काट्यांची वाट तरीही
मन चातक वेडा
त्याला
भर उन्हात सरींची आस
इच्छा कधी पूर्तीस
मुकते
कधी
हवी ती गाडी
चुकते
आसवे
जरी डोळ्यांत
मन भिजून चिंब होते
कधी वादळात नाव
कधी शब्दांचे ते घाव
वेचून निखारे सारे
जागल्या मशाल पेटवतो
सोडून सावल्या जाती
संगे काळोख्या राती
उधळून जिवाची भीती
तो पुढे पुढे चालतो
दोस्ती करता काट्यांशी
नकळत फुले उमलली
भेटते कुण्या वळणावर
गाडी ती चुकलेली
फिरुनी पुन्हा तो तेव्हा
दिवस जुने आठवतो
आसवे 'ही' अन 'ती'ही
शिंपल्यात साठवतो
जन्म देवूनी दाता
अनुभवांनी झोळी भरतो
चालता चालता मग इथे
वाटसरू वाटाड्या होतो
अन मशाल
विश्वासाने हातात
कुण्या सोपवतो ....
वेचून निखारे
सारे , जागल्या मशाल पेटवतो..

No comments:
Post a Comment