReplyDeleteThanks sir
ReplyDelete