Sunday, 22 October 2017

वाटणी...



     

   
   मध्यान्ह टळून गेली होती. दुपारचं जेवण उरकून तिनं पसारा आवरला. झाकपाक करून झाली. दूध जरा निवल्यावर दुधावरची साय तिनं विरजणात घातली. वर्षानुवर्षे ही निगुतीची कामं करत आलीय - सत्तरीतली राधाबाई. घरात सुना आल्यावर स्वयंपाक, जेवणखाण जास्त बघायची वेळ शक्यतो आली नाही पण नुसतंच बसून राहणं तिला पटत नाही. दोन वर्षांपूर्वी घराची, शेताची वाटणी तीन मुलांमध्ये झाली. त्यात धाकट्या मुलाकडे- गावातल्या ज्या घरात इतकी वर्षे संसार केला तिथंच राहायचं तिनं निवडलं. सध्या बाळंतपणासाठी माहेरी गेलेल्या सुनेच्या गैरहजेरीत घर, धाकटा लेक आणि नातवासाठी जेवणखाण वगैरे जमेल तसं ती पाहत होती.
     चुलीतली लाकडं मागे ओढून तिनं ती विझवली. परवा दिवाळसणासाठी स्वतःच्या हातांनी तिनं ही चूल पोचारली होती- त्याच जुन्या उत्साहाने. याच चुलीवर दिवाळीच्या, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुला-नातवंडांसाठी काय काय रांधलं होतं आजवर ! लहान होती तेव्हा दोन्ही लेकींची मुलं सुट्ट्यांमध्ये यायची. आजीच्या हातची जाड भाकर, ठेचा, मातीच्या तवल्यांमध्ये(मोठ्या गाडग्यांमध्ये)  केलेली कढी, डाळींची वरणं, हाताने घुसळलेलं डेऱ्यातलं ताक- सारं सारं आवडीनं खायची. चार-आठ दिवसांत घराचं भरलं गोकुळ होऊन जायचं. आता लेकींची पोरंही मोठी झाली. शिक्षणं,नोकऱ्या, त्यांना न मिळणाऱ्या रजा ही सगळी न येण्याची कारणं तिला माहीत होती. ती खरी असली, पटत असली तरी -आता बऱ्याच गोष्टी पूर्वीसारख्या राहिल्या नाहीत म्हणून लेकी अन त्यांची मुलं म्हणजे तिची नातवंडं सारखं-सारखं येण्याचं टाळतात हे ती जाणून होती. कधीतरी लेकी येतात. कधी आपण त्यांच्या घरी जावं तर नातवंडं खूप दिवस रहा म्हणून हट्ट करतात पण मन कायम रमणार नाही तिकडं. भेटणं- बोलणं, राहणं झाल्यावर गाव, हा वाडा, घर, ओसरी, चुकलेली निगुतीची कामं साद घालतात. अन ती परतते. पण तिचं मन म्हणतंच- "अरे, बाकीच्यांचं जाऊ द्या, पण या जुन्या खोडासाठी तरी दोन दिवस या..त्यालाही आधाराची गरज भासते कधीकधी. या पिकल्या पानाला फक्त भेटायला या. कधी गळून पडेल याचा काय नेम ?
   चुलीत काही निखारे अजूनही फुरफुरत होते. निखाऱ्यांकडं पाहताना तिला उगीच वाटून गेलं- घरातली माणसंही अशी निखाऱ्यांसारखी झालीयेत का ? जवळ आली अन चुकून हवेची फुंकर मिळाली तर पेट घ्यायची..म्हणून जवळ येणंही नको अन पेटणंही नको. पण आगीचा उपयोग आपल्या हातात असतो ना..सगळं जाळून राख करणारी आग - अन्न शिजवून आपल्या पोटातली आग विझवूही शकते ना ! पण हे समजलं असतं तर ती ज्यांच्याकडे राहत नाही त्या दोन लेकांनी परवा एकाच गावात, एकाच शेतात राहून लक्ष्मीपूजनाचे वेगवेगळे पाट मांडले असते का ? बरं मांडले तर मांडले..पण लक्ष्मीची किंमत करण्याची अक्कल येण्याआधीपासून जिनं सांभाळलं त्या आईला भेटून आशीर्वाद घ्यावा असं वाटू नये कुणालाही ? परवा नैवेद्यासाठी पुरणपोळ्या करताना मनात कुठेतरी आशा होतीच- कुणी येईल. दिवे लागले, सारं गाव उजळून निघालं तशी आशा अजून वाढली. दिवे वाट पाहून विझून गेले पण पाया पडायला दूर, भेटायलाही कुणी आलं नाही. दसरा गेला तशी दिवाळीही गेली.
     राधाबाईएवढी शांत, संयमी बाई, शब्दाने कुणालाही न दुखावणारी सासू मिळाली म्हणून जाता येता तिच्या सुनांना गावातल्या बायका नशीबवान म्हणत. या घरानं गरिबी-श्रीमंतीचे चढ-उतार पाहिले. शेणानं सारवलेलं घर, भिंती, उखळात कुटलेले, पाट्यावर वाटलेले मसाले, जात्यावर दळलेलं धान्य, हाताने डेऱ्यात घुसळलेलं दही इथपासून ते नव्या फरश्या, मिक्सरपासून ते ताक करण्याच्या मशीनपर्यंत खूप काही बदललं, तिनं स्वीकारलं. कधी कुणाकडून जास्त अपेक्षा ठेवली नाही. जमेल तसं आणि तेवढं कामं करत राहणं एवढंच तिला ठाऊक. पण त्यांनी वाटणीत म्हाताऱ्या आईच्या नावावर जमिनीचा तुकडा करण्यात आपली कर्तव्यपूर्ती मानली. तिनं स्वतःहून बोलायला जावं तर - सरळ उत्तर नाही. जमिनी अन घराबरोबर जणू आईचीही वाटणी केली. पण आईचं प्रेम, बहिणींची माया या गोष्टींची वाटणी होत नसते. आणि या गोष्टींचा हिशोबही मांडता येत नाही ही गोष्ट नोकरी करणाऱ्या लेकाच्याही लक्षात आलीच नाही..किंवा कळूनही कुणाला वळलीच नाही !   
     दुसऱ्या सूनबाईनं - "म्हातारीला सांभाळता ते फुकट नाही..ज्यादा जमीन दिलीय ना वाटून..मग आईची जबाबदारी अन बहिणींची दिवाळी आलीच त्यात! " हे सांगून बोलायला काही शिल्लक ठेवलंच नाही. एकत्र राहून वाद होतात म्हणून वेगळी होणारी लोक दूर राहून तरी गोडीत राहतील असं वाटलं होतं..पण तशी इच्छाच नसेल तर काय..
   आता ती ओसरीत आली. भिंतीवर लावलेल्या आपल्या मालकाच्या फोटोकडे एक नजर टाकली. ती सावळी, करारी मूर्ती फोटोतही समाधानी वाटली तिला. हे असायला पाहिजे होते आज..असं वाटलं - पण क्षणभरच ! पुढच्याच क्षणी प्रश्न पडला -पण त्यांना सहन झालं असतं का हे सगळं ? मागच्या साली, भावांपेक्षा मोठी- पण लेकींमध्ये धाकटी असलेली लेक न राहवून भावाला म्हटलीच- "आम्हाला दिवाळी नको नि साडी-चोळी नको. तुम्हा भावा-भावांचं, जावा-जावांचं काहीही असो पण 'माय' आहे तोपर्यंत तिला अंतर देऊ नका. जिवंत आईची विचारपूस केली नाही आणि उद्या मेल्यानंतर अस्थी काशीला नेल्या - तर काहीच अर्थ नाही !" आईसाठी बापासारखीच स्पष्ट बोलली..पण तिचा हेतू कुठं कळला त्यांना ? वाईटपणा यायचा तो आलाच !  
   आजकाल गावागावात, बऱ्याच घरात हीच गोष्ट. नवीन लग्न झालेल्या पोरीही कधी जावेतून, कधीकधी फक्त सासूच्या घरातूनही निघून वेगळं बिऱ्हाड थाटतात. थाटो थाटायचा तर ! पण सणासुदीच्या निमित्तानं का होईना आई-बापांसाठी एकत्र येऊन दोन गोड शब्द बोलावेत ही अपेक्षा पण जास्त आहे का ? नातू- पणतू असलेली - राधाबाईची धाकटी जाऊ आजही एखाद्या कार्यक्रमासाठी स्वयंपाक करताना तिच्याकडे येते. नियोजन करताना लागणाऱ्या पदार्थांचा अंदाज विचारते . तेव्हा तिला वाटतं- खरंच, साधीसुधी पातळं (लुगडे) नेसणाऱ्या आम्हा अडाणी बायकांना, जेमतेम दहावीपर्यंत शिकवलेल्या मुलींना विचारांची, वागण्याची जी उंची जपता आली तीच उंची- उंची कपडे घालणाऱ्या या लोकांना जपता येईल का ? म्हातारपणाचा हा टप्पा आपल्याही आयुष्यात येईल हे विसरतात का हे लोक ?
   दूर राहणाऱ्या आणि मृत्यू झालेल्या माणसांच्याही सुखद आठवणी असतात आपल्याकडं. त्या आठवून किमान हसता तरी येतं. पण डोळ्यासमोर राहणाऱ्या माणसांची जुनी रूपं आठवून जगणं किती अवघड असतं..आणि सुख देणारं तर नक्कीच नसतं!
    विचारांच्या तंद्रीत असतानाच धाकटा लेक मोबाइल देत म्हणाला - " बोल, ताईचा फोन आहे " तिनं मोबाईल कानाशी लावला.  "आज्जी..ss कशीये तू ?" पलीकडून नात (लेकीची लेक) बोलली.
" मी खुशाल आहे बाई, तुम्ही सारे ?"
"आम्हीही.."
"आठवण नाही येत वाटतं आजीची"
"नाही गं...खूप येते. आम्ही कालच बोलत होतो तुझ्याविषयी. पण माहितीये ना- सुट्ट्या कमी असतात अन इथे कामंही होती दिवाळीची. आलो तर एक-दोन दिवस राहणंही झालं पाहिजे. पण मी आता नक्की येणार आहे..सुट्टी काढून..स्पेशल तुला भेटायलाच ! खरंच !"
"बरं बाई, ये ये "
 बोलणं संपल्यावर मोबाईल नावाच्या त्या खेळण्याकडं तिनं कौतुकानं पाहिलं. येईल तेव्हा येईल पण - आपल्याला येते तशी आपलीही आठवण कुणी काढतं हे ऐकूनच तिला बरं वाटलं.
  देवघरात विझलेल्या दिव्याची वात पुढे सरकवून तिनं तो पुन्हा लावला. एक दिवा देवघरात अन दुसरा तिच्या मनात तेवत होता...

#आई-बाबांचे ,आजी-आजोबांचे डोळे, त्यांची मनं वाचूयात..मग ते आपले असोत, ओळखीचे असोत किंवा नसोत. थोडा वेळ देऊन आपण त्यांना सुख देऊ शकत असू तर त्यांना आनंद तर मिळेलच अन आपल्याला समाधान..जगभरातल्या सर्व आजी-आजोबांना समर्पित!!
                                                                                                                                  - अमिता
           

13 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. Me hya diwali la ajila bhetun alo ......agadi manat hat ghatlat tumhi

    ReplyDelete
  3. Very well written Amita �� nikharyasarkhi msnase, manatala diva, mobile navach khelan,aajichya kruti tuzi smukshma nirikshan dakhavtat! Simple and great !

    ReplyDelete
  4. वाह अमिता!!!आतमध्ये भावनांचा ओलावा असल्याशिवाय असं लिहिता नाही येत.. अत्यंत सुंदर ..खूप भारी आयुष्य जगणारी आणि आतमध्ये त्याचा आनंद घेणारी लेखिका!!🙏🙏

    ReplyDelete
  5. Replies
    1. किती छान प्रतिक्रिया/अभिप्राय देतो रे ! उत्साह वाढवतात असे शब्द आणि यापेक्षाही अजून छान लिहीत राहायला सांगतात ..beautiful minds can see beauty in others..त्यामुळे म्हणतोय!
      thanks a lot for kind words Hrushikesh!

      Delete
  6. Khup Chan Amita ji, Chan ahe. Gawakadache lahanpan, manase athawali,
    Keep writting.
    - Mahesh Manisha, your FB friend.

    ReplyDelete