एक झाड..उभं वादळात,
तग धरून असतं..
सोसून ऋतू सारे, अविरत खपत असतं ,
गाजावाजा न करताच
फुला-फळांना जिवापाड जपत असतं
घट्ट रोवतं पाय किती
तरी -"मातीच सांभाळते मला",
सर्वांना सांगत असतं ,
एक झाड..उभं वादळात,,
तग धरून असतं...
सळसळ ऐकून पानांची
मनोमन सुखावतं,
भयाण वारा सुटल्यावर
काळजीनं दुखावतं
खोडा-मुळांना भक्कम ठेवून
डोलारा सांभाळतं,
फांद्यांच्या उनाडपणाला लगोलग आवरतं
कधी अस्वस्थ असलं तरी ,
खूप खूप खंबीर दिसतं,
एक झाड..उभं वादळात,,
तग धरून असतं...
एके दिवशी फुला-फळांचंही झाड होतं
कधीतरी जे फक्त - बाळ होतं ,
'बाप' नावाच्या झाडाचं मन,
फुलून मग 'आभाळ' होतं..
उरल्या-सुरल्या पानांनिशीही
बहरलेलं ते दिसतं,
एक झाड..उभं वादळात,,
तग धरून असतं...
आजवर आपण दिली
तशी आपल्यालाही मिळेल का सावली ?
आपल्याला मिळो न मिळो,
कुणालातरी मिळेलच !
या विचाराने समाधानाने हसतं,
एक झाड..उभं वादळात,,
तग धरून असतं...
एक झाड..उभं वादळात,,
तग धरून असतं...
#सर्व_'बाप'माणसांना_समर्पित!!
#यूँही...Father'sDay2018
- ©️अमिता अशोक पाटील
copyright 2018 All rights are reserved

So heart touching.. Very Nice..!!!
ReplyDeleteThank u so much..!! :)
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteखूप धन्यवाद सर🙏
Delete